एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेला म्हणजेच 4 तारखेला कोण कोण अर्ज मागे घेतो यावर बरंच काही अवलंबून होतं. सदरील शेवटच्या तारखेला अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले तर अनेकांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. आता कोण कोण उमेदवार रिंगणात आहेत हे स्पष्ट झाले आहे, अर्थातच मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
मतदारसंघातील जनतेचच नव्हे तर जालना जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या घनसावंगी मतदारसंघात मागील पंचवार्षिक प्रमाणे सरळ लढत होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. कारण महाविकास आघाडीकडून राजेश टोपे, महायुतीकडून डॉ.हिकमत उढाण, अपक्ष उमेदवार सतिष घाटगे, शिवाजीराव चोथे यांच्यासह इतर पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार निवडणूक लढणार हे निश्चित आहे.
जात फॅक्टरचा प्रभाव !
मागील पंचवार्षिकला झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस जात फॅक्टरचा प्रभाव राहणार असल्याचे दिसून येत आहे. जातीचा फॅक्टर किती प्रमाणात राहील हे सांगणे तुर्तास अवघड असले तरी त्याचा प्रभाव काही प्रमाणात का असेना राहणारच असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा आशिर्वाद कोणाला मिळतो आणि प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे व इतर ओबीसी नेते यांचा आशिर्वाद कोणाला मिळतो यावर सुध्दा बरंच काही अवलंबून राहणार असल्याचे दिसत आहे. अर्थातच उघडपणे कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही करायचं हे तुर्तास स्पष्टपणे सांगण्यात आलं नसलं तरी ऐनवेळी संबंधित नेत्यांनी इशारा दिल्यास त्याचा सुध्दा परिणाम या निवडणुकीवर होवू शकतो. शिवाय दलित, मुस्लिम यांची मते सुध्दा निर्णायक ठरणार असल्याचे दिसत आहे.
तारेवरची कसरत !
यावेळेसचे बदललेले राजकीय समिकरण, जातीय समिकरण, उमेदवारांची संख्या यासह इतर अनेक कारणांमुळे सध्याची निवडणूक नेहमीपेक्षा वेगळी राहणार असल्याचे दिसत आहे. कोणता फॅक्टर कोणाच्या कामी येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे कोणी कितीही म्हणत असले तरी प्रत्येकाला या निवडणुकीत तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.
ब्रम्हदेव आले तरी…!
मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टीने घनसावंगी मतदारसंघातून समृध्दी कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे पाटील यांनी निवडणूक लढवू नये किंवा फॉर्म दाखल करू नये यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र ब्रम्हदेव आले तरी मी माघार घेणार नाही, मी निवडणूक लढणारच, अशी भुमिका सतिष घाटगे यांनी घेतली. ब्रम्हदेव आले तरी माघार घेणार नाही म्हटल्यावर शिवाय बाशिंग बांधून तयार आहे म्हटल्यावर नेत्यांनी समजावण्याचा विषय सोडला असावा. अर्थातच आता सतिष घाटगे हे प्रचारात आणि डावपेच आखण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
टाइगर अभी जिंदा है !
घनसावंगी मतदारसंघाचे उमेदवार डॉ.हिकमत उढाण यांनी नुकतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, गेल्या 10 वर्षात त्यांनी राजकीय जमीनीची मशागत करून साखर पेरणी केलेली असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे पीक किती जोमात येते हे लवकरच कळणार आहे. त्यात निसर्गाची साथ सुध्दा महत्वाची राहणार आहे. राजकीय जमिनीची मशागत करतांना त्यांना अर्थातच अनेक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी नुकतंच पक्ष प्रवेशावेळी त्यांनी “जख्मी हुआ तो क्या हुआ टाइगर अभी जिंदा है” असे म्हटले होते. त्यामुळे जख्मी टायगर चे पुढचे पाऊल काय असेल हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.
नशीब आजमावण्याचा प्रयत्न !
माजी आमदार असलेले शिवाजीराव चोथे हे सुध्दा यावेळेस आपले नशीब आजमावत आहेत. ओबीसी फॅक्टरचा फायदा आपल्याला होवून कदाचित या सर्वांमध्ये आपला नंबर लागू शकतो या आशेवर त्यांनी निवडणूक लढवण्याचा विचार केला असावा असे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून त्यांनीही भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
डोंगरावरचे पाणी !
खरं तर राजेश टोपेंचे योगच म्हणावे लागेल. उदाहरणार्थ चारही दिशेला डोंगरं आहेत. आतापर्यंत डोगराच्या पायथ्याशी मध्यभागी राजेश टोपे असल्याने चारही दिशेने डोंगराचे येणारे पाणी राजेश टोपेंकडेच येत होते. अर्थात उतार राजेश टोपे यांच्याकडेच होता. मागील वेळेस ह्या पाण्याचा प्रवाह जवळपास 50 टक्के वेगळ्या मार्गाने गेल्याने राजेश टोपे यांना कसरत करावी लागली होती. त्यातच मागील पाच वर्षात डोंगरावरच्या पाण्याला पुन्हा वेगवेगळ्या दिशा मिळाल्या असाव्यात किंवा पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर विखुरला असावा, कदाचित पाण्याचा प्रवाह आपल्या दिशेने येण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करणे, योग्य ती काळजी घेणे हे राजेश टोपे विसरले असावेत, त्यामुळे त्या पाण्याने आपला मार्ग बदलला असावा.
आता प्रामुखयाने चार उमेदवार डोंगराच्या पायथ्याशी वेगवेगळ्या ठिकाणी उभे आहेत, चारही उमेदवार डोंगरावरचे पाणी आपल्याकडे कसं येईल यादृष्टीने प्रयत्न करीत आहेत. चारही उमेदवार पाण्याचा प्रवाह आपल्याकडे कसा परावर्तीत होईल, पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन कसे होईल आणि ते पाणी जनकल्याणासाठी कसे उपयोगी ठरेल या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. मात्र कोणता उमेदवार कुठे आणि कोणत्या दिशेला उभा आहे यावरही बरंच काही अवलंबून आहे. त्यातच मागील काळात डोंगरावरून अनेकदा दरड कोसळल्याने पाण्याचा प्रवाह नेमका कुणीकडे जातो हे लवकरच स्पष्ट होणार आहे. आता राजेश टोपे या विखुरलेल्या पाण्याच्या प्रवाहाला पुन्हा पूर्ववत करतात की डॉ.हिकमत उढाण, सतिष घाटगे, शिवाजीराव चोथे इत्यादी उमेदवार या पाण्याच्या प्रवाहाचे सुक्ष्म नियोजन करून हे पाणी आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होतात हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.