Your Alt Text

कुंभार पिंपळगाव व परिसरात धाब्‍यांवर अवैधरित्‍या देशी-विदेशी दारू विक्री ! हिरव्‍या पार्क मध्‍येही सावळा गोंधळ !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे. अर्थातच निवडणुकीचा काळ असल्‍याने वाहत्‍या गंगेत अनेकजण हात धुवून घेत असल्‍याने धाब्‍यांवर देशी व विदेशी दारूची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव व परिसरात अनेक धाबे (हॉटेल) सुरू आहेत, फक्‍त जेवणाकरीता सुरू करण्‍यात आलेले हे धाबे मर्यादित न राहता त्‍यापैकी अनेकांनी देशी / विदेशी दारू, बिअर विक्री अथवा उपलब्‍धतेचे नियोजन केले आहे. कोणी उघडपणे तर कोणी लपूनछपून दारू, बिअर विक्री करत आहेत.

बॉक्‍स पार्सल सुध्‍दा सुरू !

देशी विदेशी दारू, बिअर इत्‍यादींची मोठ्या प्रमाणावर अवैध विक्री तर सुरूच आहे, शिवाय अवैधरित्‍या दारू, बिअरचे बॉक्‍स ठिकठिकाणी पार्सल केले जात आहेत. विविध गावांमध्‍ये हे बॉक्‍स पार्सल होत असून धाब्‍यावर (फॅमीली रेस्‍टॉरंटसह) सुध्‍दा बॉक्‍स लपूनछपून साठवणूक व विक्री केली जात आहे.

स्‍वच्‍छतेचे तिनतेरा !

सदरील धाब्‍यांवर अनेकजण चांगले जेवण मिळेल या आशेने जात असतात, परंतू ज्‍या ठिकाणी जेवण बनवले जाते तेथे मोठ्या प्रमाणावर अस्‍वच्‍छता असल्‍याचे दिसून येत आहे. पुढे बसलेल्‍या ग्राहकांला मागे काय चाललंय याचा थांगपत्‍ता लागत नाही. अस्‍वच्‍छतेमुळे तसेच जेवणात वापरण्‍यात येणारे पदार्थ सुमार दर्जाचे वापरण्‍यात येत असल्‍याने नागरिकांच्‍या आरोग्‍यावर परिणाम होण्‍याची शक्‍यता आहे.

हिरव्‍या पार्कमध्‍ये सावळा गोंधळ !

फॅमिली रेस्‍टॉरंट प्रमाणे सुरू करण्‍यात आलेल्‍या अंबड रोडवरील हिरव्‍या पार्क मध्‍ये सुध्‍दा मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ सुरू आहे. दारू, बिअर पिणारे मोठ्या प्रमाणावर या हिरव्‍या पार्क मध्‍ये बसलेले असतांना फॅमिली सोबत जेवण करायचे कसे ? असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. एवढंच नव्‍हे तर या हिरव्‍या पार्क मध्‍ये जेवणात गिरवी किंवा मसाला पदार्थ सुध्‍दा अनेक दिवसांचा वापरला जात असून इतर नियमबाह्य गोष्‍टी सुध्‍दा येथे घडत असल्‍याचे नागरिक सांगत आहेत.

संबंधित विभागाने लक्ष द्यावे !

कुंभार पिंपळगांव व परिसरात गावाच्‍या बाहेर असलेल्‍या धाब्‍यांवर, हॉटेल व  रेस्‍टॉरंट मध्‍ये जेवणाकरीता बनवण्‍यात येत असलेले खाद्य पदार्थ यांची तपासणी अन्‍न व औषधी प्रशासनाने करणे आवश्‍यक आहे. तसेच अवैधरित्‍या विक्री होत असलेली देशी, विदेशी दारू, बिअर इत्‍यादींची राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाने तातडीने तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, शिवाय निवडणूक विभागानेही या सावळ्या गोंधळाकडे लक्ष द्यावे अशी मागणी कुंभार पिंपळगांव व परिसरातील नागरिकांनी केली आहे.  


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!