एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
महाराष्ट्रात मागील काही काळापासून सुरू असलेलं राजकारण अनेकांना चक्रम करणारे ठरले आहे. एखाद्या विद्यापीठाने महाराष्ट्राच्या राजकारणावर नवीन अभ्यासक्रम सुरू करावा किंवा जागतिक संस्थांनीही डोकं खाजवावं अशीच काही परिस्थिती महाराष्ट्रात पहायला मिळत आहे.
देशात आणि राज्यात सुरू असलेलं राजकारण कमी होतं की काय आता घनसावंगी मतदारसंघातही अचानकच नवीन बातमी ऐकायला मिळाल्यामुळे मतदारसंघातील नागरिकही डोकं खाजवायला लागले आहेत. काही लोकांच्या मते तर भैय्यासाहेब हे डावपेचात मोठ्या साहेबांच्या सुध्दा 2 पाऊल पुढे निघाले आहेत.
नेमका प्रकार काय ?
नुकतंच घनसावंगी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे व आ. टोपे यांचे खंदे समर्थक असलेले काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत त्यांच्याकडे जावून अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे प्रवेश केलेल्यांपैकी 3 ते 4 पदाधिकारी हे भैय्या साहेबांचे अत्यंत जवळचे अथवा निकटवर्तीय (नातेवाईक / पाहुणे) आहेत. अनेक वर्षांपासून ते मोठ्या साहेबांच्या व भैय्या साहेबांच्या तालमीत विविध पदांपर्यंत पोहोचले आहेत.
प्रवेश केलेल्यांपैकी काही पदाधिकारी तर भैय्यासाहेबांचे कट्टर समर्थक तर होतेच परंतू भैय्यासाहेबांना ते सोडून जातील याची सूतरामही शक्यता दिसत नव्हती. परंतू अचानक निवडणुकीच्या तोंडावर सदरील पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडून अजित दादांच्या गटात सामिल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र सर्वसामान्य जनतेला प्रश्न हा पडला आहे की, सदरील पदाधिकारी हे भैय्यासाहेबांना सोडून अजित पवार गटात का गेले असावेत ?
चर्चा तर होणारच !
वर्षानुवर्षे सोबत काम केलेले व कट्टर समर्थक असलेले थोडेफार का असेना कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात (गटात) अचानक सामील होत असतील तर चर्चा तर होणारच आहे. लोकांना गप्पा हाणायला काय लागतंय ? कोणी म्हणतंय एकमेकांचे विचार पटले नसेल म्हणून त्यांनी सोडलं असेल. कोणी म्हणतंय हवं ते भेटलं नसेल म्हणून पक्ष सोडला असेल, कोणी म्हणतंय गुत्तेदारीमुळे ते गेले असतील.
कोणी म्हणतंय की जाणाऱ्यांनी “घर की मुर्गी दाल बराबर” समजून डबल फायदा करून घेण्याच्या दृष्टीने “अर्थपूर्ण” निर्णय घेतला असेल. तर काहीजण म्हणत आहेत की, भैय्यासाहेबांनीच शाळा केली आहे. काहींच्या मते, भैय्यासाहेबांचे राजकारण वेगळे आहे, सत्ता कोणाचीही असो, गुऱ्हाळ सुरूच राहीलं पाहीजे. ED वगैरे च्या भानगडी होण्यापेक्षा चर्चेची दारे नेहमी खुली पाहीजे.
काहींच्या मते आजकालचे राजकारण म्हणजे विना औषधाचं गुंगी आणणारं आहे. “कब ऊंट किस करवट बैठेगा कोई नही जानता” मग ऐनवेळेला धावपळ करण्यापेक्षा आणि टोकाचे राजकारण करण्यापेक्षा चर्चेची दारे खुली पाहीजे, म्हणजे त्या दारातून काही ने-आण करणे सोपे जाईल. शिवाय आपल्या नात्या गोत्यात व आप्तस्वकीयांकडून सुरू असलेली गुत्तेदारी संपुष्टात येवू नये. तसेच ऐनवेळेला काही कमी जास्त झाल्यास अडचण होण्यापेक्षा दोन्ही डगरीवर हात ठेवलं असेल अशीही चर्चा होत आहे.
अर्थपूर्ण संबंध !
भैय्यासाहेबांचे मविआ सोबतच युतीच्या नेत्यांसोबतही चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते. एक शायरी आपण ऐकली असेलच की, “दुश्मनी करो तो ऐसी करो की, फिर कभी मुलाकात हो तो शर्मिंदगी महसूस न हो” म्हणजेच कोणासोबत कशाला टोकाची भुमिका घ्यायची. तिकडून अजित दादाही म्हणत असतील अरे भैय्या माझ्याकडे “अर्थ” आहे. ED चा सुध्दा ताण नाही. त्यामुळे कदाचित भैय्या साहेबांनी सांगितले असेल की, किमान तुर्तास तरी माझी शक्यता नाही, पण साखरपेरणी सुरू केली असून माझं गुऱ्हाळ व्यवस्थित सुरू राहू द्या. कदाचित असं काही झालं असेल, असेही मत काहीजण व्यक्त करत आहेत.
आता या सगळ्या चर्चा आणि तर्क वितर्क आहेत, वस्तुस्थिती काय आहे आणि लोकसभा संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत पर्यंत काय घडामोडी घडतात यावरूनच बरंच काही लक्षात येईल. आता या गोंधळात दोन्ही बाजूने काही स्पष्टीकरण येतंय का ते पहावं लागेल. बाकी आपण नागरिक, मतदार म्हणून तुर्तास जास्त टेंशन घेण्यात काही अर्थ नाही. कारण सध्याचे राजकारण पाहता सकाळी झोपेतून उठल्यावर काय ऐकायला मिळेल हेच सांगता येत नाही… सध्या सुरू असलेलं गोंधळ पाहता कदाचित राजकारणातलं हे नवीन चित्रपट सुरू झालं असावं आणि कदाचित त्यातील भुमिकाही आधीपेक्षा वेगळ्या असाव्यात असा अंदाज बांधायला हरकत नाही. …तो पर्यंत Take Care, God Bless You….
परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज