एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
माजी मंत्री राजेश टोपे यांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे तर डॉ.हिकमत उढाण यांच्या विजया बद्दल अर्थातच अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. राजेश टोपे हे २५ वर्षे आमदार आणि अनेक वर्षे मंत्री होते त्यामुळे अर्थातच त्यांच्या पराभवाची चर्चा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात झाली. निवडणुका संपल्या, निकाल लागला तरी पराभव आणि विजयाची चर्चा अजूनही विविध ठिकाणी दिसून येत आहे.
निवडणुकीत राजेश टोपे यांचा पराभव का झाला आणि डॉ.हिकमत उढाण यांच्यावर मतदारांनी विश्वास टाकण्याची कारणे काय याबाबत एल्गार न्यूजने काही मान्यवरांची मते जाणून घेतली, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया खालील प्रमाणे आहेत.
राजेश टोपेंना २५ वर्षात गोदाकाठचे रस्ते सुध्दा करता आले नाहीत !
राजेश टोपे हे २५ वर्षांपासून आमदार होते, १४ वर्षे मंत्री होते मात्र त्यांना गोदाकाठचे रस्ते, प्रमुख रस्ते करता आले नाही. संकनपुरी, गुंज, टेंभी अंतरवाली, तिर्थपुरी, गोंदी, महाकाळा, पैठण हा रस्ता अनेक वर्षे केला नाही. तसेच दैठणा फाटा, जांबसमर्थ रस्ता, कुंभार पिंपळगांव, पिंपरखेड, तिर्थपुरी, सुखापुरी, भांबेरी, पैठणकडे हे अत्यंत महत्वाचे रस्ते सुध्दा त्यांनी वर्षानुवर्षे केले नाहीत. घनसावंगी मतदारसंघात २२० गावे आहेत त्यापैकी फक्त ४० गावात ऊस आहे, १८० गावांचा आणि ऊसाचा काही संबंध नाही, तरीही उसाचे राजकारण असल्याचे भासवले जाते.
१८० गावे समृध्द करायचे असल्यास एक्सप्रेस कालवा करणे आवश्यक आहे. सदरील शहागड गोदावरी नदी – दुधना नदी असा एक्सप्रेस कालवा करणे आवश्यक असतांना २००९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी घोषणा केली परंतू आजपर्यंत केले नाही. गेली १७ वर्षे मी या प्रश्नावर आंदोलने केली आहेत. गल्हाटी प्रकल्प कधीच भरत नाही, त्यामध्ये उपसा सिंचन करून पाणी आणण्याची योजना गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित आहे. ते सुध्दा त्यांना करता आले नाही.
राजेश टोपे यांनी मतदारसंघात विकासकामे न केल्यामुळे मतदारांनी त्यांना नाकारले. निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ.हिकमत उढाण यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी होती. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे हिकमत उढाण यांचा विजय सुकर झाला. हिकमत उढाण यांच्यासह आम्ही सर्वजण मिळून घनसावंगी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न नक्कीच मार्गी लावू यात शंका नाही.
सुनीलबापू आर्दड
प्रदेश निमंत्रित सदस्य, भाजप
तथा माजी नगराध्यक्ष, जालना
राजेश टोपे यांच्या कार्यकाळात मतदारसंघाची अक्षरश: वाट लागली !
माजी मंत्री राजेश टोपे यांनी मतदारसंघात एवढ्या वर्षात शक्य असतांनाही मुलभूत सुविधा सुध्दा उपलब्ध केल्या नाहीत. मतदारसंघातील मुलभूत प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवले. ठराविक बोटावर मोजण्या इतक्या लोकांना जवळ करून राजकारण केले. त्यांच्यासाठी सामान्य माणूस केंद्रबिंदू नाही, कारखानदारी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नाही तर व्यावसायिक दृष्टीकोणातून आहे. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघाची अक्षरश: वाटच लागली. मतदारसंघात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार अशा अनेक समस्या आहेत. उसाला सुध्दा अपेक्षित भाव नाही, जर शेतकऱ्यांची एवढीच चिंता आहे तर उसाला गुजरात सारखा भाव का देत नाही. स्व.अंकुशराव टोपे यांची सहकाराची भुमिका राजेश टोपे यांनी ठेवली नाही. खरं तर कारखान्याला कर्जात दाखवून खाजगीकरण करण्याचा त्यांचा उद्देश आहे.
गेल्या पंचवार्षिकला सुध्दा अत्यंत कमी मताने ते जिंकले होते, तेव्हाच जर त्यांच्यात सुधारणा झाली असती, लोकांचे प्रश्न सोडवले असते, विकास केला असता तर कदाचित त्यांना यश आलं असतं. मागील काळात त्यांना आरोग्यमंत्री पद मिळाले असतांनाही मतदारसंघात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहेत. आरोग्य केंद्रांची दुरावस्था आहे. असंख्य रूग्णांना रेफरच केले जाते. कुत्रा चावला तरी इंजेक्शन नाही, अनेक ठिकाणी डिलीव्हरी करीता सुविधा नाही. आरोग्य केंद्रात स्वच्छता नसून बकाल अवस्था आहे. स्कूल, कॉलेज मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, त्यांच्या अनेक शाळेत घाण व अस्वच्छता आहे.
