एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका सुरू आहेत. देशभरात एकूण 7 टप्प्यात मतदान होत आहे. लोकशाहीच्या या अत्यंत महत्वपूर्ण उत्सवात आपण सहभागी होवून प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. मात्र अनेक मतदारांकडे मतदान कार्ड नाही किंवा मतदान केंद्र कुठे आहे हे माहित नाही किंवा मतदार यादीतील क्रमांक माहित नाही. परंतू आता चिंता करण्याची गरज नाही.
निवडणूक आयोगाने देशातील मतदारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आपल्या मोबाईलवरच आपले मतदान क्रमांक, मतदान केंद्र, मतदार यादी क्रमांक व इतर माहिती अवघ्या 2 मिनिटात पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एवढंच नव्हे तर आपण आपले मतदान कार्ड सुध्दा सहज डाउनलोड करू शकता व इतर माहिती सुध्दा पाहू शकता.
माहिती कशी पाहणार ?
तुम्हाला मतदान केंद्र, मतदार यादी क्रमांक, मतदार कार्ड क्रमांक EPIC NO. इत्यादी माहिती पाहण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोर वरून “वोटर हेल्पलाईन” या नावाचे अॅप डाउनलोड करावे लागेल. (अॅपची लिंक खाली पण दिली आहे.) मतदान कार्डावरील क्रमांकानुसार माहिती पाहण्यासाठी खालील प्रमाणे प्रोसेस करा.
- अॅप डाउनलोड केल्यानंतर अॅप ओपन करा.
- सर्वात वर आडवी पट्टी दिसते ज्यामध्ये Search Your Name in Electoral Roll असे लिहीलेले असते त्यावर क्लिक करा.
- आता EPIC No. या पर्यायावर क्लिक करा.
- EPIC No. टाकल्यावर ok केल्यावर तुमची सर्व माहिती, जसे की, मतदार संघ, मतदान केंद्र, यादी क्रमांक व इतर माहिती समोर येईल. तुम्ही या माहितीला डाउनलोड करू शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता.
जर तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर ?
जर तुमचे नाव मतदार यादीत आहे परंतू तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर आधीप्रमाणेच खालील प्रोसेस करा.
- अॅप उघडल्यावर सर्वात वर आडवी पट्टी दिसते ज्यामध्ये Search Your Name in Electoral Roll असे लिहीलेले असते त्यावर क्लिक करा.
- वरच्या लाईनमध्येच तिसऱ्या नंबरवर असलेल्या Search by Details या पर्यायावर क्लिक करा.
- पहिल्या बॉक्स मध्ये फक्त तुमचे नाव टाका.
- त्याखालील बॉक्स मध्ये काहीच टाकू नका.
- त्याखालील बॉक्स मध्ये वडीलाचे फक्त नाव टाका.
- त्याखालील बॉक्स मध्ये आडनाव टाका.
- त्याखाली तुमचे अंदाजे वय टाका.
- त्याखाली पुरूष असेल तर Male आणि महिला असेल तर Female या पर्यायावर क्लिक करा.
- त्याखाली अनुक्रमे राज्य, जिल्हा आणि मतदार संघ निवडा.
- आता Search बटनावर क्लिक करा. आता सर्व माहिती तुमच्यासमोर येईल.
तुम्ही या माहितीची इमेज डाउनलोड करू शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता.