एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव परिसरात घनसावंगी पोलीस ठाण्याच्या आशिर्वादाने लाखो रूपयांचा पत्याचा डाव असलेला क्लब (जुगार अड्डा) राजरोसपणे सुरू आहे. अक्षरश: जेवणाच्या पंगतीप्रमाणे पत्ते खेळण्यासाठी लोक बसत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव परिसरात जांबसमर्थ रोडला असलेल्या पेट्रोल पंपाच्या पलीकडच्या साईडने व तांड्याकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ पत्याचा क्लब राजरोसपणे सुरू आहे. सदरील क्लब (जुगार अड्डा) शेतामध्ये एका शेडमध्ये सुरू करण्यात आला असून गुगल मॅपवर सुध्दा हा शेड दिसून येत आहे.
लाखोंचा डाव !
या पत्त्याच्या क्लब मध्ये हजारा मध्ये नव्हे तर लाखो रूपयांचा डाव चालत असल्याचे सांगितले जात आहे. एकाच वेळी पत्याचा डाव खेळणाऱ्या लोकांचा आकडा हा 50 पर्यंत सुध्दा जात असतो. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कधी कधी 20 लाखांच्या पुढे डाव जातो आणि तो 30 ते 40 लाखांपर्यंत जात असतो.
पत्याचा डाव खेळणारे फक्त कुं. पिंपळगांवातले नाहीत तर आसपासच्या अनेक गावातले लोक सुध्दा आहेत. सदरील पत्याचा क्लब दोन चार दिवसात सुरू झालेला नसून गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरू आहे. मात्र या क्लबवर कुठलीही कार्यवाही होतांना दिसत नाही.
गोरगरीबांसाठी 100 रूपये निघत नाहीत पण पत्त्यांसाठी…!
सदरील पत्त्याच्या क्लबमध्ये खेळणारे परिसरातील अनेक लोक लाखो रूपये या जुगार मध्ये हरतात, पण एखाद्या गरीब माणसाला देण्यासाठी यांच्याकडे 100 रूपये निघत नाहीत, एकीकडे दुष्काळ सदृष्य परिस्थिती आणि दुसरीकडे लाखोंचा डाव हा विरोधाभास समजण्यापलीकडे आहे.
पोलीस येवून गेले ?
एका स्थानिक व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी सदरील क्लब परिसरात पोलीस दिसून आले होते, मात्र हे पोलीस कोणत्या पोलीस ठाण्याचे आहेत हे सांगता येत नसल्याचे त्यांनी सांगितले, मात्र प्रश्न हा येतो की, कुठलेही पोलीस जर या भागात येवून गेले असतील तरीही घनसावंगी पोलीसांना हे माहित नसेल का ?
हप्त्यामुळे हात बांधलेले ?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पत्त्याचा क्लब चालवणारे पोलीस ठाण्याला खुश ठेवतात, खिसे गरम झाल्यामुळे घनसावंगी पोलीस ठाण्याकडून कसल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. एखाद्या वेळी वरिष्ठांचा दबाव आल्यास मी मारल्यासारखो करतो तू रडल्यासारखं कर असे दर्शवण्यात येते आणि नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होते.
पोलीस दलात अनेक इमानदार !
पोलीस दलात अनेक इमाने इतबारे कर्तव्य बजावणारे पोलीस आहेत यात शंका नाही, त्यांच्या विषयी समाजा मध्ये आदरच आहे, परंतू काही अधिकारी / कर्मचारी कर्तव्यात कसूर करत असल्यामुळे इतर पोलीस सुध्दा बदनाम होत आहेत. याचा विचार करणे आवश्यक आहे.
पोलीस अधिक्षक लक्ष घालणार का ?
कुंभार पिंपळगांव परिसरात लाखोंचा डाव असलेले पत्त्यांचे क्लब कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहेत ? पोलीसांना या पत्त्याच्या क्लबची माहिती आधीपासूनच नाही का ? जर माहिती आहे तर मग कार्यवाही का नाही ? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असून पोलीस अधिक्षक या प्रकरणात लक्ष घालणार की दुर्लक्ष करणार हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.