Your Alt Text

घनसावंगी तालुक्‍यासह जालना जिल्‍ह्यात एका दिवसात किती लाखांच्‍या ऑनलाईन वस्‍तू खरेदी होत असतील ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
ई-कॉमर्स कंपन्‍यांनी एखाद्या देशापुरते मर्यादित न राहता जागतिक पातळीवर आपला व्‍यापार सुरू केल्‍यामुळे शिवाय स्‍पर्धेचे धोरण आखल्‍यामुळे स्‍थानिक व्‍यापारी बांधवांच्‍या व्‍यवसायावर परिणाम होतांना दिसत आहे. व्‍यापाऱ्यांना विशेष करून छोट्या व्‍यापाऱ्यांना व्‍यवसाय करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

भारतात ई-कॉमर्स कंपन्‍या विविध प्रोडक्‍ट अथवा वस्‍तू विक्रीचा हजारो कोटींचा टप्‍पा पार करत आहेत, आधी शहरापुरत्‍या मर्यादित असलेल्‍या या ऑनलाईन कंपन्‍या आता छोट्या छोट्या गावापर्यंतही सेवा देत असल्‍यामुळे ग्रामीण भागातही त्‍यांची कोट्यावधी रूपयांची विक्री होत आहे. एकीकडे सरकार त्‍यांच्‍यावर बंदी आणू शकत नाही तर दुसरीकडे छोटे व्‍यापारी अडचणीत सापडल्‍याचे दिसत आहे.

जालना जिल्‍हा उदाहरण !

घनसावंगी तालुक्‍यातील ई-कॉमर्स (ऑनलाईन) कंपनीची किती विक्री होत असेल याबाबत एल्‍गार न्‍यूजने सहज माहिती घेतली असता अशी माहिती मिळाली की, तालुक्‍यात आणि जिल्‍ह्यात अनेक कंपन्‍यांचे प्रतिनिधी असून गाव पातळीवर अनेक कंपन्‍या आपले प्रोडक्‍ट पोहोचवत आहेत, आश्‍चर्य म्‍हणजे एका कंपनीची एका दिवसाची विक्री ही २० लाखाच्‍या जवळपास आहे, असेच जर दुसऱ्या कंपनीची २० लाख आणि इतरांची १० लाख जरी गृहीत धरली तरी एका दिवसात ई-कॉमर्स कंपन्‍या ५० लाख किंवा त्‍यापेक्षा जास्‍त किंमतीच्‍या वस्‍तूंची विक्री एका तालुक्‍यात करत आहेत.

याचाच अर्थ जर एका तालुक्‍यात एका दिवसात ५० लाख रूपयांची विक्री तर एका महिन्‍यात १५ कोटींची विक्री होत असेल, याचाच अर्थ जालना जिल्‍ह्यातील ८ तालुक्‍यात सरासरी १५ कोटी म्‍हटले तरी महिन्‍याला १२० कोटींची विक्री होत आहे आणि जालना शहर गृहीत धरून जवळपास महिन्‍यात जिल्‍ह्यात १५० कोटींची विक्री होत आहे असेच एकूण परिस्थितीवरून दिसत आहे.

विक्री यापेक्षाही जास्‍त !

सदरील आकडे हे एका कंपनीची एका तालुक्‍याची आणि एका दिवसाची २० लाख अशी माहिती मिळाल्‍यावरून इतर फक्‍त २-३ कंपन्‍यांची गृहीत धरून ढोबळ आकडेवारी देण्‍यात आली आहे, परंतू ऑनलाईन कंपन्‍यांची विक्री यापेक्षा कितीतरी पटीन जास्‍त असल्‍याचे अनेकांचे मत आहे. कारण ई-कॉमर्स (ऑनलाईन) कंपन्‍या फक्‍त २ ते ३ नाहीत, तर प्रमुख कंपन्‍या म्‍हटले तरी १० च्‍या जवळपास आहेत आणि सर्वांचे विक्रीचे आकडे काढले तर हे आकडे धक्‍कादायक असणार आहेत.

कोट्यावधीची विक्री !

