Your Alt Text

खूब जमता होगा रंग… जब मिल बैठते होंगे 3 यार… महसूल, पोलीस और रेत माफिया…!

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
राजकीय क्षेत्रात रात्रीतून अनेक युती किंवा आघाड्या तुटत आहेत परंतू प्रशासन आणि वाळूमाफियांची असलेली युती / आघाडी सहजासहजी तुटत नसल्‍याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. कारण प्रशासनाने काही प्रमाणात कारवाई करूनही महसूल व पोलीस प्रशासना समोरूनच भरधाव वेगाने जाणारी वाहने अनेक प्रश्‍न उपस्थित करत आहेत.

घनसावंगी तालुक्‍यात वाळूमाफियांनी मागील काही महिन्‍यांमध्‍ये अक्षरश: उच्‍छाद मांडला आहे. गोदापात्रात जिकडे तिकडे वाळूमाफिया प्रचंड प्रमाणात उत्‍खनन करून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतुक करत आहेत. प्रशासनातर्फे महिना 15 दिवसात एखादी तुटकी फुटकी कारवाई करून पाठ थोपटून घेण्‍यात येत आहे, परंतू दुसऱ्याच दिवशी परिस्थिती जैसेथेच होत आहे.

कोट्यावधीची वाळू !

वाळूमाफिया लाखो नव्‍हे तर कोट्यावधी रूपयांची वाळूची अवैध वाहतुक करत आहेत. अक्षरश: 60-60 लाखांची अनेक वाहने घनसावंगी तालुक्‍यात दाखल झालेली आहेत. महसूल आणि पोलीस प्रशासनात अनेक चांगले व इमानदार अधिकारी / कर्मचारी असले तरी इतर अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा वाळूमाफियांना प्रत्‍यक्ष / अप्रत्‍यक्ष आशिर्वाद असल्‍याचे बोलले जात आहे.

वाळूची वाहने कोणाची ?

वाळूमाफियांची तर असंख्‍य वाहने आहेच परंतू या वाहनांमध्‍ये एखाद्या नेत्‍याचे किंवा अधिकारी / कर्मचाऱ्याचे वाहन असण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. कारण मागील काळात असे घडलेले आहे. आणि जर तसे असेल तर वाळूमाफियांना ते सहाय्यकच ठरेल. म्‍हणजेच “तुम्‍हारे खत में हमारा सलाम” अशीही शक्‍यता नाकारता येत नाही.

भरधाव वाहने !

घनसावंगी तालुक्‍यात विविध रस्‍त्‍यांवर भरधाव वेगाने म्‍हणजे 100 च्‍या पुढे गतीने वाहने जातांना दिसत आहे. त्‍यामुळे नागरिकांचे जीव धोक्‍यात आले आहे. कुंभार पिंपळगावात सध्‍या मार्केट कमिटी ते राजाटाकळी रोडवर रस्‍त्‍याचे काम चालू आहे, या रस्‍त्‍यावर खूप वर्दळ आहे तरीही वाळूची अवैध वाहतुक करणारी वाहने 100 किंवा त्‍यापेक्षा जास्‍त गतीने जात आहेत. अर्थातच याच रस्‍त्‍यावर पोलीस चौकी आहे मात्र स्‍थानिक पोलीसांनी डोळ्यावर वेगळा अथवा विशेष चष्‍मा लावला आहे त्‍यातून ही वाळूची वाहने दिसत नसल्‍याचे बोलले जात आहे. एवढंच नव्‍हे तर घनसावंगी, तिर्थपुरी, आष्‍टी इत्‍यादी परिसरातूनही भरधाव वेगाने जाणारी वाहने संबंधित पोलीसांना दिसत नाही, कारण त्‍यांनीही अशाच प्रकारचा चष्‍मा लावल्‍याचे बोलले जात आहे.

खूब जमता होगा रंग…!

मागील काळात टिव्‍हीवर एक जाहिरात येत होती त्‍याला थोडं दुरूस्‍ती करून लिहीलं तर… खूब जमता होगा रंग, जब मिल बैठते होंगे 3 यार… महसूल, पोलीस और रेत माफिया… असंच काही सांगायची वेळ आली आहे असं नागरिक सांगत आहेत. अर्थातच जर अशा प्रकारची बैठक होत असेल तर त्‍या बैठकी मध्‍ये मॅनेज झालेला “तो” अधिकारी किंवा कर्मचारी वाळूमाफियांना सांगत असेल की, मी मारल्‍यासारखं करतो तू रडल्‍यासारखं कर…

खरंच कारवाई करायची तर…!

वाळूमाफियां विरूध्‍द खरंच मनातून कारवाई करायची असेल तर एकमेकांना दोष देण्‍यापेक्षा महसूल आणि पोलीस प्रशासनाने फक्‍त एका रात्री नदी पात्रातून वर येणाऱ्या किंवा कुंभार पिंपळगांव, घनसावंगी, तिर्थपुरी, आष्‍टी इत्‍यादी रस्‍त्‍यावर पथकाला थांबवावे, तेव्‍हा वाळूची अवैध वाहतुक रात्रीतून किती लाखांची अथवा कोटींची होते हे लक्षात येईल. फक्‍त कारवाईच्‍या आधी कोणी कोणाला डोळा मारू नये, इशारा करू नये, SMS करून डिलीट करू नये, किंवा मिस कॉल करू नये. कारण वाळूमाफिया प्रशासनाच्‍या 2 पाऊल पुढे आहेत.

वरिष्‍ठांचे दुर्लक्ष होत आहे का ?

ज्‍या प्रकारे पोलीस प्रशासन एखाद्या कुख्‍यात आरोपीला पकडण्‍यासाठी सापळा रचून बरोबर पकडते, त्‍याच प्रमाणे महसूल व पोलीसांनी मिळून व्‍युहरचना केली तर वाळूमाफियांवर नियंत्रण मिळवण्‍यात बऱ्याच अंशी यश येवू शकेल. यासाठी जिल्‍हाधिकारी, अप्‍पर जिल्‍हाधिकारी, पोलीस अधिक्षक, अप्‍पर पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी (SDM), उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्‍यासह इतर अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घातल्‍यास वाळूची होणारी अवैध वाहतुक थांबवणे अथवा नियंत्रणात आणणे शक्‍य आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!