एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
दुकान व इतर महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यासाठी CCTV कॅमेरे लावणे ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. अनेक व्यवसायिकांनी आपली दुकाने, गोडाऊन, कार्यालये सुरक्षित ठेवण्यासाठी CCTV प्रणालीचा वापर सुरू केला आहे. पण प्रश्न असा आहे की, सुरक्षा उपाय म्हणून लावलेली ही यंत्रणा खरोखर किती सुरक्षित आहे ? आणि चोरटे जर DVR च घेऊन गेले, तर मग CCTV चा उपयोग काय ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
सध्या अनेक शहरांमध्ये, अगदी ग्रामीण भागातही CCTV असलेल्या दुकानांमध्ये चोरी झाल्यानंतर असा प्रकार दिसून येतो आहे की, चोर केवळ कॅमेरे फोडत नाहीत, तर ते रेकॉर्डिंग करणारे DVR (Digital Video Recorder) देखील सोबत घेऊन जातात. यामुळे संपूर्ण CCTV सिस्टम व्यर्थ ठरते आणि पोलीस तपासासाठी महत्त्वाचे असलेले फुटेज मिळू शकत नाही.
तुमचं CCTV खरंच सुरक्षित आहे का ?
CCTV यंत्रणा बसवली की आपण निश्चिंत होतो. पण DVR जर चोरांपासून सुरक्षित नसेल, तर संपूर्ण सिस्टमचा उपयोगच उरत नाही. म्हणूनच, “CCTV आहे म्हणजे सुरक्षा आहे” हा गैरसमज आहे. CCTV चा उद्देश फक्त चोरांना घाबरवणे नाही, तर चोरी झालीच तर पुरावे संकलित करणे हाही आहे. आणि तोच भाग – DVR – जर चोरीला गेला, तर सगळं व्यर्थ ठरू शकतं.
महत्वाचा पुरावाच गायब !
दुकानांमध्ये CCTV बसवले जातात खरे, पण बहुतांश वेळा त्या प्रणालीचे नियंत्रण (DVR) अगदी उघड ठिकाणी असते. कधी कधी कॅश काउंटरच्या जवळ, तर कधी दुकानाच्या मागच्या बाजूस. चोरट्यांना हे माहीत असते की DVR मध्येच सर्व रेकॉर्डिंग असते, त्यामुळे चोरी केल्यावर त्यांचा प्राथमिक उद्दिष्ट DVR चोरून नेणे हेच असते. म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की – केवळ CCTV बसवणे पुरेसे आहे का ? की DVR सुरक्षित ठेवणे हाही तितकाच महत्त्वाचा भाग आहे ?
मग DVR ठेवायचा कुठे ?
चोरटे जर २ पाऊल पुढे विचार करत असतील तर लोकांनी ४ पाऊल पुढे विचार करणे आवश्यक झाले आहे. CCTV कॅमेऱ्याचा फुटेज DVR मध्ये रेकॉर्ड होत असतो आणि चोरी झाल्यावर याच DVR मधील रेकॉर्डिंग पाहून पोलीस पढील तपास करत असतात. मात्र हाच DVR चोरीला गेला तर रेकॉर्डिंग किंवा फुटेज मिळण्याचा प्रश्नच येत नाही. अशा वेळी DVR सुरक्षित ठेवणे आवश्यक झाले आहे.
काही महत्वपूर्ण उपाय !
1) DVR सुरक्षित ठिकाणी लॉक करून ठेवा.
2) ऑनलाईन क्लाउड बॅकअपचा पर्याय देखील विचारात घ्या.
3) सुरक्षेच्या दृष्टीने अलार्म / सायरन चा सुध्दा विचार करा.
अजून एक प्रभावी उपाय !
सर्वात महत्वाचे म्हणजे जर शक्य असेल तर आपल्या CCTV चा DVR शेजारच्या दुकानात ठेवा आणि त्याचा DVR आपल्या दुकानात ठेवा. म्हणजे जरी DVR चोरीला गेला तरी शेजारच्या दुकानदाराचा आपल्या दुकानात असलेला DVR चोरीला जाईल, पण त्याच्याकडे असलेल्या DVR मध्ये आपल्या दुकानाचा CCTV फुटेज सुरक्षित राहील आणि पोलीसांना तपासात ते कामी येईल. (अर्थात आपल्या दुकानातून चोरीला गेलेला शेजाऱ्याचा DVR नवीन आणता येईल) अर्थात हा सर्वात प्रभावी उपाय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
स्मार्ट निर्णय गरजेचे !
नव्या तंत्रज्ञानाच्या युगात, स्मार्ट निर्णय गरजेचे आहे. CCTV आणि DVR ही तांत्रिक उपकरणं आहेत, पण त्यांचा उपयोग यशस्वी व्हावा असे वाटत असेल तर आपण थोडं ‘स्मार्ट’ विचार करणं गरजेचं आहे. चोरांच्या युक्त्या जसजशा बदलत आहेत, तसतसे आपले संरक्षणाचे मार्ग देखील ‘स्मार्ट’ आणि ‘स्ट्रॅटेजिक’ असले पाहिजेत.
DVR सुरक्षित जागेवर ठेवा ! – SP
चोरटे ज्या ठिकाणी चोरी करतात तेथे काही पुरावा राहू नये या उद्देशाने ते CCTV कॅमेऱ्याचे DVR सुध्दा सोबत घेवून जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी अथवा व्यापारी बांधवांनी आपल्या दुकानात DVR सहजपणे काढता येईल अशा ठिकाणी न ठेवता, सुरक्षित ठिकाणी ठेवावे. तसेच शक्य असेल तर CCTV चा बॅकअप ऑनलाईन क्लाऊड स्टोरेजवर सुध्दा ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- अजयकुमार बन्सल,
पोलीस अधिक्षक, जालना.