एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्ह्यात पाणी पुरवठा विभाग / यंत्रणा अशी काही जादू (?) करत आहे की, संबंधित गावात पाईपलाईन नसतांनाही त्या गावातील सर्व १०० % कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पाणी मिळत आहे. अर्थातच एल्गार न्यूजने जालना जिल्ह्यातील हर घर जल महाघोटाळा उघडकीस आणल्यानंतर आता एक एक करून जिल्ह्यातील विविध घोटाळे आणि त्यांचा गोंधळ समोर येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आष्टी धो.जो. (ता.परतूर) या शहरामध्ये कोट्यावधी रूपयांची पाणी पुरवठा मंजूर करण्यात आली होती, परंतू काही अपवाद सोडल्यास अद्याप शहरातील नागरिकांना या योजनेचे पाणी मिळालेले नाही, अर्थातच या योजने अंतर्गत संपूर्ण शहरात अद्याप पाईपलाईनच टाकण्यात आलेली नाही, तरीही आष्टी मध्ये १०० % कुटुंबांना नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळत असल्याची नोंद पाणी पुरवठा विभागाने शासन दरबारी केली आहे.
कोट्यावधीची पाणी पुरवठा योजना !
परतूर तालुक्यातील आष्टी या शहरासाठी शासनाने ४ कोटी १० लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. या कामाची वर्क ऑर्डर १०/११/२०२१ रोजी निघाली होती. या योजनेतून आष्टी शहरातील प्रत्येक कुटुंबाला (१०० %) नळ कनेक्शन द्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे अपेक्षित होते. मात्र योजने अंतर्गत अद्याप संपूर्ण शहरात पाईपलाईनच टाकण्यात आलेली नाही, तरी संपूर्ण शहरातील १०० % कुटुंबांना पाणी मिळत असल्याची शासन दरबारी नोंद करण्यात आली आहे.
शासनाकडे काय नोंद केली ?
शासनाकडे करण्यात आलेल्या नोंदीनुसार गावाची (शहराची) लोकसंख्या १४३४८ आहे, यामध्ये एस.सी.-१२७३, एस.टी.-२१५ आणि जरनल १२८६० नागरिकांचा समावेश आहे. आष्टीत कुटुंबांची संख्या २७१० असून (१०० %) सर्व २७१० कुटुंबांना नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळत असल्याची नोंद शासन दरबारी करण्यात आली आहे. ज्याचा स्क्रीनशॉट खाली दिला आहे.

सर्व शाळा व अंगणवाड्यांना पाणी पुरवठा !
शासनाकडे करण्यात आलेल्या नोंदीनुसार आष्टी मधील ११ शाळांना नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच १९ बालवाडी / अंगवाडी यांना सुध्दा नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एवढंच नव्हे तर प्राथमिक आश्रम शाळा आणि कम्युनिटी टॉयलेट (सार्वजनिक शौचालय) यांना सुध्दा नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. स्क्रीनशॉट खाली दिले आहेत.



ऑनलाईन पाणी पाजले का ?
आष्टी शहरासाठी २०२१ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या ४ कोटी १० लाखांची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्याची शासन दरबारी खोटी नोंद करण्यात आल्याचे दिसत आहे. या योजनेतून आष्टी मधील प्रत्येक कुटुंबाला (१०० %) नळ कनेक्शन द्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे अपेक्षित होते. मात्र योजने अंतर्गत अद्याप गावात पाईपलाईनच टाकण्यात आलेली नाही, तरी संपूर्ण गावातील १०० % कुटुंबांना पाणी मिळत असल्याची शासन दरबारी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला नळ कनेक्शनद्वारे ऑनलाईन पाणी पाजले की काय ? असा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे.
योजना कोणाच्या माध्यमातून ?
सदरील पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या माध्यमातून राबवण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर कार्यालय व त्याअंतर्गत नोडल डिव्हीजन कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जालना असून इतर विभाग जि.प. पाणी पुरवठा विभाग आहे. अर्थातच जालना जिल्ह्यात झालेला हर घर जल घोटाळा ज्या जि.प. पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून झालेला आहे त्या विभागाने आष्टी मध्ये सुध्दा माती खालली की काय असा सवाल उपस्थित होत आहे. स्क्रीनशॉट खाली दिला आहे.

योजना पूर्ण झाल्याची नोंंद !
आष्टी करीता असलेल्या ४ कोटी १० लाखाच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची वर्क ऑर्डर १०/११/२०२१ मध्ये निघाली होती. शासनाकडे करण्यात आलेल्या नोंदीनुसार ही योजना डिसेंबर २०२३ मध्ये १०० टक्के पूर्ण झाली असून बांधकाम व वीज पुरवठ्याचे कामही पूर्ण झाले आहे, शिवाय पाण्याचे प्रेशर व गळती चेक करण्यासाठी ट्रायल पण घेण्यात आली आहे, तसेच योजना पूर्ण झाल्यामुळे ग्रा.पं. ला २२/१२/२०२३ रोजी हस्तांतरीत सुध्दा करण्यात आल्याचेही शासन दरबारी नोंद करण्यात आली आहे. स्क्रीनशॉट खाली दिला आहे.

