एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव हे शहर व परिसर अनेक गोष्टींसाठी प्रसिध्द झाले आहे. काय मटका, काय गुटखा, काय गांजा, काय पत्ते, काय दारू ! कुंभार पिंपळगावात तर सर्व काही एकदम ओके सुरू आहे. येथे कुणाला समाधान (?) मिळत आहे, कोणाला रोजगार (?) मिळत आहे, कोणाला आनंद (?) मिळत आहे तर कोणाची दिवसभराची इच्छा पूर्ण होत आहे. अनेकजण वेगवेगळ्या विशेष धंद्या (?) तून कोट्यावधी रूपये जमा करत आहेत. खरं तर एवढ्या सगळ्या गोष्टी या शहर व परिसरात घडत असतील तर या शहराला आणि संबंधित अधिकाऱ्यांना एखादा पुरस्कार द्यायला काय हरकत आहे.
काय तो मटका ?
काय तो मटका अन काय तो खेळणाऱ्याचा कॉन्फिडन्स (?) एकदम ओकेच. कारण मटका लागला तर त्याला लावलेल्या पैशापेक्षा जास्त पैसे मिळणार असे वारंवार स्वप्न पडत असतात. कदाचित रोजगार देण्याच्या उदात्त हेतूने टपऱ्यांवर आकडे घेणे कमी होते की काय आता मोबाईलवर सुध्दा मटका घेतला जात आहे. ९९ टक्के लोकांचे पैसे जात असले तर काय झालं ? काहींचे परिवार उद्धवस्त झाले तरी काय अडचण ? कारण मटका खेळवणारे कोट्याधीश कसे होतील ? शिवाय बसल्या जागी अनेकांना वर हप्ताही पोहोचतो, त्यामुळे अनेकजण बर्बाद होत असले तरी काही जण का असेना सुखी होत आहेत अशीच काही भावना मटका खेळणाऱ्या किंवा खेळवणाऱ्यांची असावी.
काय तो गुटखा ?
काय तो गुटका आणि काय त्याचा स्वाद ? गुटखा खालल्यावर कचाकच चावून रस्त्यावर किंवा भिंतीवर थुंकल्यावर जो लाल भडक रंग दिसतो तो एकदम ओकेच असतो. अहो गुटखा खालल्याने गंभीर आजार किंवा मृत्यू सुध्दा होवू शकतो हे माहित असूनही अनेकजण खातात हा त्यांचा कॉन्फिडन्स (?) म्हणावा लागेल. बरं गुटखा विक्रीतून कोट्यावधीची उलाढाल सुरू आहे. ठोक विक्रेता कोट्यावधी कमवून उद्योजक बनले असून बहुतांश टपरी धारकांनाही रोजगार सुरू झाला आहे, शिवाय यंत्रणेतील अनेकांना बसल्या जागी हप्ता पोहोचत आहे, त्यामुळे गुटखा खाणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत असले तरी अनेकांचे कल्याण होत आहे अशी भावना गुटखा प्रेमींची असावी.
काय तो गांजा ?
काय तो गांजा अन काय त्याची नशा ? समोर मृत्यू दिसत असला तरी घेणारा म्हणतो एकदम ओके ! घेणाऱ्याच्या शरीरात काही मटेरियल राहिलं नाही, कवा कार्यक्रम लागेल माहित नाही पण एक झुरका ओढल्यावर त्यांना वेगळा आनंद मिळतो असं त्यांच्या बोलण्यावरून दिसते. त्यामुळेच की काय लाखो रूपयांचा गांजा बाहेरून गावात येवून त्यानंतर परिसरात जातो. आडोशाला बसून गांजा घेणारे दम मारो दम गाण्याची मजा घेत आहेत. गांजा विकणारेही लाखो कमवित आहेत आणि यंत्रणेतील अनेकांना बसल्या जागी हप्ता पोहोचत आहे, त्यामुळे गांजा ओढणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत असले तरी विक्री करून आमचं भलं होत असल्याची भावना गांजा विक्रेत्यांची असावी असेच दिसत आहे.
काय ते पत्ते ?
