एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्ह्यात जि.प. पाणी पुरवठा विभागाने केलेला हर घर जल घोटाळा एल्गार न्यूजने उघडकीस आणल्यानंतर आता विविध गावांची माहिती स्वतंत्रपणे समोर येत आहे. समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असलेल्या श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथे सुध्दा मंजूर असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम अर्धवट अवस्थेत बंद असतांना शिवाय गावात पाईपलाईन सुध्दा टाकलेली नसतांना गावाला हर घर जल घोषित करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र जांबसमर्थ हे समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान आहे. येथे प्रभू श्रीराम यांचे आणि समर्थ रामदास स्वामींचे मंदिर आहे. राज्यभरातून येथे दरवर्षी असंख्य भाविक येत असतात. दरवर्षी येथे श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. येणाऱ्या भाविक भक्तांना योग्य त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासन निधी उपलब्ध करून देत असते, परंतू भ्रष्ट मानसिकतेमुळे या धार्मिक स्थळाचा अपेक्षित विकास होतांना दिसत नाही. याच श्रीक्षेत्र जांबसमर्थ आणि संलग्न असलेल्या गुणानाईक तांड्यात पाणी पुरवठ्याची योजना अर्धवट असतांना आणि दोन्ही गावाला योजनेचे थेंबभर पाणीही मिळाले नसतांना पाणी पुरवठा विभागाने या गावांना हर घर जल घोषित केले आहे.
जांबसमर्थ व गुणानाईक तांडा या दोन्ही ठिकाणचे जे “हर घर जल गांव प्रमाणपत्र” जारी करण्यात आले आहे त्यात काय नमूद करण्यात आले आहे ते पहा…
- गावात सगळीकडे पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
- गावात पाईपलाईन मध्ये कुठेही पाण्याची गळती होत नाही.
- गावातील प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळते.
- गावातील १०० टक्के कुटुंबाला नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळते.
- सर्वांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
- पाण्याची क्वालिटी केंद्र शासनाच्या BIS 10500 मानकाप्रमाणे शुद्ध आहे.
- पाणी पुरवठ्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
- पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यावर खोदण्यात आलेले सर्व रस्ते दुरूस्त करण्यात आले आहेत.
- गावातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्र, आश्रमशाळा, ग्रामपंचायत इमारत, आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी नळ जोडणी देण्यात आली आहे.
- घरातील, गावातील शासकीय संस्थांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.
- पावसाचे पडणारे पाणी जमिनीत पुनर्भरण करण्यात येत आहे.
हा बघा जांबसमर्थचा १ पुरावा !

जांबसमर्थचा पंचनामा !
श्रीक्षेत्र जांबसमर्थला शासनाने पाणी पुरवठा योजने अंतर्गत १ कोटी ४३ लाख रूपये मंजूर केले होते. जानेवारी २०२३ मध्ये सदरील काम गुत्तेदाराला देवून कामाला सुरूवात झाली होती. काम पूर्ण करण्याचा कालावधी ५४५ दिवसांचा म्हणजेच दिड वर्षांचा होता, मात्र २ वर्षे उलटूनही काम अपूर्णच आहे. अर्थातच कालावधी संपून ६ महिने अधिक झाले असले तरी गावात अद्याप एक पाईप सुध्दा टाकण्यात आलेले नाही. फक्त गावाच्या बाहेर थोडेफार काम झाले असून अर्धवट अवस्थेत बंद असलेल्या सदरील योजनेचे थेंबभर पाणीही गावाला मिळाले नाही.
एवढं कमी होतं की, काय जि.प. पाणी पुरवठा विभागाने आपले टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात श्रीक्षेत्र जांबसमर्थला कागदोपत्रीच हर घर जल घोषित करून शासन दरबारी तशी नोंदही करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर गावातील १०० टक्के नागरिकांना नळ कनेक्शनद्वारे शुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचे शासन दरबारी नमूद करण्यात आले आहे. त्यात भर म्हणजे ग्रामपंचायतने सुध्दा गावातील सर्व नागरिकांना नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळत असल्याचा ठराव सुध्दा पाणी पुरवठा विभागाला हसत खेळत देवून टाकला आहे.
एल्गार न्यूजने टेंडरची माहिती काढली असता १ कोटी ४३ लाखाच्या या कामाचे आतापर्यंत संबंधित गुत्तेदाराने ७१ लाख उचलले असल्याचे समोर आले आहे. मात्र संबंधित अधिकारी व गुत्तेदारांचे साटेलोटे पाहता उचलण्यात आलेली रक्कम यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा बघा गुणानाईक तांड्याचा १ पुरावा !

गुणानाईक तांड्याचा पंचनामा !
