एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील बेकायदेशीर प्लॉटिंग च्या बातम्या घेवून सदरील गोरखधंद्यात ग्रामसेवक यांचा सहभाग एल्गार न्यूजने उघड केल्यानंतर आता ग्रामसेवक हे प्लॉटिंगवाल्यांना हाताशी धरून एल्गार न्यूजचे संपादक परवेज पठाण यांच्यावर दबाव आणण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे गावाच्या चारही बाजूला बेकायदेशीरपणे कोट्यावधी रूपयांची प्लॉटिंग काढण्यात आली आहे. प्लॉटिंग काढण्यापूर्वी एन.ए. (NA) करणे व इतर नियमांचे पालन करणे आवश्यक असतांना कुंभार पिंपळगावात सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे सर्रासपणे प्लॉटिंगचा गोरखधंदा सुरू आहे.
ग्रामसेवकांचा आशीर्वाद !
कुंभार पिंपळगावात उठसूठ कोणीही काही पैसे अॅडव्हान्स देवून शेतकऱ्याकडून जमीन ताब्यात घेत आहे व ग्रामसेवकाच्या आशीर्वादाने प्लॉटिंग काढून बेकायदेशीरपणे प्लॉट विक्री करत आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका हे ग्रामसेवक पार पाडत आहेत, कारण प्लॉटिंग काढल्यानंतर सदरील प्लॉट ग्रामपंचायतला लावण्याची अर्थपूर्ण समाजसेवा हे ग्रामसेवक करत असल्याने कुंभार पिंपळगावात प्लॉटिंगला ऊत आला आहे. अर्थातच यामध्ये तहसील कार्यालय आणि रजिस्ट्री ऑफीसची भूमिका काय आहे हे येत्या काळात लक्षात येईलच.
दबाव टाकण्याचे प्रयत्न !
एल्गार न्यूज मध्ये सदरील बेकायदेशीर प्लॉटिंगच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या ग्रामसेवकाने काही प्लॉटिंगवाल्यांना हाताशी धरून एल्गार न्यूजचे संपादक परवेज पठाण यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मागील २ दिवसांमध्ये गावातीलच काही लोकांच्या माध्यमातून सांगण्यात आले की, बातम्या घेवू नका, बातम्या घेतल्यास तुम्ही भविष्यात अडचणीत येवू शकता, कोणी कोणाला कमी नाही, तुम्ही ऐकलं नाही तर प्लॉटिंगवाल्यांना वेगळा विचार करावा लागेल, प्लॉटिंगवाल्यांचे संबंध अनेक नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आहेत, वर पर्यंत काही ना काही देवून सगळे मॅनेज केलेले आहेत, तुम्ही कशाला आडकाठी आणता, तुम्ही चांगले माणसं आहात त्यामुळे आमचं काम आहे तुम्हाला विषय लक्षात आणून द्यायचा असं सांगण्यात आलं.
तसेच संपादकांवर दबाव टाकण्याच्या उद्देशाने संबंधित लोकांनी हे सुध्दा सांगितले की, एवढ्या रोखठोक बातम्या घेवून तुम्हाला काय मिळतं, घर जाळून कोळशे कवरोक करता, तुमची काय अडचण आहे आम्हाला सांगा. आम्ही तुमची अडचण दूर करू. तुम्ही ऐकलं तर तुमचाच फायदा आहे, नसता प्लॉटिंग मध्ये अनेकांनी कोट्यावधी रूपये गुंतवलेले आहेत. त्यांना वेगळा विचार करावा लागेल.
संपादकांना हे सुध्दा सांगण्यात आलं की, समजून घ्या, कसंय, आजकाल कोणी ऐकत नसेल तर त्याला बदनाम केलं जातं, एखादी खोटी गोष्ट १०० वेळा सांगितली तर शेवटी लोकांना ती खरी वाटू लागते. तुमची खोटी बदनामी होणार असेल तर आम्हालाही बरं वाटणार नाही. तुम्ही संबंधातले माणसं आहात म्हणून आम्ही सांगितलं बाकी आमचं काही म्हणं नाही, असे त्यांनी सांगितले.
ग्रामसेवकाचा सहभाग !
कुंभार पिंपळगावचे ग्रामसेवक यांचे नाव ग्रामपंचायतशी संबंधित अनेक प्रकरणात तर आले आहेच, सोबतच प्लॉटिंगच्या व्यवसायात त्यांच्या अर्थपूर्ण भूमिकेमुळे ते अडचणीत सापडले आहेत, एवढंच नव्हे तर घनसावंगी तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनुदान घोटाळ्यात सुध्दा त्यांचे नाव आल्याने सर्व गोष्टींचा राग मनात धरून ते प्लॉटिंगवाल्यांना हाताशी धरून साम, दाम, दंड, भेद या गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भाषा !
