एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
मागील काही वर्षात राजकीय क्षेत्रात झालेल्या घडामोडी आणि इनकमिंग व आऊटगोईंग पाहता कोण कोणाला म्हणेल “हम तुम्हारे है सनम” आणि कोण कोणाला म्हणेल “हम आपके है कोण ?” याचा अंदाज बांधणे थोडे अवघड होवून बसले आहे. शत्रू हे मित्र होवू लागलेत अन मित्र हे शत्रू होवू लागलेत, त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रश्न पडत आहे की, आपल्या विरूध्द असलेल्या पक्षाचा विरोध करायचा तरी कसा ? तिव्र, मध्यम का सौम्य ? अशीच काही परिस्थिती सध्याची झाल्याचे दिसत आहे.
वेळोवेळी बदलणारी परिस्थिती पाहता, कसली एकनिष्ठा, कसला विचार, कसली बांधिलकी अन कशाचं काय ? राज्यात किंवा देशात मागील काळात घडलेल्या अनेक घडामोडी पाहता पक्ष आणि त्याच्या विचारधारेशी, तत्वाशी, नैतिकतेशी आणि ध्येय धोरणाशी काहीही देणंघेणं राहिलेलं दिसत नाही. भविष्यात काय मिळेल यापेक्षा सध्या काय मिळू शकते या भावनेतून इनकमिंग, आऊटगोईंग सुरू असल्याचे दिसून येत आहे. वर्षानुवर्षे पक्ष कार्य करू करू पांढरे केसं पिकून गळायला लागलेत तरीही पक्ष किंवा वरिष्ठ नेते लक्ष देत नसतील तर मग कोणाचेही मन कसे लागेल अशीही भावना पदाधिकारी कार्यकर्ते अधून मधून व्यक्त करतांना दिसू लागले आहेत.
कोणी म्हटलं मन लागत नाही तर…!
दर वेळी एकच अर्थ असेल असे काही नाही, पण आजकाल कोणी नेता किंवा पदाधिकारी सहज म्हटला की आजकाल माझं मन कशात लागत नाही तर तात्काळ अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. त्याच्याकडे पाहून ह्यो दुसऱ्या पक्षात जातो की काय, असं त्याच्या सहकाऱ्याला वाटू लागले आहे. कदाचित एखाद्यावेळी त्याची तब्येत बरोबर नसेल आणि त्याने सहज म्हटलं असेल की आजकाल मन लागत नाही तरीही त्याचा अर्थ राजकीय दृष्टीने जास्त घेतला जात आहे.
कारण काय ?
पक्षाच्या मोठमोठ्या गप्पा मारणारे, इतरांना शिव्या घालणारे रात्रीतून अचानक पक्ष बदलून मोकळे होत आहेत, ज्यांना शिव्या घातल्या त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायला त्यांना काहीही वाटत नाही, रात्रीतून सहज दुसऱ्या पक्षात जावून आनंदी होत आहेत. हा प्रकार फक्त वरिष्ठ पातळीवरच होतोय असं काही नाही, गाव ते शहर आणि गल्ली ते दिल्ली कुठेही काहीही घडू शकते अशी सध्याची परिस्थिती झाल्याचे दिसत आहे.
जेथे सत्ता तेथे निष्ठा !
आजी माजी आमदार, खासदार यांचेच अधून मधून मन लागत नाही असे काही नाही. किंवा वरिष्ठ पातळीवरच अनेकांना अस्वस्थ वाटू लागते असंही काही नाही. ग्रामपंचायत स्तरावर, पंचायत समिती स्तरावर, नगरपालिका, महानगरपालिका जेथे सत्ता ज्या पक्षाची असेल किंवा सत्ता येण्याची शक्यता असेल तिकडे जाण्यात अनेकजण धन्यता मानत असतात. अनेक वर्षे होवूनही अपेक्षित संधी मिळाली नाही तर आजकाल अनेक नेते पदाधिकाऱ्यांना जास्तच अस्वस्थ वाटू लागले आहे असं म्हणायला हरकत नाही.
सत्ता गेली की…!
सत्ता असतांना अनेकांना काहीच अडचण येत नाही. मन लागतं, सगळीकडे सर्वकाही चांगलं दिसतं, वरिष्ठ नेते चांगले दिसतात. सत्ता असतांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये एवढे गुण दिसतात की कोणकोणते वाक्य त्यांच्या स्तुतीमध्ये वापरावे याचे संशोधन सुरू असते. वेगवेगळ्या उपाध्या या नेत्याला दिल्या जातात. एवढंच काय पक्षाच्या नेत्याविषयी कोणी काही बोललं तर आतून प्रेम उफाळून येतं आणि समोरच्या व्यक्तीचा तिव्र विरोध करावा वाटतो. परंतू सत्ता गेली की अचानक काय होतं कुणास ठाऊक, स्वत:चे वरिष्ठ किंवा सहकारी नेते वाईट वाटू लागतात, त्यांच्यात दोष दिसू लागतात, पक्षामध्ये स्वत:ला सन्मान मिळत नसल्याची भावना तयार होते, आपल्यावर अन्याय झाल्याचे वाटू लागते अशा अनेक नकारात्मक गोष्टी समोर येवून उभ्या राहतात.
तर… कुछ तो गडबड है !
ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका किंवा महानगरपालिका असो आणि विधानमंडळ किंवा संसद असो, यापैकी कुठेही जर आधी सत्ता असेल आणि तेव्हा संबंधित नेता किंवा पदाधिकारी आनंदी असेल आणि सत्ता गेल्यावर अचानक तो म्हणत असेल की, आजकाल कशात मन लागत नाही…. तर समजून घ्यायचं, दया… कुछ तो गडबड है….
तब्येतीची विचारपूस करा !
दरवेळी पक्ष नेता किंवा पदाधिकाऱ्याने मन लागत नाही म्हटल्यावर त्याच्याकडे संशयाने पाहू नका, कदाचित त्याच्या छातीत दुखत असेल, हार्टचा काही प्रॉबलेम असेल किंवा इतर काही अडचण असेल तर त्याला दवाखान्यात घेवून जा, नाही तर संशय करण्याच्या नादात भलतंच काही होवून जाईल आणि नंतर म्हणायची वेळ येईल… मला वाटलं… मन लागत नाही म्हटल्यावर ह्यो पक्ष सोडतो की काय…
असो… ज्याचे मन लागत नाही त्याने राजकीय विषय असेल तर कोणत्या ना कोणत्या वरिष्ठांशी आवश्य बोलावे, चर्चा करावी… आणि राजकीय विषय नसेल व खरोखर मन लागत नसेल तर आपल्या नातेवाईकांना किंवा जवळच्या मित्रांना मनातलं बोलून मोकळं व्हावं… कदाचित मन मोकळं केल्यावर, प्रश्न मार्गी लागू शकेल अथवा तुमची अडचण दूर होवू शकेल… त्यामुळे आनंदी रहा… आनंदाने जगा…. आणि इतरांनाही आनंदाने जगू द्या…
मग काय, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानमंडळ अथवा संसदेचे आजी माजी पदाधिकाकारी असो किंवा नेते असो, फक्त सत्ता नसल्यावर कोणाकडे बोलण्याची घाई करू नका की… आजकाल कशात मन लागत नाही…. कारण आजकाल एका वाक्याचे अनेक अर्थ निघत आहेत… बाकी… लगे रहो…
राजकीय पक्ष काय म्हणू राहिलेत ?
बदला बदला सा है मिजाज,
क्या बात हो गई,
शिकायत हमसे है या
किसी और से मुलाकात हो गई