एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
आज जी परिस्थिती आहे ती उद्या राहिलच याची शाश्वती कोणालाही देता येणार नाही. हिंदी मध्ये एक म्हण (कहावत) आहे की ऊंट कब किस करवट बैठेगा कोई नही जानता. अर्थातच राजकारणात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. राज्यात मागील काळात झालेल्या काही घडामोडी पाहता अशक्य काहीच नाही असे म्हणायला हरकत नाही.
राजेश टोपे यांची कारकिर्द !
घनसावंगी मतदारसंघातून (आधी अंबड – घनसावंगी मतदारसंघ) राजेश टोपे हे सलग ५ वेळा आमदार महणून निवडून आलेले आहेत, यामध्ये बराच काळ ते आधी राज्यमंत्री व नंतर कॅबीनेटमंत्री राहिलेले आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तसेच कोरोना काळात आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. अर्थातच ते अनेक वर्षांपासून राजकारणात असून राज्य सरकार मध्ये त्यांनी विविध खात्याचा आस्वाद घेतलेला आहे.
राजेश टोपे यांचे साम्राज्य विविध माध्यमातून पसरलेले असून त्यांच्याकडे २ कारखाने आहेत, अर्थातच त्यांच्या राजकीय कारकिर्दी मध्ये साखर कारखान्याची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. विस्तारलेली समर्थ शिक्षण संस्था आहे ज्यामध्ये अनेक शाळा, महाविद्यालये, इंजिनिअरिंग कॉलेज, लॉ कॉलेज अशी विविध महाविद्यालये आहेत. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुध्दा त्यांचे वर्चस्व राहिलेले आहे.
अस्वस्थता वाढली आहे का ?
राजेश टोपे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्था दिसत असल्याचे अनेकजण सांगत आहेत. त्यांच्या एकूण राजकीय कारर्किदीमध्ये ते खूप कमी काळासाठी सत्तेबाहेर राहिलेले आहेत. मागील काळात राज्यात सत्ता आली आणि पुन्हा गेली, परंतू तरीही किमान ते आमदार म्हणून कार्यरत होते, मात्र आता राज्यातही सत्ता नाही आणि मतदारसंघातही पराभव झाल्याने त्यांच्यात अस्वस्था वाढली असावी असे नागरिक सांगत आहेत.
आता पुढे काय ?
मागील काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटल्यानंतर राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. कदाचित विधानसभा निवडणुकीत मविआ सत्तेवर येईल असा त्यांना विश्वास असावा, परंतू तसे झाले नाही. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आता पुढील ५ वर्षे करायचे काय ? असा प्रश्न कदाचित त्यांना पडला असेल. सध्या केंद्रातही एनडीए सरकार असून राज्यातही महायुती सरकार असल्याने शिवाय विधानसभा निवडणुकीत विजयापासून वंचित रहावे लागल्याने आता पुढील वाटचाली बाबत ते संभ्रमात असावेत असेही जाणकार सांगत आहेत.
चर्चा काय ?
राजेश टोपे हे अनेक वर्षांपासून अजित पवार यांचे खंदे समर्थक राहिलेले आहेत, वर्षानुवर्षे दोघांचा संवाद आणि अर्थपूर्ण संबंध चांगले असल्याचे बोलले जाते. सध्या राजेश टोपे हे शरद पवार यांच्या पक्षात आहेत, मात्र पुढील वाटचाली बाबत ते निर्णय घेणार असल्याची चर्चा अधून मधून ऐकायला मिळत आहे. अजित पवार यांच्याशी असलेले चांगले संबंध पाहता येत्या काळात राजेश टोपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात अशी चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळत आहे.
आमदार होणार का ?
राजेश टोपे हे मागील काळात अजित पवार यांचे खंदे समर्थक राहिलेले आहे. सध्या हा विषय राहिलेला नाही की, वफा किसने की और बेवफा कौन है ? कारण दोन्ही कडून प्रेम सारखं असेल तर बाकीच्या गोष्टींना अर्थ उरत नाही. त्यामुळेच की काय उद्या जर अजित पवार यांनी (विधान परिषदेच्या आश्वासनासह) हात पुढे केला तर राजेश टोपे नकार देवू शकणार नाहीत अशी सध्याची परिस्थिती दिसत आहे. अर्थातच राजेश टोपे यांनी जर अजित पवार गटात प्रवेश केला तर अजित पवार त्यांना विधान परिषदेवर घेवून आमदार करू शकतात अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.
नेहमी प्रमाणे राजेश टोपे हे अत्यंत बिझी असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही, त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही. मात्र मतदारसंघात होत असलेल्या चर्चेत जर तथ्य असेल तर येत्या काळात राजेश टोपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि अजित पवारांनी विशेष प्रेम दाखवल्यास विधान परिषदेच्या माध्यमातून राजेश टोपे आमदार होवू शकतात आणि (अतिशयोक्ती वाटेल पण) अजित पवारांनी अधिकचे प्रेम दाखवल्यास त्याच्याही २ पाउल पुढे जावून टोपे हे मंत्री झाल्यासही आश्चर्य वाटणार नाही.
पक्ष निष्ठेचं काय ?
मातब्बर मंडळींनाच जर पक्ष निष्ठेची जुनी व्याख्या समजू नाही राहिली तर मीच कशाला जुनी व्याख्या घेवून बसू ! अन त्यात माझाच कार्यक्रम लागणार असेल तर मी नवीन पक्षात प्रवेश करून नवीन व्याख्या आत्मसात करायला काय हरकत आहे, असे कदाचित त्यांना किंवा त्यांच्या एखाद्या मित्राला वाटत असावे. त्यामुळेच की काय राहून राहून चर्चा होत असावी किंवा चर्चा घडवून आणली जात असावी अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.
चाय पे चर्चा !
राजेश टोपे यांनी अधिकृतपणे या विषयावर आजघडीला काही भाष्य केले नाही, परंतू मतदारसंघात सुरू असलेली “चाय पे चर्चा” पाहता त्यांच्या मनात काहीच चाललेलं नाही असंही म्हणता येणार नाही. कदाचित “मौके पे चौका” मारण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. सध्या सुरू असलेल्या गोष्टींमध्ये तथ्य आहे किंवा नाही हे येत्या काळात कळेलच, परंतू सध्या सुरू असलेली चर्चा पाहता अर्थकारण व राजकारणाच्या दृष्टीने पुढील काळात राजकीय प्रवासात बायपास मार्गाचा अवलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात कोणीच कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, त्यामुळे सध्याच्या आधुनिक राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. जर खरंच असं काही होणार असेल तर घनसावंगी मतदारसंघाचे राजकारण ३६० अॅंगलने फिरते की आहे तसेच राहते हेच पाहणे औत्सुक्याचे ठरेल यात शंका नाही.