एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारतात अत्यंत तिव्र प्रतिक्रिया उमटत होत्या, देशात प्रचंड संताप पहायला मिळत होता, पाकिस्तानला धडा शिकवावा अशी जनतेची भावना होती, जागतिक पातळीवरून सुध्दा भारताला मोठा पाठींबा मिळत होता, त्यामुळे भारत कारवाई करणार स्पष्ट दिसत होते, त्याचाच भाग म्हणून मध्यरात्री पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय जवानांनी ९ दहशवादी तळ उध्वस्त केले आहेत. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले होते.
भारताकडून एअर स्ट्राईक !
भारताकडून पाकिस्तानात घुसून करण्यात आलेल्या एअरस्ट्राईक मध्ये बहावलपूर येथील जैश ए मोहम्मदचे मुख्यालय, मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबा चे मुख्यालय, सवाई येथील लष्कर –ए-तोयबाचा अड्डा, गुलपूर येथील दहशतवाद्यांचा अड्डा, बिलाल येथील जैश-ए-मोहम्मदचे हवाई तळ, कोटली आणि बरनाला येथील दहशतवाद्यांचे ठिकाण, सरजाल येथील जैश – ए- मोहम्मदचा अड्डा, महमूना येथील हिजबुल्लाचे प्रशिक्षण केंद्र अशा ९ ठिकाणांचा समावेश आहे. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.
दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त !
भारताने रात्री उशीरा केलेल्या या नियोजनपूर्वक एअर स्ट्राईक मध्ये अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आहेत सोबतच अनेक दहशतवादी सुध्दा मारले गेले आहेत. सदरील एअर स्ट्राईक दहशतवाद्यांच्या तळांवर करण्यात आली असून यामध्ये तेथील सैन्य ठिकाण्याला लक्ष्य करण्यात आले नाही तसेच कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झाल्याचा रिपोर्ट समोर आला नसल्याचे कर्नल सोफीया कुरेशी यांनी सांगितले.
कायमचा बंदोबस्त करा !
भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राईक बद्दल देशभरात आनंद व्यक्त होत आहे, मात्र वारंवार भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा, भारतावर हल्ला करण्यापूर्वी पाकिस्तानने १०० वेळा विचार करायला पाहिजे अशी त्यांची अवस्था करा, त्यांचा कायमचा बंदोबस्त करा अशीही भावना जनतेतून व्यक्त होत आहे.