एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
महाराष्ट्रात यावेळेस झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील असंख्य शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान, घरांचे पडणे, जनावरांचा मृत्यू, जमिनी खरडून जाणे अशा विविध समस्यांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे.
राज्यात तब्बल 253 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर सरकारने मदतीचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.” केंद्र सरकारकडेही अधिक मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या महत्त्वाच्या घोषणा खालीलप्रमाणे –
- 31,628 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज – अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी सरकारने हे मोठे पॅकेज जाहीर केले आहे.
- कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18,500 रुपयांची मदत – पावसामुळे नुकसान झालेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
- हंगामी बागायतदारांना प्रति हेक्टरी 27,000 रुपयांची मदत – ज्यांनी हंगामी फळबागा घेतल्या आहेत, त्यांना विशेष मदत मिळणार आहे.
- बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी 32,500 रुपयांची मदत – बागायती शेतीत झालेल्या नुकसानीसाठी अधिकचा निधी दिला जाणार आहे.
- विहिरींचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 30,000 रुपयांची मदत – पावसामुळे विहिरी गाळाने भरलेल्या किंवा पडलेल्या शेतकऱ्यांना ही विशेष मदत मिळणार आहे.
- गावांतील पायाभूत सुविधा दुरुस्तीसाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद – रस्ते, पूल, विजेचे खांब यासारख्या सुविधांसाठी अतिरिक्त निधी जाहीर.
- घरांचे नुकसान झेललेल्या नागरिकांसाठी मदत – ज्यांचे घर पूर्णपणे पडले आहे त्यांना पीएम आवास योजनेंतर्गत नवीन घर, तर अंशतः नुकसान झालेल्यांना आर्थिक सहाय्य.
- जनावरे गमावलेल्यांना प्रति पशू (दुधाळ जणावरे) 37,000 रुपयांची मदत – पावसामुळे जनावरांचा मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा.
- जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 3.5 लाख रुपयांची मदत – यातील 47,000 रुपये रोख स्वरूपात तर उर्वरित रक्कम मनरेगाच्या माध्यमातून दिली जाणार.
- पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा भरपाई – जे शेतकरी पीक विमा योजनेअंतर्गत आहेत त्यांना लवकरच नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
या व्यतिरिक्त रब्बीच्या पिकासाठी प्रति हेक्टरी १० हजार अतिरिक्त दिले जातील, तसेच दुष्काळाच्या वेळेस लागू होत असलेल्या उपाययोजना लागू केल्या जातील. दुकानाचं नुकसान झालं असल्यास ५० हजारापर्यंतची मदत केली जाणार आहे.
राज्य सरकारने यावेळी सांगितले की, ही मदत कोणत्याही अटी-शर्थीशिवाय दिली जाणार आहे. सर्व निकष बाजूला ठेवून केवळ शेतकऱ्याचा विचार करत ही योजना अमलात आणली जात आहे. केंद्र सरकारलाही याबाबत निवेदन देण्यात आले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीतही याचा मुद्दा मांडण्यात आला आहे.
दिवाळीपूर्वी मदत
या निर्णयामुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या हातात दिली जाणार असल्याची ग्वाही सरकारने दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, त्याआधी त्यांना आर्थिक मदतीचा आधार दिला जाईल.”
शेतकऱ्यांना सरकारचा खंबीर पाठिंबा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं की, “शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेऊनच आम्ही हे पॅकेज आखलं आहे. ही एक सामाजिक बांधिलकी आहे.” मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिघांनीही नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण
या मदत पॅकेजमुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून विशेषतः दिवाळीच्या काळात ही मदत मिळाल्यामुळे त्यांच्या सणामध्ये पुन्हा प्रकाश पडेल. घोषित करण्यात आलेल्या या पॅकेजमुळे बळीराजाला सावरण्यासाठी आधार मिळणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. आता या मदत पॅकेजची अंमलबजावणी किती तत्परतेने होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील.