परवेज पठाण (एल्गार न्यूज) :-
घनसावंगी तालुक्यातील पाडूळी खु. शिवारात कोट्यावधी रूपयांची बेकायदेशीर प्लॉटिंग सुरू असून कोणत्याही प्रकारचे N.A. न करता किंवा परवानगी न घेता प्लॉट काढून विक्री करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जमीन अजूनही मुळ मालकाच्या नावावरच आहे, तरीही नियमबाह्यपणे प्लॉट विक्री करण्यात येत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील पाडूळी खु. शिवारात (कुंभार पिंपळगांव ते घनसावंगी महामार्गा लगत) शासनाचे सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे प्लॉटिंग काढून सर्रासपणे फक्त बॉण्डच्या सहाय्याने विक्री करण्यात येत आहे. प्लॉटिंग थोडीफार नव्हे तर कोट्यावधी रूपयांची असून या लोकांना नेमका आशिर्वाद कोणाचा आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
बेकायदशीर प्लॉटिंग !
कोठेही प्लॉटिंग करायची असल्यास एन.ए. करून अथवा आवश्यक ती प्रोसेस करून शासनाची परवानगी घ्यावी लागते. मात्र पाडूळी खु. शिवारात अशा प्रकारची कुठलीही परवानगी न घेता अथवा NA न करता प्लॉटिंग काढून सर्रासपणे विक्री करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जे लोक प्लॉट घेत आहेत ते कुठलीही शहानिशा न करता व चौकशी न करता प्लॉट घेत असल्याचे दिसत आहे.
जमीनच नावावर नाही !
जे व्यक्ती प्लॉटिंग काढून विक्री करत आहेत त्यांच्या नावावर संबंधित जमिनच नाही, मग ते कोणत्या आधारावर प्लॉट विक्री करत आहेत. आजघडीला सदरील जमिन मुळ मालक अथवा शेतकऱ्याच्या नावावरच आहे. फक्त काही पैसे अॅडव्हान्स देवून सदरील जमीन ताब्यात घेवून त्यावर प्लॉटिंग काढण्यात आली आहे. सध्या ज्या व्यक्तींनी प्लॉटिंग काढली आहे त्या व्यक्तींच्या नावावर ती प्लॉटिंगची जमिनच नाही, मग प्लॉटिंग करणाऱ्यांना प्लॉट विक्रीचा अधिकार कोणी दिला ? असाही सवाल उपस्थित होत आहे.
प्लॉटिंगचा धंदा कसा ?
उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याकडे 3 एकर जमिन आहे, तेव्हा प्लॉटिंग करणारे लोक त्या शेतकऱ्याला थोडेफार पैसे अॅडव्हान्स म्हणून देतात व बाकीचे पैसे 1 ते 2 वर्षाच्या करारावर देण्याचे ठरते. आज रोजी सदरील जमिन मुळ मालक असलेल्या शेतकऱ्याच्या नावावरच असते. तरीही प्लॉटिंग करणारे लोक 1 किंवा 2 वर्षांची वाट न पाहता किंवा स्वत:च्या नावावर जमिन येण्याआधीच शासनाची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे प्लॉटिंग काढून बॉण्डच्या सहाय्याने विक्री करत आहेत.
तलाठी व ग्रामसेवकांचे मत !
याबाबत लिंबोणी-पाडूळी खु. ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री.पटेकर यांना विचारले असता आमच्या ग्रामपंचायत मध्ये सदरील प्लॉटिंगची कोणत्याही प्रकारे नोंद झालेली नाही असे सांगितले. तर लिंबोणी-पाडूळी खु. चे तलाठी श्री.वैद्य यांना विचारले असता सदरील बेकायदेशीर प्लॉटिंगला कोणत्याही प्रकारे सहकार्य करण्याचा प्रश्नच नाही असे त्यांनी सांगितले.
रजिस्ट्री ऑफीस संशयाच्या भोवऱ्यात !
कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता घनसावंगी दुय्यम निबंधक कार्यालय (रजिस्ट्री ऑफीस) प्लॉटची रजिस्ट्री करत आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून काढण्यात आलेल्या बेकायदेशीर प्लॉटींगला रजिस्ट्री ऑफीसचा आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे. सगळं घेणं देणं झाल्यावर अर्थातच बरंच पाणी रजिस्ट्री ऑफीस मध्ये मुरतंय असं म्हणायला हरकत नाही.
प्रकरणाचा तपास होणार ?
पाडूळी खु. शिवारात बेकायदेशीर प्लॉटींग होत असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे कळते. शासनाचे नियम कायदे बाजूला सारून बेकायदेशीरपणे काढण्यात आलेल्या प्लॉटींगची चौकशी करून यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर अथवा कर्मचाऱ्यांवर कारवाई होवू शकते असे सुत्रांनी सांगितले.
इनकम टॅक्स विभाग कुठंय ?
घनसावंगी तालुक्यातील पाडूळी खु. शिवारात कोट्यावधी रूपयांची प्लॉटींग काढण्यात येवून कोट्यावधीची रूपयांची उलाढाल करण्यात येत असतांना इनकम टॅक्स विभाग कुठंय ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. प्लॉटिंगसाठी एवढा पैसा आला कोठून ? संबंधित प्लॉटींग काढणाऱ्यांनी इनकम टॅक्स भरला आहे का ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
प्लॉटिंग बेकायदेशीर ! – तहसीलदार
पाडूळी खुर्द व परिसरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, काही जमिनींचे अकृषिक व लेआऊट मंजूर न करता प्लॉट पाडून सदर जमीन विक्री केले जात आहे, अशा जमिनीचे खरेदीखत होत नाही व अशा जमिनी साध्या बॉण्डवर खरेदी करणे हे बेकायदेशीर आहे, त्यामुळे अशा व्यवहारात नागरिकांची फसवणूक होवू शकते, त्यामुळे नागरिकांनी असे अकृषिक न केलेले प्लॉट किंवा जमीन खरेदी करू नये असे आवाहन तहसीलदार योगीता खटावकर यांनी केले आहे.