प्राप्‍त माहितीनुसार कुंभार पिंपळगांव सारख्‍या सर्कलच्‍या गावात दररोज मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तू, इलेक्ट्रिकल वस्‍तू, कपडे, शूज, खेळणी, फॅशन प्रोडक्‍ट, गृहउपयोगी वस्‍तू, महिला व लहान मुलांसाठी असलेले विविध प्रोडक्‍ट असे अनेक लाखो रूपयांचे प्रोडक्‍ट दररोज येत आहेत. २० – ३० हजाराचे मोबाईल, एलईडी टीव्‍ही अशा वस्‍तू तर सहज मागवल्‍या जात आहेत. अर्थातच ५ ते १० लाख रूपयांच्‍या वस्‍तू दररोज गावात येत असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. मग जर एका गावाची एका दिवसाची ही परिस्थिती आहे तर तालुक्‍याची किती आणि जिल्‍ह्याची किती ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

प्रचंड स्‍पर्धा !

ई-कॉमर्स (ऑनलाईन) कंपन्‍या ह्या कोणतेही प्रोडक्‍ट शक्‍यतो थेट उत्‍पादकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात, उदाहरणार्थ या कंपन्‍या उत्‍पादक (Manufacturer) यांच्‍याकडून टीव्‍हीची खरेदी किंवा स्‍टॉक हजारोच्‍या संख्‍येने करत असल्‍याने अर्थातच त्‍यांना हे उत्‍पादक होलसेल पेक्षा खूप कमी किंमतीत टीव्‍ही देतात आणि त्‍यामुळे या ऑनलाइन कंपन्‍या ग्राहकांना मार्केट पेक्षा कमी किंमतीत टिव्‍ही विक्री करतात.

सर्वच वस्‍तू त्‍यांच्‍याकडे स्‍वस्‍त असतात असेही नाही. मात्र ज्‍या वस्‍तू त्‍यांना बल्‍क मध्‍ये घेतल्‍यामुळे स्‍वस्‍त पडल्‍या आहेत त्‍या वस्‍तू ते कमी दराने किंवा डिस्‍काउंट रेटने विक्री करत असल्‍याने ग्राहक त्‍यांच्‍याकडे आकर्षित होत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर वस्‍तू खरेदी करत आहेत. विशेष म्‍हणजे ग्राहकाने खरेदी केलेली एखादी वस्‍तू खराब किंवा मागणी केल्‍याप्रमाणे नसेल तर ती वस्‍तू सदरील कंपन्‍या परत घेवून पैसेही परत करत आहेत किंवा वस्‍तू बदलून देत आहेत, त्‍यामुळे ग्राहक ऑनलाईन वस्‍तू खरेदी करण्‍याकडे आकर्षित होत आहेत.

व्‍यापारी महत्‍वपूर्णच !

भारतीय अर्थव्‍यवस्‍थेत छोटा असो किंवा मोठा व्‍यापारी असो तो महत्‍वाचाच आहे यात शंका नाही, कारण अर्थचक्र हे मोठ्या प्रमाणावर व्‍यापारी बांधवांच्‍या माध्‍यमातून फिरत असते, पैसा मार्केट मध्‍ये फिरत असल्‍याने अनेकांना रोजगार मिळतो, अर्थव्‍यवस्‍था मजबूत होते. शिवाय स्‍थानिक व्‍यापारी वेळोवेळी हे आपल्‍या ग्राहकांना सहकार्य करतात त्‍यामुळे स्‍थानिक व्‍यापार मजबूत होणे आवश्‍यक आहे.

स्‍पर्धेचे युग !

ई-कॉमर्स कंपन्‍या ठाण मांडून बसल्‍या आहेत, खेळते भांडवल म्‍हणून त्‍यांच्‍याकडे कोट्यावधी रूपये आहेत. त्‍यामुळे ते स्‍पर्धात्‍मक रेट मध्‍ये वस्‍तू विक्री करत आहेत. उदाहरणार्थ एका व्‍यक्‍तीने मार्केट मध्‍ये ब्रांडेड टीव्‍हीची किंमत विचारली तर त्‍याला ८००० च्‍या आसपास सांगण्‍यात आली, जिल्‍हास्‍तरावर त्‍याने विचारपूस केली तर ७५०० ते ७७०० असे रेट सांगण्‍यात आले आणि तीच वस्‍तू त्‍याने ऑनलाईन पाहिली तर ६५०० मध्‍ये उपलब्‍ध होती, म्‍हणजेच साधारण १००० ते दिड हजार रूपयांचा फरक होता.