प्रश्न उपस्थित होतो की ?
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा या घोटाळ्यात सहभाग आहे का ? काम पूर्ण झालेले नसतांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शासन दरबारी नोंद कशी होवू दिली ? महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने शासन दरबारी नोंद होत असतांना प्रत्यक्ष पाहणी केली नाही का ? पाहणी केली असेल तर जाणीवपूर्वक डोळेझाक केली का ? महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता काम झाले आहे असे म्हणत असतील तर त्यांनी या कामात हात धुवून घेतले का ? ग्रामपंचायतची भूमिका काय ? हर घर जल घोटाळ्यात जि.प. ची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या पाणी पुरवठा विभागाने आष्टीत सुध्दा माती खालली का ? सदरील घोटाळा होत असतांना वरिष्ठ अधिकारी तोंडावर आणि डोळ्यावर पट्टी बांधून बसले होते का ? आष्टी पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
भ्रष्टाचार झाला का ?
आष्टी शहरासाठी शासनाने ४ कोटी १० लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती, कामाचा कालावधी संपून बराच काळ लोटलेला आहे, तरीही योजना अपूर्ण अवस्थेत असतांना त्याची चौकशी होण्याऐवजी उलट शहरातील योजनेचे संपूर्ण काम झाल्याचे नमूद करण्यात आले असून १०० % कुटुंबांना नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा होत असल्याचीही नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात अद्याप पाईपलाईन टाकण्यात आलेली नसतांना काम झाल्याची नोंद शासन दरबारी कशी करण्यात आली. आश्चर्य म्हणजे काम पूर्ण झालेले नसतांना संबंधित गत्तेदाराने २ कोटी ३३ लाख उचलल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय काय ? असा सवाल सुध्दा उपस्थित आहे.
जिल्ह्यात हर घर जल घोटाळा !
एल्गार न्यूजने जालना जिल्ह्यातील हर घर जल घोटाळा उघडकीस आणून आतापर्यंत १० भाग (बातम्या) प्रकाशित केले आहेत. इतर तालुक्यात असेल पण परतूर तालुक्यात हर घर जल घोटाळा झालेला नाही असे सांगितले जात होते, परंतू आष्टीच्या निमित्ताने हे स्पष्ट झाले आहे की, परतूर तालुक्यात सुध्दा हर घर जल घोटाळा झालेला आहे. आष्टीत पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असतांना काम पूर्ण झाल्याचे नमूद करून शासन दरबारी आष्टीची हर घर जल नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे नक्कीच गरजेचे आहे.
एल्गार न्यूजने आष्टी शहरातील काही नागरिकांशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, शहरात सदरील योजने अंतर्गत पाईपलाईनच झालेली नसल्याचे सांगण्यात आले. काही ठिकाणी नावाला पाईपलाईन केली असून अपवाद सोडल्यास सर्वांना नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळत नाही असे त्यांनी सांगितले. सदरील प्रतिक्रियांपैकी काही प्रतिक्रिया खालील प्रमाणे…
पाईपलाईन झालेली नाही ! – थोरात
आष्टी मध्ये नवीन पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाईप लाईन झालेली नाही, १० – २० टक्के पाईपलाईन झाली असेल पण संपूर्ण शहरात पाईपलाईन झालेली नाही. नळ कनेक्शनद्वारे शहरातील १०० % नागरिकांना पाणी मिळत असल्याचे कोणी म्हणत असेल तर ते खोटे आहे. सध्या शहरात काही ठिकाणी सुरू असलेला पाणी पुरवठा हा जुन्या पाईपलाईन मधूनच होत आहे. योजने अंतर्गत १२ कि.मी. काम झाल्याचे सांगण्यात येते, सदरील १२ कि.मी. काम कुठे झाले आहे संबंधितांनी दाखवावे. अंगणवाडी – शाळा येथेही पाणी पुरवठा होत नाही. नुसती बनवाबनवी सुरू आहे. सदरील कामाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
- रामप्रसाद थोरात,
माजी उपसभापती, पं.स., परतूर
योजनेचे काम बोगस – कडपे
आष्टी मध्ये ४ कोटी १० लाखाच्या पाणी पुरवठा योजनेचे काम बोगस करण्यात आले आहे. गावात या योजने अंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. साधारण २० ते २५ % पाईपलाईन काही मोजक्या ठिकाणी टाकली असेल, परंतू संपूर्ण शहरात पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. शहरातील १०० % टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा होत असल्याचे शासन दरबारी नोंद असेल तर ते साफ खोटे आहे. वॉटर ग्रीड योजनेचे पाणी सुध्दा काही ठिकाणीच येते, वॉटर ग्रीडचे पाईप अनेक ठिकाणी नाल्यांमधून येत असल्याने ते पाणी सुध्दा अशुद्ध येत आहे.
- भागवत कडपे,
माजी सरपंच, आष्टी
चौकशी होणार का ?
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून आष्टीतील पाणी पुरवठा योजनेचे काम झाल्याचे दिसत आहे. या घोटाळ्यात कोण सहभागी आहे हे समोर येणे आवश्यक आहे, त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी या घोटाळ्यात सहभागी नसतील तर ते या घोटाळ्याची चौकशी करणार का ? जिल्हाधिकारी जालना या प्रकरणात चौकशीचे आदेश देणार का ? मतदार संघाचे आमदार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुध्दा या प्रकरणात लक्ष घालणार का ? असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.