Your Alt Text

अरे हे अवैध वाळूचे टिप्‍पर नसेल, तर लहान मुलांच्‍या खेळणीतील गाडी असावी, ज्‍यात माती असावी ! कारण तशा गाडीला नंबर प्‍लेट नसते !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
जेव्‍हा खिसे गरम करून डोळ्यावर स्‍वार्थाचा चष्‍मा घातला जातो तेव्‍हा माणसाला समोरचे सत्‍य दिसत नाही. यदाकदाचित कोणी सत्‍य दाखवण्‍याचा प्रयत्‍न केला तरीही तो स्‍वार्थाचा चष्‍मा सत्‍य पाहू देत नाही आणि मग चुकीच्‍या गोष्‍टी, गैरप्रकार आणि गुन्‍हे वाढतच राहतात.

कुंभार पिंपळगाव (ता.घनसावंगी, जि.जालना) शहरातून आणि तालुक्‍यातील विविध मार्गावरून भरधाव वेगात जेव्‍हा वाळूने भरलेले टिप्‍पर, हायवा अशा विविध १०-१० टायरच्‍या गाड्या जात असतांना महसूल व पोलीस प्रशासनाला दिसत नाही किंवा अवैध वाळूची वाहतुक सुरूच नाही असा सोंग घेतला जातो, तेव्‍हा त्‍या अवैधरित्‍या वाहतूक करणाऱ्या वाळूच्‍या गाड्या नव्‍हे तर मातीने भरलेल्‍या लहान मुलांच्‍या खेळणीतील गाड्या असाव्‍यात, ज्‍यामध्‍ये माती असावी, कारण लहान मुलांच्‍या गाडीला नंबरप्‍लेट नसते असे उपहासाने नागरिक बोलू लागले आहेत.

कुंभार पिंपळगांव सह भादली, गुंज, शिवणगाव या भागातून जेव्‍हा वाळूची अवैध वाहतुक करणारी वाहने जात असतांना संबंधित गावचे तलाठी, मंडळ अधिकारी, तहसील प्रशासन, कुंभार पिंपळगांव पोलीस चौकी, घनसावंगी पोलीस ठाणे, आष्‍टी पोलीस ठाणे इत्‍यादी डोळ्यावर स्‍वार्थाचा चष्‍मा लावून बसतात तेव्‍हा मलाई घरपोच येत असावी असे शब्‍द लोकांच्‍या तोंडून आपोआप पडत असतात.

वरिष्‍ठांचेही दुर्लक्ष !

काही वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना तर एवढा अहंकार चढलाय की, आम्‍हाला कोणीही प्रश्‍न विचारू नये, आम्‍ही खुर्चीवरून उठणार नाही, आम्‍ही आमच्‍या स्‍पेशल कॅबीन मध्‍ये उंटावर बसून शेळ्या हाकू आम्‍हाला कोणीही बोलू नये अशी मानसिकता ठेवून कारभार पाहत आहेत. महसूल व पोलीस प्रशासनाचे वरिष्‍ठ अधिकारी यांना गोदाकाठचे गावच माहित आहेत की नाही असा प्रश्‍न पडतो. कारण ते कधी या भागात फेरफटका मारतांनाही दिसत नाही, कारवाईसाठी कधी का असेना रस्‍त्‍यावर उतरत नाही, मग याचा अर्थ काय घ्‍यायचा ? वरिष्‍ठ अधिकारीच जर मुग गिळून गप्‍प बसू लागले तर स्‍थानिक अधिकारी कशाला डोकं लावतील ? असाही प्रश्‍न उपस्थित होतो.

आरटीओ विभाग नावालाच !

घनसावंगी तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणावर वाळूची अवैध वाहतुक होत असतांना आरटीओ विभागाचे सुध्‍दा दुर्लक्ष होत आहे. विशेष म्‍हणजे क्षमतेपेक्षा जास्‍त लोड आणि विना नंबर प्‍लेटची मोठी वाहने भरधाव वेगाने चालवली जात असतांना, विना कादगपत्रांची वाहने धावत असतांना आरटीओ विभागाच्‍या अधिकाऱ्यांना मात्र या परिसरात येण्‍यास अजून मुहूर्त सापडलेला नाही. त्‍यांनाही दक्षणा पोहोचवणे सुरू आहे की काय असा प्रश्‍न उपस्थित होवू लागला आहे.

पाण्‍यातूनही वाळू !

गोदापात्रात पाणी असले तरी काही ठिकाणी पाण्‍याचे प्रमाण कमी आहे, मात्र कितीही पाणी असले तरी वाळूमाफीयांनी पाण्‍यातूनही वाळू काढण्‍याचे नियोजन केले आहे, कारण वाळूमाफीयांसाठी ही वाळू नव्‍हे तर सोने आहे ते उकरून काढण्‍यासाठी जे जे करणे शक्‍य आहे ते करायला तयार आहेत. कारण वाळूचे अवैध उत्‍खनन करणाऱ्यांना आणि वाळूची अवैध वाहतुक करणाऱ्यांना कोणाचीही भिती राहीलेली नाही.

