Your Alt Text

कोट्यावधीची बेकायदेशीर प्‍लॉटिंग ! कुंभार पिंपळगांवच्‍या लोकप्रिय ग्रामसेवकाने गांव चारही बाजूने विक्रीला काढलंय ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
कोणी बोलणारा नसल्‍यावर काय परिस्थिती होते याचे उत्‍तम उदाहरण म्‍हणजे कुंभार पिंपळगांवचे घेता येईल. गावाचे अनेक प्रश्‍न तर प्रलंबित आहेतच मात्र यात भर म्‍हणजे मागील काही वर्षांपासून सगळे नियम कायदे धाब्‍यावर बसवून ग्रामसेवकांच्‍या आशिर्वादाने कोट्यावधी रूपयांची बेकायदेशीर प्‍लॉटिंग सुरू आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे कोट्यावधी रूपयांची बेकायदेशीर प्‍लॉटिंग काढून विक्री करण्‍यात येत आहे. सदरील प्‍लॉटिंग काढतांना कुठल्‍याही नियमाचं पालन करण्‍यात आलेले नाही, सर्वात महत्‍वाचे म्‍हणजे NA न करता सर्रासपणे प्‍लॉटिंग काढण्‍यात आली आहे. अर्थातच स्‍थानिक ग्रामसेवक (ग्रा.पं.अधिकारी) यांच्‍या आशिर्वादाशिवाय हे शक्‍यच नाही.

गावाच्‍या चारही बाजूला प्‍लॉटिंग !

कुंभार पिंपळगांवात सध्‍या शेकडो कोटी रूपयांची बेकायदेशीर प्‍लॉटिंग सुरू आहे. यामध्‍ये अंबड रोड, आष्‍टी रोड, आष्‍टी रोडवरील मुर्ती फाटा व पेट्रोलपंप जवळ, गावातील झोपडपट्टीच्‍या मागे, नुतन वसाहतच्‍या मागे, राजाटाकळी रोड, भेंडाळा रोड, कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या जवळचा परिसर, तिर्थपुरी रोड, आझाद नगर मधून मागे जाणारा पांदन रस्‍ता, अरगडे गव्‍हाण रोड, बस स्‍थानक परिसर अशा अनेक ठिकाणी नियम कायदे धाब्‍यावर बसवून बेकायदेशीर प्‍लॉटिंग काढण्‍यात आली आहे.

प्‍लॉटिंगचा गोरखधंदा !

शेतकऱ्याला थोडेफार पैसे अॅडव्‍हान्‍स देवून जमीन ताब्‍यात घ्‍यायची आणि सगळी यंत्रणा आपल्‍या सासऱ्याचीच आहे असे समजून वाट्टेल तसे प्‍लॉट पाडून खुलेआम विक्री करायची असाच काही प्रकार कुंभार पिंपळगांव व परिसरात सुरू आहे. अर्थातच एन.ए. व इतर नियमांचे पालन न करता सर्रासपणे प्‍लॉटिंग काढून बॉण्‍डच्‍या आधारे विक्री केली जात आहे.

रजिस्‍ट्री कशी काय ?

आजघडीला रजिस्‍ट्री सुरू असेल किंवा बंद असेल, परंतू मागील काळात झालेल्‍या बेकायदेशीर प्‍लॉटिंग अंतर्गत कोट्यावधी रूपयांच्‍या असंख्‍य प्‍लॉट्सची रजिस्‍ट्री संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात कशी काय करण्‍यात आली याचे उत्‍तर मिळणे गरजेचे आहे. मागील काळात संबंधित कार्यालयाकडून सांगण्‍यात आले होते की, आम्‍ही बेकायदेशीर प्‍लॉटिंगची रजिस्‍ट्री करत नाहीत, परंतू या भागातील अनेक प्‍लॉटची रजिस्‍ट्री दुय्यम निबंधक कार्यालयात झाली आहे त्‍याचे काय ? असाही प्रश्‍न यानिमित्‍ताने उपस्थित होत आहे.

तलाठ्यांचे म्‍हणणे काय ?

कुंभार पिंपळगांव येथील तलाठी श्री.साळवे यांच्‍याशी संपर्क साधला असता, परवानगी न घेता कोणी प्‍लॉटिंग काढली असेल तर ती प्‍लॉटींग बेकायदेशीर आहे व त्‍यांच्‍यावर नियमान्‍वये दंडासह कारवाई होवू शकते असे त्‍यांनी सांगितले.

ग्रामसेवकाचा आशीर्वाद !

कुंभार पिंपळगांव येथील आजघडीला सुरू असलेली प्‍लॉटिंग व मागील काही वर्षात झालेली प्‍लॉटिंग ही सर्वप्रथम ग्रामसेवकांच्‍या आशिर्वादाने झालेली आहे. ग्रामसेवकांनी बेकायदेशीर प्‍लॉटिंगची नोंद ग्रामपंचायतला केली नसती तर गांव बेकायदेशीरपणे चारही बाजूने विक्रीला निघालं नसतं आणि इतर कार्यालयाचाही सहभाग वाढला नसता. ग्रामसेवक प्‍लॉटिंगवाल्‍यांच्‍या बोटावर का नाचत आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही.

प्रशासनाने चौकशी करावी !

संबंधित सर्व प्रशासनाने कुंभार पिंपळगावातील चारही बाजूला झालेल्‍या शेकडो कोटींच्‍या बेकायदेशीर प्‍लॉटिंगची माहिती काढावी, ग्रामसेवकांची भूमिका काय ? रजिस्‍ट्री ऑफीस व तहसील कार्यालयाची भूमिका काय ? या सगळ्यांची चौकशी करून योग्‍य ती कारवाई करावी अशी मागणी कुंभार पिंपळगांव व परिसरातील नागरिकांनी केली आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!