मागील काळात अशाच प्रकारे काही प्लॉटिंगशी संबंधित लोकांनी इतरांच्या माध्यमातून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची (दबक्या आवाजात) भाषा केली होती. परंतू तेव्हा सुध्दा एल्गार न्यूजच्या वतीने सांगण्यात आले होते आणि आताही स्पष्ट करण्यात येते की, खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्यांनी खुशाल काय करायचे ते करावे, आत मध्ये जावून बसण्याची संपादकांची तयारी आहे. शिवाय स्वत:हून जामीनसाठी प्रयत्न सुध्दा केले जाणार नाहीत.
ब्लॅक मनी आणि मुळव्याध !
एल्गार न्यूज मध्ये मागील जवळपास दिड वर्षात विविध विषयांच्या अंदाजे ३ ते ४ बातम्यांमध्ये जेव्हा जेव्हा सहज ब्लॅक मनीचा ओझरता उल्लेख जरी झाला, तेव्हा तेव्हा एल्गार न्यूजवर कोणत्या तरी माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच झालेला आहे. अर्थात ब्लॅक मनीचा कुठेही साधा उल्लेख जरी झाला तरी अनेकांचा मुळव्याध उठत आहे असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे खरंच कुंभार पिंपळगांवात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ब्लॅक मनी आहे का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा सपोर्ट !
एल्गार न्यूजचे संपादक परवेज पठाण यांनी दबाव टाकण्यात येत असल्याबाबत दि.१७ रोजी व्हाट्सअॅप स्टेटसवर संदेश ठेवला असता, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, वकील विविध क्षेत्रातील मान्यवर, गांवकरी, परिसरातील नागरिक यांच्यासह राज्यातील अनेक पत्रकार बांधवांनी कॉल व मॅसेज करून आम्ही तुमच्या सोबत आहोत, काय मदत लागते सांगा, कुठलीही अडचण असल्यास आवश्य कळवा अशी भावना व्यक्त केली आहे.
दबाव सहन केला जाणार नाही !
कुंभार पिंपळगांवचे ग्रामसेवक असो किंवा पैशांचा अहंकार असलेले काही प्लॉटिंगवाले असो, यांचा कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा धमक्या सहन केल्या जाणार नाहीत. १७ वर्षांच्या पत्रकारितेत संपादकांवर एकही डाग लागलेला नाही. तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव व परिसरातील नागरिक हे संपादकांच्या सुरूवातीपासूनच्या पत्रकारितेचे साक्षीदार आहेत. त्यामुळे ग्रामसेवक व प्लॉटिंगवाल्यांच्या दबाव आणि कटकारस्थानाचा काहीही उपयोग होणार नाही. संपादकांवर दबाव टाकण्याचे प्रकार नवे नाहीत, परंतू वारंवार असे प्रकार होणार असतील तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करून पुढील कारवाई करण्यासही संपादक मागे पुढे पाहणार नाहीत.
एल्गार न्यूजचे इनकम सोर्स !
एल्गार न्यूज ला सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर जाहिरात देवून सहकार्य करतात, त्याशिवाय एल्गार न्यूज किंवा संपादक कोणाच्याही एक पैशाचे सुध्दा मिंधे नाहीत. अंधारातून घ्यायची मानसिकता असती तर १७ वर्षात स्वत:ची एखादी बिल्डींग बांधायला काहीच अडचण नसती. संपादक हे पत्रकारिता पदवीधर असून ग्राफीक डिझायनर सुध्दा आहेत, शिवाय त्यांचे मागील १९ वर्षांपासून सवेरा डिजिटल हे दुकान पण कार्यरत आहे.
एवढं सांगायची आवश्यकता काय ?
मराठीत एक म्हण आहे की, खरं चप्पल घालूस्तर खोटं गांव हिंडून आलेलं असतं, त्यामुळे आपली बाजू थोडक्यात का असेना समाजासमोर जाणे आवश्यक आहे. ग्रामसेवक व प्लॉटिंगवाल्यांनी यापूर्वीही संपादक आणि त्यांच्या कुटुंबियांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यांना त्यात यश आलेलं नाही.
सपोर्ट करणाऱ्यांचे आभार !
ज्यांनी कॉल व मॅसेजच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून संपादकांना सपोर्ट करत आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले व नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक पत्रकारितेला पाठबळ दिले त्या सर्वांचे एल्गार न्यूज मन:पूर्वक आभार व्यक्त करत आहे.