समोरून वाहने चालली !

कुंभार पिंपळगांव पोलीस चौकी असो, घनसावंगी पोलीस ठाणे असो, तलाठी, मंडळ अधिकारी असो किंवा तहसील प्रशासन असो यांच्‍या समोरून वाळूची अवैध वाहतुक करणारी वाहने जात असतांना कोणालाही दिसत नाही, कारण सर्वांनी डोळ्यांवर अर्थपूर्ण चष्‍मा घातलेला आहे. त्‍यामुळे अधिकाऱ्यांना सर्वसामान्‍यांची वाहने दिसतात परंतू वाळूमाफीयांची वाहने दिसत नाहीत.

नेते, अधिकाऱ्यांचा आशिर्वाद !

घनसावंगी तालुक्‍यात वाळूमाफीयांना नेत्‍यांचा आशिर्वाद नसेल असे म्‍हणणे हास्‍यास्‍पद ठरेल, फक्‍त कोणत्‍या नेत्‍याचा वाळूमाफीयांना आशिर्वाद आहे याचा शोध घेणे आवश्‍यक आहे. वाळू घाटांचा लिलाव करून सर्वसामान्‍य जनतेला स्‍वस्‍तात किंवा योग्‍य किंमतीत वाळू उपलब्‍ध करून देण्‍यासाठी नेते आणि अधिकाऱ्यांनी प्रयत्‍न केले असते तर आज सर्वसामान्‍यांना घराच्‍या बांधकामासाठी आपले काम थांबवावे लागले नसते. मात्र सर्वांनाच मलाई पाहिजे आहे त्‍यामुळे सोन्‍याचे अंडी देणारी कोंबळी नको म्‍हणणे सर्वांनाच अवघड जात असावे.

गुन्‍हेगारीला खतपाणी !

ज्‍या प्रमाणे राज्‍यात वाळूच्‍या अवैध उत्‍खनन व वाहतुकीमुळे गुन्‍हेगारीला खतपाणी मिळत आहे त्‍याच प्रमाणे घनसावंगी तालुक्‍यातही वाळूच्‍या अवैध व्‍यवसायातून गुन्‍हेगारीचे प्रमाण वाढत आहे. अल्‍पवयीन आणि तरूण मुले दारू, नशापाणी करत असून गुन्‍हेगारीकडे वळत आहेत, भविष्‍यात याच वाळूच्‍या अवैध वाहतुकीमुळे काही दुर्दैवी घटना घडल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही. परंतू याचे कोणालाही देणेघेणे दिसत नाही.

सोन्‍याचे अंडी देणारी कोंबडी !

वाळूचे एक टिप्‍पर २५ ते ३० हजारात विक्री होत असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. एका टिप्‍परने २४ तासात ३ ट्रीप जरी केल्‍या तरी ७५ ते ९० हजार रूपये त्‍यांना भेटत आहे. अपाम पैसा मिळत असल्‍याने वाळूच्‍या घाटाचे लिलाव झालेले नसतांनाही अवैधरित्‍या उत्‍खनन व वाहतूक सुरू आहे. अर्थातच आम्‍ही वर पर्यंत अधिकाऱ्यांना हप्‍ते देतो, त्‍यामुळे आमचे कोणी काहीही करू शकत नाही असे वाळूमाफीया लोकांना सांगत फिरत आहेत.

रात्रीची जास्‍त वाहतूक !

वाळूमाफीया हे दिवसा कमी प्रमाणात तर रात्री जास्‍त प्रमाणात वाळूची अवैध वाहतुक करत असल्‍याचे दिसून येत आहे. तसेच फक्‍त कुंभार पिंपळगावातूनच नव्‍हे तर गोदाकाठ परिसरातून बाहेर पडल्‍यावर जे जे मार्ग आहेत मग ते कॅनॉल साईडने असो, मुर्ती रोडने असो किंवा इतर मार्गाने असो वाहतुक सुरूच आहे. दररोज लाखो रूपयांची आणि महिन्‍यात कोट्यावधी रूपयांची वाळू अवैधरित्‍या उत्‍खनन व वाहतुक केली जात असून गोदाकाठ परिसरात ड्रोन कॅमेरे फिरवल्‍यास सगळी परिस्थिती समोर येईल. आता संबंधित अधिकाऱ्यापैकी कोणाला कर्तव्‍याची जाणीव होते की घरबसल्‍या मलाई खाण्‍यातच अनेकजण धन्‍यता मानतात हेच पाहणे महत्‍वाचे ठरणार आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!