श्रीक्षेत्र जांबसमर्थ ग्रामपंचायतलाच संलग्न असणाऱ्या गुणानाईक तांड्याला सुध्दा शासनाने स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. शासनाने या तांड्याला ७९ लाख ९५ हजार म्हणजेच जवळपास ८० लाखाची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये काम संबंधित गुत्तेदाराला देण्यात येवून ५४५ दिवसात (दिड वर्षात) काम पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता, मात्र २ वर्षे ४ महिने होवूनही काम अर्धवट अवस्थेत बंद असून गावाला या योजनेचे थेंबभर पाणीही मिळाले नसल्याचे येथील नागरिक सांगत आहेत.
सदरील योजने अंतर्गत तांड्यात अद्याप पाईपलाईन टाकण्यात आलेली नसतांना शिवाय योजनेचे पाणी मिळालेले नसतांना पाणी पुरवठा विभागाने तांड्यातील १०० % टक्के नागरिकांना नळ कनेक्शन द्वारे शुद्ध पाणी पुरवठा होत असल्याबाबत हर घर जल प्रमाणपत्र जारी केले असून शासन दरबारी तशी नोंद सुध्दा करण्यात आली आहे. या तांड्याच्या बाबतीत सुध्दा जांबसमर्थ ग्रामपंचायतने तांड्यातील नागरिकांना पाणी मिळत असल्याबाबत ठराव पाणी पुरवठा विभागाला देवून टाकला आहे. अर्थात आज घडीला शासन दरबारी या तांड्यातील सर्व नागरिकांना (कागदोपत्री) पाणी मिळत असल्याची नोंद झाली आहे.
एल्गार न्यूजने टेंडरची माहिती काढली असता ७९ लाखाच्या या कामाचे आतापर्यंत संबंधित गुत्तेदाराने जवळपास ४६ लाख उचलले असल्याचे समोर आले आहे. मात्र संबंधित अधिकारी व गुत्तेदारांचे साटेलोटे पाहता उचलण्यात आलेली रक्कम यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जबाबदार कोण ?
श्रीक्षेत्र जांबसमर्थ व गुणानाईक तांडा ही दोन्ही गावे हर घर जल घोषित करण्यासाठी जि.प. पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या आशिर्वादाने व संमतीने उपअभियंता यांनी “हर घर जल गांव प्रमाणपत्र” जारी केले. मग ग्रामपंचायतींनी सुध्दा ठराव देवून या शुभकार्याला हातभार लावला. हे सर्व झाल्यावर जिल्हा परिषद मधील कार्यकारी अभियंता यांचे वरिष्ठ अधिकारी म्हणजेच २०२३ मधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांनी सुध्दा ही दोन्ही गावे हर घर जल घोषित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आणि दोन्ही गावे हर घर जल घोषित होत असतांना आपला अडथळा नको म्हणून तत्कालीन सीईओ यांनी डोळ्यावर पट्टी बांधून मार्ग मोकळा केला.
संपूर्ण जिल्ह्यात हीच परिस्थिती !
जनतेच्या कल्याणाची महत्वपूर्ण जबाबदारी असणारे जेव्हा १ ते दिड लाख रूपये पगार असतांनाही लाज सोडतात तेव्हा काय होते याचे उत्तम उदाहरण हर घर जल महाघोटाळ्याच्या माध्यमातून समोर आले आहे. घोटाळा उघड झाल्याने शिवाय सर्व काही समोर असल्याने नव्याने जॉईन झालेले सीईओ कारवाईच्या दृष्टीने गांभीर्यपूर्वक सखोल चौकशी करतील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने नवीन सीईओ घोटाळेबाजांच्या दबावाखाली येत असल्याचे चित्र दिसत आहे. अर्थातच एल्गार न्यूजच्या बातमीनंतर सीईओ यांनी चौकशी समिती स्थापन केली खरी, परंतू ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनाच चौकशी समितीमध्ये समाविष्ट केल्याने आरोपीच स्वत:ची चौकशी कशी करतील असा प्रश्न उपस्थित झाला होता. एल्गार न्यूजने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता चौकशी समिती मधील सदस्य बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत.
विधानसभेत मुद्दा उपस्थित !
एल्गार न्यूजने सदरील महाघोटाळ्याचा मुद्दा लावून धरला असून हा विषय वरिष्ठ पातळीवर गेला आहे. बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी जालना जिल्ह्यातील हर घर जल महाघोटाळ्याचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्याने आता या प्रकरणात शासन काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लढा सुरूच राहणार !
जालना जिल्ह्यातील हा महाघोटाळा सर्वप्रथम एल्गार न्यूजने उघड केला असून कुठल्याही दबावाला बळी न पडता आतापर्यंत ८ भाग प्रकाशित करून रोखठोक शब्दात घोटाळ्याचा पंचनामा केला आहे. जो पर्यंत या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी होवून कारवाई होत नाही तो पर्यंत एल्गार न्यूजचा लेखणीच्या माध्यमातून हा लढा सुरूच राहणार आहे.