तिर्थपुरी शहर व परिसरात जी विकासकामे झाली ती आम्ही स्वत: प्रयत्न करून केली आहेत, त्यात त्यांचे योगदान नाही. खरं तर राजेश टोपे यांच्यात विकास करण्याची इच्छाशक्तीच नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून आणि एक सक्षम पर्याय म्हणून मतदारांनी डॉ.हिकमत उढाण यांना निवडून दिलं. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं. डॉ.हिकमत उढाण यांना प्रशासकीय अनुभव आहे, ते मंत्रालयात पीएस होते, मंत्रालयीन कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने ते मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करतील अशी खात्री आहे.
महेंद्र पवार,
जि.प.उपाध्यक्ष, जालना.
राजेश टोपेंना २५ वर्षे संधी देवूनही मतदारसंघाची दुरावस्थाच !
राजेश टोपे २५ वर्षांपासून आमदार होते, अनेक वर्षे सरकार मध्ये मंत्री सुध्दा होते, तरीही मतदारसंघाची दुरावस्थाच आहे. वास्तविक २५ वर्षे एका व्यक्तीला स्विकारणे अवघड होते, लोकांना गोड बोलून टाळणे आवडले नाही. विकास कामे न करता दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. मुख्य रस्ते आणि ग्रामीण रस्ते करण्याची युक्ती त्यांना कधी सुचली नाही. मोठे रस्ते महायुती सरकार किंवा नितीन गडकरी यांच्या माध्यमातून झाले आहेत. सिंचनाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी राजेश टोपे कमी पडले. काही मोजकेच कार्यकर्ते गुत्तेदारीच्या माध्यमातून त्यांनी मोठे केले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी पुढं येवू दिलं नाही.
कारखान्याच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप त्रास झाला. त्यांच्याच अनेक समर्थकांना सुध्दा राजेश टोपे निवडून यावे अशी इच्छा नव्हती. हिकमत दादा उढाण यांना निवडून देण्याचे कारण म्हणजे त्यांनी सातत्य ठेवले, अहंकार न ठेवता जनतेचे प्रश्न समजून घेते, कुठलेही पद नसतांना अनेकांची कामे केली, अनेकांना दवाखान्यात विविध उपचारासाठी सहकार्य केले, लोकांशी संपर्क ठेवला, उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी आधी एक कारखाना सुरू केला आणि आता कुंभार पिंपळगांव परिसरात पुन्हा एक कारखाना सुरू करत आहेत. हे सगळे व्हिजन पाहून आणि एक सक्षम पर्याय म्हणून लोकांनी हिकमत दादा यांना निवडून दिले.
अशोक राजेजाधव,
जालना जिल्हा उपाध्यक्ष, भाजप
जनता राजेश टोपे यांना कंटाळली होती !
घनसावंगी मतदारसंघातील जनतेने राजेश टोपे यांना २५ वर्षे संधी देवूनही आणि त्यांना मंत्रीपदाची अनेकवेळा संधी मिळूनही त्यांनी मतदारसंघाचा विकास केला नाही, त्यामुळे जनता राजेश टोपे यांना कंटाळली होती. मतदारसंघात आजही चारही बाजूला गेल्यास गावांना जोडणारे रस्ते नाहीत, २५ वर्षात साधारण रस्ते ते करू शकले नाहीत, मग इतर प्रलंबित प्रश्नांची काय अवस्था असेल.
मतदारसंघात अनेक गावे अशी आहेत जेथे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मतदारसंघात आरोग्याच्या सुविधा नाहीत, शासकीय आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याने नागरिकांना पुढे शहरात जावून उपचार घ्यावे लागतात. मतदारसंघात एखाद्याचा अपघात झाल्यास त्याला उपचार मिळतील की नाही याची शाश्वती नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्राची अत्यंत वाईट अवस्था आहे. सुविधा नाहीत, औषधे नाहीत, आवश्यक ते उपचार नाहीत, त्यामुळे रूग्णांना सामान्य उपचारासाठी सुध्दा खाजगी दवाखान्यात जावे लागते. चांगल्या दर्जाचे शिक्षण नाही, त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना बाहेरगावी पाठवावे लागते.
मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे, असंख्य बेरोजगार युवक गावागावात दिसून येतात. भांडवल नसल्याने आणि बॅंका कर्ज देत नसल्याने युवक स्वत:चा व्यसायही करू शकत नाहीत. मतदारसंघात वीजेची समस्या आहे. नागरिकांना शासनाच्या योजना सहजपणे मिळत नाहीत, प्रशासनावर कोणाचा वचक नाही, त्यामुळे नागरिकांची कामे होत नाहीत. अशा अनेक कारणांमुळे मतदारांनी राजेश टोपे यांना घरी बसवले आणि एक सक्षम आणि प्रशासकीय अनुभव असणारे व्यक्ती म्हणून डॉ.हिकमत उढाण यांना निवडून आणले आहे. जनतेची साथ आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळे यश मिळाले.
बापूसाहेब आर्दड,
घनसावंगी तालुकाप्रमुख, शिवसेना