एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे अवैध धंदे जोमात सुरू असून या अवैध धंदे करणाऱ्यांना कोणाचाही धाक राहीलेला नाही, सर्व प्रकारचे अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू असल्यामुळे कोणीतरी कोणाचे खिसे गरम केल्याशिवाय असे होवूच शकत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.
अनेक ठिकाणी पत्याचे डाव :-
कुंभार पिंपळगांव व परिसरात कधी मार्केट कमिटीच्या मागे, कधी शेतात, कधी शेतात बांधलेल्या शेडमध्ये अशा विविध ठिकाणी पत्याचे डाव सुरू आहेत, पोलीस ठाण्या अंतर्गत पोलीस प्रशासनाला याची माहिती नाही असे नाही, परंतू वेळोवेळी खिसे गरम होत असल्यास कशाला कार्यवाही करायची कदाचित असे पोलीसांना वाटत असेल.
अवैध दारू विक्री सुरू :-
कुंभार पिंपळगांव सह परिसरात शिवाय अनेक गावात अवैध दारू सर्रासपणे विक्री सुरू असून पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारची कार्यवाही करतांना दिसत नाही. स्थानिक पोलीसांसोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे कार्यवाही होत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.
वाळूची अवैध वाहतुक :-
गोदापात्रातून अवैध वाळू सर्रासपणे सुरू असून महसूल आणि पोलीस प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नंबर प्लेटच नाही, मागील बाजूस असलेल्या नंबर प्लेट एक तर काढून टाकलेल्या आहेत किंवा पुसून टाकलेल्या आहेत.
लाखो रूपयांची वाळू सर्रासपणे वाहतुक केली जात असतांना महसूल प्रशासन आणि पोलीस याकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय आरटीओ विभाग सुध्दा या भागात तपासणी करतांना दिसून येत नाही, त्यामुळे वाळूची अवैध वाहतुक करणाऱ्यांना कोणाचीही भिती राहीलेली नाही.
मटका, गुटखा, गांजा पण…
गावात मटका छुप्या पध्दतीने घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. शिवाय पान टपऱ्यांवर गुटखा सुध्दा सर्रासपणे विक्री होत आहे, तसेच गांजा सुध्दा छुप्या पध्दतीने विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र पोलीस आणि संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.