Your Alt Text

घनसावंगी तहसिल प्रशासनाने वाळू माफीयांना रात्रीचा वाळू तस्‍करीचा परवाना दिलाय का ? | Illegal Transportation of Sand

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथून रात्रभर वाळू तस्‍करी सुरू असल्‍याने तहसिल प्रशासनाने वाळू माफीयांना रात्रीचा परवाना दिलाय का ? असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे.

गोदापात्रातून रात्रभर वाळूची तस्‍करी करून वाळूची अवैध वाहतुक केली जात असतांना महसूल प्रशासन मात्र या वाळू तस्‍करांवर कोणत्‍याही प्रकारची कार्यवाही करतांना दिसून येत नाही, एखाद्यावेळी दाखवण्‍यापुरती कार्यवाही करण्‍यात येत असेलही मात्र दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसेथेच दिसून येते.

हप्‍ते बांधलेले आहेत का ?

दररोज रात्रीच्‍या वेळी ज्‍या प्रमाणे अनेक वाळूची वाहने अवैधरित्‍या वाळूची वाहतुक करत आहे ते पाहता वाळू माफीयांनी संबंधित लोकांकडे हप्‍ते बांधलेले आहेत का ? वाळू तस्‍करीसाठी किती जणांचे खिसे गरम करण्‍यात येत आहेत ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ज्‍या प्रमाणे वाळू माफीया वाळूची तस्‍करी बिनधास्‍तपणे करत आहे त्‍यावरून वाळू माफीयांना कोणाचीही भिती राहीली नसल्‍याचे दिसत आहे, जणू पोलीस व महसूल प्रशासन किंवा यंत्रणा आमच्‍या खिशात असल्‍याच्‍या अविर्वाभावात वाळूची अवैध वाहतुक सुरू आहे.

लाखो रूपयांची वाळू !

वाळू माफीया गोदापात्रातून दररोज लाखो रूपयांची वाळू तस्‍करी करीत असून नियमितपणे वाळूचे उत्‍खनन केले जात आहे. विशेष म्‍हणजे वाळूचा कोणत्‍याही प्रकारे लिलाव झालेला नाही. तरीही कोणाच्‍या आशिर्वादाने वाळूची अवैध वाहतुक सुरू आहे असा प्रश्‍न उपस्थित होवू लागला आहे.

लोकेशनसाठी स्‍वतंत्र माणसं !

कुंभार पिंपळगांवातून महसूल किंवा पोलीसांची एखादी गाडी गोदापात्राच्‍या दिशेने जात असल्‍याचे लक्षात येताच जागोजागी असलेली माणसं तात्‍काळ वाळू माफीयांना लोकेशन देतात, लोकेशन देणारी माणसं कुंभार पिंपळगांवात तसेच कॅनॉलजवळ, गोदापात्राजवळ अशा अनेक ठिकाणी उपस्थित असतात.

लोकेशन देण्‍यासाठी ठेवण्‍यात आलेल्‍या माणसाकडे वाहने सुध्‍दा आहेत, म्‍हणजेच एखाद्यावेळी महसूल किंवा पोलीसांची गाडी कोणत्‍या दिशेने, कोणत्‍या रोडने जात आहे हे पाहण्‍यासाठी पाठलाग करण्‍यात येत असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

एवढंच नव्‍हे तर संबंधित मार्गावर अनेक ठिकाणी कोणाला संशय येवू नये म्‍हणून लोकेशन देणारी माणसं कॅनॉलच्‍या बाजुला व इतर ठिकाणी झोपण्‍याचे सुध्‍दा नाटक करत असतात, त्‍यामुळे बऱ्याचदा संशय येत नाही. शिवाय रस्‍त्‍याच्‍या कडेला दुचाकी किंवा चारचाकी वाहन उभे करूनही लोकेशन दिले जाते. त्‍यामुळे या लोकांचाही तपास होणे आवश्‍यक आहे.

महसूल – पोलीस दोघांचे दुर्लक्ष !

गोदापात्रातून अवैधरित्‍या उत्‍खनन केलेली वाळू कुंभार पिंपळगांवातून नियमित जात आहे, दररोज रात्री वाळूची अवैध वाहतुक होत असतांना महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत आहे आणि पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करत आहे, त्‍यामुळे वाळू माफीयांनी कोणाकोणाला मॅनेज केले आहे असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

समन्‍वयाचा अभाव !

महसूल आणि पोलीस प्रशासनात समन्‍वयाचा अभाव असल्‍याचे दिसून येत आहे. कारण दोन्‍हीकडे कर्मचारी कमी असल्‍याचे सांगितले जाते, परंतू दोन्‍ही संयुक्‍तपणे कार्यवाही का करीत नाही, दोघे आपापली जबाबदारी झटकू शकतात का ? हा सुध्‍दा प्रश्‍न आहे.

कुंभार पिंपळगांवात प्रचंड धूळ !

सदरील वाळूची वाहने भरधाव वेगाने कुंभार पिंपळगांवातून जात असल्‍याने सर्व परिसरात प्रचंड प्रमाणावर धुळ दिसून येत आहे, रस्‍त्‍याने जाणाऱ्या इतर वाहनांना सुध्‍दा समोरचे काही दिसत नाही, शिवाय इतर नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वरिष्‍ठांचे दुर्लक्ष ?

गोदापात्रातून दररोज लाखो रूपयांची वाळू तस्‍करी होत असतांना महसूल व पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून वरिष्‍ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणार का ? अर्थातच कारवाईचे आदेश देणार का ? असा प्रश्‍न या निमित्‍ताने उपस्थित होत आहे.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!