काय ते हिरवेगार झाड अन काय तो पत्यांचा डाव ? लाखोंचा खेळ एकदम ओके ! कुंभार पिंपळगावच्या चारही दिशेला शेतांमध्ये हिरव्यागार झाडांची थंड हवा घेत लवकर श्रीमंत होण्यासाठी (?) पत्याचा डाव म्हणजे जेवणाची पंगत बसल्यासारखीच असते. चारही दिशेला गेलेल्या रस्त्यांच्या आसपास किंवा शेतात सुरू असलेल्या खेळांच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल होत असेल. अहो, विश्वास बसणार नाही असेही लोक येथे दिसून येतात, मग विचार करा खेळण्यात आणि स्वत:चं वाजवून घेण्यात त्यांना किती आनंद मिळत असेल. आतापर्यंत अनेकजण बर्बाद झाले असले तरी खेळवणाऱ्यांनी आपला डाव साधून कल्याण करून घेतलं आहे. यंत्रणेतील अनेकांना बसल्या जागी हप्ता पोहोचत आहे, त्यामुळे पत्ते खेळणाऱ्यांचे आयुष्य बर्बात होत असले तरी ज्यांनी झाडाखाली किंवा शेतात शेड मारून गेम सुरू कला आहे त्यांचे मात्र कल्याण होत असल्याची भावना अनेकजण व्यक्त करत आहेत.
काय ती अवैध दारू ?
काय ती अवैध दारू, काय त्याचे नियोजन सगळं काही एकदम ओके ! अहो सगळंच सुरू आहे म्हटल्यावर दारू तरी मागे कशाला राहील. यंत्रणेने एवढी मोकळीक दिली आहे की, आता पर्यंत या शहरात व परिसरात अवैध दारू तर विक्री होत होतीच पण आता बनावट दारू सुध्दा जिकडे तिकडे पार्सल केली जात असल्याचे समोर आले आहे. D चाल माल विकून अनेकजण श्रीमंत होत आहेत. ओरीजनल दारूमुळे कमी लोकं मरत होती की काय आता बनावट दारू सुध्दा येत असल्याचे दिसते. कदाचित बेरोजगारी वाढल्यामुळे संबंधित यंत्रेणेने रोजगार उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने अवैध दारूला किंवा बनावट दारूला प्रोत्साहन देण्याचे ठरवले असावे. यंत्रणेवर ताण येवू नये म्हणून अवैध दारू विक्रेते रात्री किंवा पहाटेच्या सुमारास पार्सलची जबाबदारी पार पाडत आहेत. दारूच्या वाढत्या प्रमाणामुळे लोकं मरत असतील तर काय झालं पण आम्हा असंख्य विक्रेत्यांचे भले होत आहे अशीच काही भावना अवैध विक्रेत्यांची दिसून येत आहे.
म्हणूनच सगळं काही ओके सुरू ?
काय तो मटका, काय तो गुटखा, काय तो गांजा, काय ते पत्ते, काय ती अवैध दारू म्हणजे सगळं काय एकदम ओके सुरू ! असंच काही चित्र कुंभार पिंपळगांव शहर व परिसरात पहायला मिळत आहे. यंत्रणेणं वेगवेगळे अवैध धंदे सुरू करून लोकांना बर्बाद करण्याचे नियोजन करून अनेकांना श्रीमंत करण्याचे नियोजन करून ठेवल्याचे दिसत आहे. अवैध धंदे करणारेही मजेत आहेत आणि त्यांना रोखण्याची जबाबदारी असणारेही हप्ते घेवून मजेत आहेत कोणालाच काही अडचण नसल्यामुळे सगळं काही एकदम ओके सुरू आहे असंच म्हणायला हरकत नाही.
पदाधिकारी काय म्हणतात ?
कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असतांनाही काहीच कारवाई होत नसेल तर हे पोलीस व संबंधित प्रशासन यांचे सपशेल अपयश म्हणावे लागेल. फक्त बघ्याची भुमिका घेवून अवैध धंदे करणाऱ्यांना मोकळीक देणे म्हणजे स्वत:चे खिसे गरम करण्याचे नियोजन असल्याचे मत आरपीआय (ए) चे जि.उपाध्यक्ष विष्णू क.शिंदे यांनी व्यक्त केले आहे. तर अवैध धंदे करणाऱ्यांना पोलीस व संबंधित यंत्रेणेचा आशिर्वाद असून परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे वाढल्याचे कृ.उ.बा.समितीचे माजी संचालक शिवाजी कंटुले यांनी सांगितले. तर कुंभार पिंपळगांव व परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असून पोलीस ठाणे व संबंधित यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, अवैध धंद्यांमुळे अनेक परिवार उध्वस्त होत असून वरिष्ठांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव, हेमंत जगताप व कमलाकर शेटे यांनी व्यक्त केले आहे.