Your Alt Text

खुशखबर ! महाराष्‍ट्रातील बंजारा समाजाच्‍या तांड्यांमध्‍ये होणार आता स्‍वतंत्र ग्रामपंचायत !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
राज्‍यातील बंजारा / लमाण समाजासाठी महाराष्‍ट्र शासनाने अत्‍यंत महत्‍वपूर्ण असा निर्णय घेतला आहे, ज्‍यामुळे वर्षानुवर्षे विकासापासून दूर असलेल्‍या बंजारा समाजाच्‍या तांड्यांचा विकास आता जलदगतीने होण्‍यास मदत होणार आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, राज्‍यातील बहुतांश बंजारा / लमाण तांड्यांना स्‍वतंत्र महसूल गावाचा दर्जा नसल्‍यामुळे तसेच स्‍वतंत्र ग्रामपंचायत नसल्‍यामुळे बंजारा समाजाला विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणण्‍यात अडचणी येत होत्‍या, मात्र आता महाराष्‍ट्र शासनाने ही अडचण दूर केली असून राज्‍यातील बहुतांश तांड्यांमध्‍ये आता ग्रामपंचायत होणार असून महसूली गावाचा दर्जाही मिळणार आहे.

राज्‍य शासनाने दि.24/02/2024 रोजी जीआर काढला असून या शासन निर्णयानुसार बंजारा / लमाण तांड्यासाठी स्‍वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करणे व सामुहिक विकासाच्‍या विविध मुलभूत सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यासाठी “संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्‍दी योजना” राबविण्‍यास मान्‍यता देण्‍यात आली आहे.

यापूर्वी ग्राम विकास विभागाच्‍या 12 फेब्रुवारी 2004 च्‍या शासन निर्णयानुसार स्‍वतंत्र ग्रामपंचायत स्‍थापन करण्‍यासाठी तांडा भागासाठी किमान 1000 इतकी लोकसंख्‍या व दोन गावातील 3 कि.मी. अंतर असणे आवश्‍यक होते, मात्र आता बंजारा / लमाण तांड्यासाठी स्‍वतंत्र ग्रामपंचायत स्‍थापन करण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या दोन गावातील 3 कि.मी. अंतराची अट शिथील करण्‍यात आली असून तांड्याच्‍या विकासासाठी आवश्‍यक मुलभूत सुविधा पुरविण्‍यासाठी 500 कोटीचा निधी उपलब्‍ध करण्‍यासही मान्‍यता देण्‍यात आली आहे.

ग्रामपंचायत कशी स्‍थापन होणार ?

यापूर्वी ग्रामपंचायत स्‍थापन करण्‍यासाठी तांडा भागासाठी किमान 1000 इतकी लोकसंख्‍या व दोन गावातील 3 कि.मी. अंतर असणे आवश्‍यक होते, मात्र आता 3 किमी ची अट शिथील करण्‍यात आली आहे. ज्‍या तांड्याची लोकसंख्‍या 1000 पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी एकापेक्षा जास्‍त तांडे एकत्रित करून गट ग्रामपंचायत स्‍थापन करता येईल. तसेच ज्‍या तांड्यांची लोकसंख्‍या 1000 व त्‍यापेक्षा जास्‍त आहे व त्‍याच्‍या आजुबाजुला आणखी एक दोन छोटे तांडे आहेत तर अशा प्रकरणीही गट ग्रामपंचायत स्‍थापन करण्‍यास मान्‍यता देण्‍यात आली आहे. तसेच संबंधित तांड्याला महसूली गावाचा दर्जा सुध्‍दा देण्‍यात येणार आहे.

जिल्‍हास्‍तरीय समिती !

बंजारा / लमाण तांडा वस्‍ती घोषित करणे, गावठाण जाहीर करणे, तांड्याला महसूली गाव घोषित करण्‍याची कार्यवाही करणे, ग्रामपंचायत स्‍थापन करण्‍याची कार्यवाही करणे इत्‍यादी अनुषंगिक कार्यवाहीसाठी जिल्‍हास्‍तरीय समिती गठीत करण्‍यास मान्‍यता देण्‍यात आली आहे.

सदरील जिल्‍हास्‍तरीय समिती मध्‍ये अध्‍यक्ष हे जिल्‍हाधिकारी असतील तसेच जि.प.मुख्‍य कार्यकारी अधिकारी सह अध्‍यक्ष असतील, याशिवाय उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका निरीक्षक भुमि अभिेलेख, गटविकास अधिकारी हे सदस्‍य असतील. तसेच जि.प. अध्‍यसक्ष यांनी नामनिर्देशित केलेले बंजारा समाजाचे 2 प्रतिनिधी अशासकीय सदस्‍य असतील आणि जिल्‍हा परिषदेचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) हे सदस्‍य सचिव असतील.

योजनेचे नाव काय ?

शासनाने बंजारा / लमाण समाजासाठी सुरू केलेल्‍या या योजनेचे नाव “संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्‍दी योजना” असे राहणार असून या योजनेमुळे बंजारा समाजाच्‍या तांड्यांचा विकास जलदगतीने होण्‍यास नक्‍कीच मदत होणार आहे.


ही बातमी आपल्‍या मित्रांना व समाज बांधवांना आवश्‍य शेअर करा…


महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!