Your Alt Text

घनसावंगी शहरालगत कोट्यावधी रूपयांची बेकायदेशीर प्‍लॉटिंग ! N.A. न करता नियमबाह्य प्‍लॉट विक्री ! आशीर्वाद कोणाचा ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
शासनाचे नियम कायदे धाब्‍यावर बसवून प्‍लॉटींग काढण्‍याचा आणि बेकायदेशीरपणे कोट्यावधी रूपये कमावण्‍याचा जणू ट्रेंडच सुरू झाला आहे. एन.ए. (अकृषिक) व लेआऊट न करता मनात येईल तेथे जमीन घेवून प्‍लॉट विक्री सुरू करायची अशी पध्‍दत मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी शहरालगत अथवा जवळच असलेल्‍या सुतगिरणी परिसरात तसेच रामगव्‍हाण शिवारात बेकायदेशीरपणे प्‍लॉटींग काढून प्‍लॉट विक्री केले जात आहेत. प्‍लॉटींग काढण्‍यापूर्वी शासन अथवा प्रशासनाकडून एन.ए. परवानगी घ्‍यावी लागते, लेआऊट करावे लागते, इतर नियमांचे पालन करावे लागते, कर भरावा लागतो, मात्र असे न करता सदरील जमिनीवर थेट प्‍लॉटिंग काढण्‍यात आली आहे.

विशेष म्‍हणजे सदरील प्‍लॉटींग करणारे कोणाचीही भिती न बाळगता सर्रासपणे त्‍याचा प्रचार करत आहे आणि सर्वसामान्‍य नागरिक सुध्‍दा यांच्‍याकडे संपर्क साधत आहेत. प्‍लॉटींगवाल्‍यांनी लाखो गुंतवूण कोट्यावधी रूपये कमवण्‍याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू केला असून संबंधित यंत्रणा किंवा तहसील प्रशासन याबाबत मुग गिळून गप्‍प बसले आहे.

नियमबाह्य प्‍लॉट विक्री !

सुतगिरणी जवळ आणि घनसावंगी शहरालगत काढण्‍यात आलेली प्‍लॉटिंग नियमबाह्यपणे काढण्‍यात आली असून शासनाचे सर्व नियम धाब्‍यावर बसवण्‍यात आले आहेत. विशेष म्‍हणजे सदरील प्‍लॉटिंग करतांना अकृषिक (NA) व लेआउट मंजूर करून घेणे आवश्‍यक असतांना शासनाची अशी कुठलीही परवानगी घेण्‍यात आली नसल्‍याची माहिती समोर आली आहे. त्‍यामुळे फक्‍त बॉण्‍डच्‍या सहाय्याने ग्रामपंचायतच्‍या आशिर्वादाने बेकायदेशीरपणे प्‍लॉट विक्री सुरू आहे का ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जेथे तेथे प्‍लॉटींग !

घनसावगी शहरालगत चारही दिशेला प्‍लॉटींग दिसून येत आहेत, अनेक ठिकाणी काढण्‍यात आलेल्‍या प्‍लॉटिंग ह्या मुळ मालकाच्‍या नावावरच आहेत. संबंधित मुळ मालकाला किंवा शेतकऱ्याला काही पैसे अॅडव्‍हान्‍स देवून आणि १ ते दिड वर्षानंतर पैसे देण्‍याची बोली करून इसारपावतीच्‍या आधारे जमीन ताब्‍यात घेतली जात आहे आणि त्‍यानंतर लगेचच जमिनीत दगडं रोवून प्‍लॉट विक्री सुरू केली जात आहे. मात्र जमिनच सदरील प्‍लॉट विक्री करणाऱ्या प्‍लॉटींगवाल्‍यांच्‍या नावावर नाही मग ते प्‍लॉट विक्री कशी करत आहेत असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जबाबदार कोण ?

रामगव्‍हाण खु. शिवारातील सदरील प्‍लॉटींग बाबत तलाठी बी.आर.भुसारे यांच्‍याशी संपर्क साधला असता सदरील प्‍लॉटींग मध्‍ये माझा काही रोल नाही, याबाबत ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी) यांना माहिती असेल असे सांगितले. तर रामगव्‍हाण खु. चे ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी) आर.एस.सपाटे यांच्‍याशी संपर्क साधला असता मी काही दिवसांपूर्वीच जॉईन झालो आहे त्‍यामुळे मला याबाबत सांगता येणार नाही, परंतू माहिती घेवून सांगतो असे सांगितले. तसेच याबाबत दुय्यम निबंधक (रजिस्‍ट्री ऑफीस) पैठणे मॅडम यांच्‍याशी संपर्क साधला असता एन.ए. केलेल्‍या प्‍लॉटचीच आम्‍ही रजिस्‍ट्री करतो, एन.ए. (N.A.) न करता प्‍लॉटींग काढली असेल तर ती बेकायदेशीर आहे असे त्‍यांनी सांगितले.

आशिर्वाद कोणाचा ?

संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, संबंधित सज्‍जाचे तलाठी, तहसीलदार, दुय्यम निबंधक कार्यालय (रजिस्‍ट्री ऑफीस) यापैकी सदरील प्‍लॉटिंगला जर कोणाचीच मान्‍यता किंवा सहकार्य नसेल तर मग ही बेकायदेशीर प्‍लॉटिंग नेमकी कोणाच्‍या आशिर्वादाने सुरू आहे ? रजिस्‍ट्रीचे प्‍लॉट म्‍हणून लोकांकडून लाखो रूपये उकळले जात आहे त्‍यामुळे वरिष्‍ठ अधिकारी किंवा प्रशासन सदरील बेकायदेशीर प्‍लॉटिंगवर काही कारवाई करणार का ? हेच पाहणे महत्‍वाचे ठरणार आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!