एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या बेकायदेशीर प्लॉटिंगचा धडाकाच सुरू असून, शासकीय नियम आणि कायद्यांची सर्रास पायमल्ली होत आहे. जमीन नावावर नसताना किंवा कोणतीही शासकीय परवानगी न घेता केवळ थोडेफार पैसे अॅडव्हान्स देऊन शेतकऱ्यांकडून जमीन ताब्यात घेतली जात आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारची परवानगी (NA) किंवा लेआऊट न करता केवळ बॉण्डवरच प्लॉटची सर्रास विक्री केली जात आहे.
अशा प्रकारच्या बेकायदेशीर प्लॉटची रजिस्ट्री करता येत नसल्याचे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात या प्लॉटिंगच्या जाहिराती, सौदे आणि व्यवहार जोरात सुरू आहेत. त्यामुळे ही प्लॉटिंग कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बेकायदेशीर प्लॉटिंग !
अनेक प्रकरणांमध्ये प्लॉट विक्री करणाऱ्यांच्या नावावर संबंधित जमीन अजूनही नाही. शेतकऱ्यांना फक्त काही रक्कम अॅडव्हान्स देऊन त्यांच्याकडून ताबा घेतला जातो, आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र जमीन अधिकृतरीत्या हस्तांतरीत न झाल्याने ती कायदेशीरदृष्ट्या प्लॉटिंगसाठी पात्रच ठरत नाही. याशिवाय शासनाची कोणतीही परवानगी नाही, अकृषिक परवाना नाही, नगररचना विभागाकडून लेआउट मंजुरी नाही तरीही ही बेकायदेशीर प्लॉटिंग खुलेआम सुरू आहे.
नियम काय म्हणतो ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम 44 नुसार, कोणत्याही शेतजमिनीचा वापर निवासी, व्यावसायिक किंवा इतर कोणत्याही गैरशेती कारणासाठी करायचा असेल तर ती जमीन ‘अकृषिक’ (NA) करण्यासाठी तहसीलदाराची किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक असते. याशिवाय, प्लॉटिंग करायची असल्यास सर्वेक्षण, लेआऊट प्लॅन किंवा संपूर्ण नकाशा (रस्ते, गटार, पाणी पुरवठा, मोकळ्या जागा इ.माहितीसह) तयार करावा लागतो आणि नगररचना किंवा ग्रामपंचायतची परवानगी घ्यावी लागते. सोबतच ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचे तर शहरी भागात नगरपालिकेचे NOC (नाहरकत प्रमाणपत्र) घ्यावे लागते, प्लॉटींग काढणाऱ्याच्या नावावर ७/१२ असणे आवश्यक असते इत्यादी प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असते. त्याशिवाय प्लॉटिंग काढता येत नाही.
तालुक्यात जिकडे तिकडे प्लॉटिंग ?
घनसावंगी शहर परिसरासह तालुक्यातील अशी एकही दिशा नाही जिकडे प्लॉटिंग सुरू नसेल, तालुक्यातील विविध गावांमध्ये सर्रासपणे बेकायदेशीर प्लॉटिंग सुरू आहे, ज्याच्या मनात येईल तो थोडेफार पैसे अॅडव्हान्स देवून शेतकरी किंवा जमिनधारकाकडून जमीन ताब्यात घेत आहे आणि प्लॉटिंग काढून गोरखधंदा सुरू करत आहे. अर्थातच कोणाच्या तरी आशीर्वादा शिवाय हे शक्यच नाही.
आशिर्वाद कोणाचा?
या बेकायदेशीर घडामोडींमध्ये स्थानिक प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, दुय्यम निबंधक कार्यालय यापैकी कोणाचीही या प्लॉटिंगला जर अधिकृत मान्यता नसेल तर मग हे सर्व व्यवहार कोणाच्या संमतीने आणि संरक्षणाखाली सुरू आहेत, हा खरा प्रश्न आहे. एकीकडे कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होत आहेत, आणि दुसरीकडे प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे.
प्रशासन कारवाई करणार का ?
बेकायदेशीर प्लॉटिंगमुळे सामान्य नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. आवश्यक त्या परवानग्या घेतल्याशिवाय असे प्लॉट वैध ठरणार नाहीत, आणि त्यावर कोणतेही बांधकाम परवानगीशिवाय करता येणार नाही. त्यामुळे अशा व्यवहारात गुंतलेल्या लोकांचे आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन घनसावंगी तालुक्यातील या बेकायदशीर प्लॉटींगची चौकशी करून कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुढील पंचनामा लवकरच…
इतर बातम्या खाली पहा…
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित प्राप्त करण्यासाठी एल्गार न्यूजच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा, किंवा 9890515043 हा क्रमांक तुमच्या व्हाट्सअॅप ग्रुप मध्ये अॅड करा…
