Your Alt Text

पुन्‍हा एक घोटाळा ! शेतकऱ्यांचे कोट्यावधी लाटले ! जालना जिल्‍ह्यात नुसते घोटाळेच सुरू आहेत की काय ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
शासनाने जालना जिल्‍ह्यात अतिवृष्‍टी, पूर व गारपीटीमुळे नुकसान झालेल्‍या शेतकऱ्यांसाठी दिलेल्‍या कोट्यावधी रूपयांच्‍या अनुदानावर तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहायक यांनी डल्‍ला मारला असून शेतकऱ्यांच्‍या हक्‍काचे कोट्यावधी रूपये हडप करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे जालना जिल्‍ह्यात नुसते घोटाळेच सुरू आहेत की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, सन २०२२-२०२३ मध्‍ये अतिवृष्‍टी, पूर व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सदरील नुकसानीपोटी शासनाकडून ११०३ कोटी रूपये मंजूर झाले होते, त्‍यापैकी ९८३ कोटी रूपये वाटपही झाले होते. सदरील अनुदानापैकीच मोठ्या रक्‍कमेवर काही अधिकाऱ्यांनी डल्‍ला मारल्‍याचे समोर आले आहे.

घोटाळा कसा ?

प्राथमिक चौकशी मध्‍ये संबंधित काही तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यकांनी तहसीलदारांचे लॉगीन व पासवर्ड वापरून अनुदान वितरणात गैरव्‍यवहार केल्‍याचे समोर आले आहे. एकाच शेतकऱ्याच्‍या नावावर वेगवेगळे VK नंबर तयार करणे तसेच जमीन नसतांना किंवा फळबाग नसलेल्‍या शेतकऱ्यांच्‍या नावावर अनुदान मंजूर करणे असे अनेक कारनामे करून शासनाची फसवणूक करून अनुदानावर डल्‍ला मारण्‍यात आला आहे. प्राप्‍त माहितीनुसार सदरील घोटाळा ५० कोटीचा सांगण्‍यात येत असला तरी घोटाळ्याची रक्‍कम वाढण्‍याची शक्‍यता आहे.

चौकशी सुरू !

प्राप्‍त माहितीनुसार या घोटाळ्याची चौकशी करण्‍यासाठी सहाय्यक जिल्‍हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंबड, उपजिल्‍हाधिकारी रोहयो जालना व नायब तहसीलदार जालना यांची एक समिती स्‍थापन करण्‍यात आली असून सदरील समिती झालेल्‍या गैरव्‍यवहाराची चौकशी करत आहे.

सदरील घोटाळा लक्षात आल्‍यानंतर समितीच्‍या माध्‍यमातून जिल्‍हा प्रशासनाने गोपनीय चौकशी सुरू केली असून आतापर्यंत अंबड व घनसावंगी तालुक्‍यातील ७० ते ८० गावांची चौकशी झाल्‍याचे सांगितले जात आहे. मात्र घोटाळ्याची व्‍याप्‍ती पाहता जिल्‍ह्यातील इतर तालुक्‍यात सुध्‍दा अनुदान वाटपाची चौकशी होणार असल्‍याचे सुत्रांनी सांगितले.

झोपा कोण काढत होते ?

शेतकऱ्यांच्‍या हक्‍काचे पैसे काही तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक लाटत असतांना संबंधित कार्यालयातील प्रमुख अधिकारी झोपा काढत होते का ? जर तहसीलदारांचे लॉगीन आयडी व पासवर्ड वापरून एवढ्या मोठ्या प्रमाणवर घोटाळा किंवा अपहार करण्‍यात येत होता तर कोणाच्‍याच कसे लक्षात आले नाही ? तहसीलदारांना या घोटाळ्याची काहीच कल्‍पना नव्‍हती का ? बनावट शेतकरी दाखवण्‍यात येत असतांना संबंधित अधिकाऱ्यांनी यादीची शहानिशा का केली नाही ? या घोटाळ्यात फक्‍त काही तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यकच जबाबदार आहेत की त्‍यांच्‍यापेक्षा वरिष्‍ठ असलेले कोणी अधिकारी सुध्‍दा बसल्‍या जागी मलाई खात होते ? याचाही तपास होणे आवश्‍यक आहे.

नुसते घोटाळे ?

जालना जिल्‍ह्यात हर घर जल घोटाळा समोर आलेला असतांनाच, परतूर तालुक्‍यात शिक्षकांच्‍या पैशांवर डल्‍ला मारल्‍याचा दुसरा घोटाळा समोर आला होता. या घोटाळ्यांची चर्चा होत असतांनाच आता शेतकऱ्यांच्‍या अनुदानावर डल्‍ला मारून मोठा घोटाळा केल्‍याचे समोर आले आहे. एकामागुन एक घोटाळे समोर येत असल्‍याने जालना जिल्‍ह्यात नुसते घोटाळेच सुरू आहेत की काय असा प्रश्‍न सर्वसामान्‍य जनतेला पडला आहे. घोटाळे कोणतेही असो, प्रामाणिकपणे, निष्‍पक्ष चौकशी झाल्‍यास अनेक अधिकाऱ्यांना घरी बसावे लागेल यात शंका नाही.


इतर बातम्‍या खाली पहा…



Matin 01
व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!