स्‍पर्धेच्‍या युगात व्‍यापारी बांधवांना ग्राहकांना योग्‍य किंमतीत वस्‍तू कशी उपलब्‍ध करून देता येईल शिवाय विक्री पश्‍चात सेवाही कशी देता येईल या दृष्‍टीने प्रयत्‍न करावे लागणार आहेत, वस्‍तू छोटी असेल तर ५० ते १०० चा फरक असल्‍यास हरकत नाही, आणि वस्‍तू मोठी असेल तर १०० ते २०० चा फरक असल्‍यासही अडचण नाही, ग्राहक स्‍थानिक बाजारपेठेत खरेदी करतील, परंतू जास्‍त फरक येत असल्‍यास विक्रीवर परिणाम होणार आहे. यापूर्वीच्‍या काळात परिस्थिती वेगळी होती परंतू आता ग्राहक एखाद्या वस्‍तूचे दर ऑनलाईन तात्‍काळ चेक करत असल्‍याने त्‍यांना फरक लक्षात येत आहे.

प्रोडक्‍टची रेंज !

बाजारपेठेत विशेष करून ग्रामीण भागात नजर फिरवल्‍यास तीच ती दुकाने दिसून येतात आणि प्रोडक्‍टही शक्‍यतो तेच असतात. गाव पातळीवर एका एका व्‍यवसायाचे ४०-४० दुकाने असतील तर तेवढे ग्राहक कुठून येतील. प्रत्‍येकजण ऑनलाईन कंपन्‍यांप्रमाणे हजारो प्रोडक्‍ट उपलब्‍ध करू शकत नाहीत परंतू एखाद्या कॅटेगरी नुसार प्रोडक्‍टची रेंज लावून तर व्‍यवसाय करायला काही अडचण नाही. त्‍यामळे ग्राहकांची विभागणी होईल आणि ग्राहकांनाही नवनवीन प्रोडक्‍ट योग्‍य दरात मिळाल्‍यास ऑनलाईन खरेदी करण्‍यापासून ग्राहक परावर्तीत होतील.

अपग्रेड होणे आवश्‍यक !

आतापर्यंत कसेबसे धकून गेले, परंतू आता बलाढ्य अशा कंपन्‍या मार्केट मध्‍ये आणि रिटेल मध्‍ये उतरल्‍या आहेत, ग्राहकांच्‍या गरजा, त्‍यांच्‍या अडचणी, त्‍यांच्‍या अपेक्षा या सर्वांचा विचार करून या कंपन्‍या पुढील पाऊल टाकत आहेत. या कंपन्‍यांची बरोबरी करणे जरी छोट्या व्‍यापारी बांधवांना शक्‍य नसेल तरी ग्राहकांच्‍या गरजा, ग्राहकांच्‍या अडचणी, त्‍यांच्‍या अपेक्षा आणि विशेष म्‍हणजे योग्‍य किंमतीत त्‍यांना वस्‍तू कशी उपलब्‍ध करून देता येईल आणि भविष्‍यातही तो ग्राहक आपल्‍याकडे पुन्‍हा कसा येईल या दृष्‍टीने व्‍यापारी बांधवांना प्रयत्‍न करावे लागणार आहेत. आजचे मार्केट किंवा बाजार हे रणभुमी प्रमाणे झाले असून या युद्धामध्‍ये विजयी होण्‍यासाठी अपग्रेड होणे, परिस्थिती नुसार बदल करणे, योग्‍य दरात ग्राहकांना सेवा देणे आणि परिस्थितीशी लढण्‍याची हिम्‍मत ठेवत पुढील वाटचाल करणे क्रमप्राप्‍त झाले आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!