एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
सर्वसामान्य नागरिक वारंवार विनंती करत असतील, बोंबलून बोंबलून आपली समस्या सांगत असतील आणि प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देत असतील तरीही प्रशासकीय यंत्रणा उघड्या डोळ्याने मुकदर्शक होवून पाहत असेल तर यंत्रणाच षंड होत असल्याचे निदर्शक म्हणावे लागेल.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे गेल्या 4 महिन्यांपासून ग्रामपंचायतची घंटागाडी विनाकारण बंद ठेवण्यात आली आहे. घंटागाडी सुस्थितीत आहे, तरीही मनुष्यबळाचे कारण देवून घंटागाडी बंद ठेवण्यात आली आहे त्यामुळे कुंभार पिंपळगांव येथील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
घंटागाडी बंद का ?
घंटागाडी सुस्थितीत आहे, गाडीला काहीच झालेले नाही. मागील काळात पाण्याचे टँकर गावात सुरू झाले होते, प्रशासनाने दिलेल्या टँकरसोबत ड्रायव्हर सुध्दा होते, फक्त पाणी वाटप करताना गावात माणूस मिळत नाही असे सांगून ग्रामपंचायतने घंटागाडीच्या ड्रायव्हरला पाण्याच्या टँकरवर पाठवले होते. मात्र खरंच पैसे देवून सुध्दा गावात पाण्याच्या टँकरवर जाण्यासाठी माणूस मिळत नसेल का ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. 8 दिवस, 15 दिवस नागरिक समजूनही घेतील परंतू 4 – 4 महिने फक्त कारणे देवून ग्रामपंचायतला नेमकं साध्य काय करायचंय असा प्रश्न विचारला जात आहे.
कचऱ्याचा प्रश्न गंभीर !
मागील काळात घंटागाडी सुरू होती तेव्हा माता भगीनी घरातील कचरा या घंटागाडीत टाकत होत्या, परंतू गेल्या 4 महिन्यांपासून घंटागाडीच बंद असल्याने कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, आतापर्यंत कसेबसे कोठेतरी जागा शोधून नागरिक कचरा टाकत होते, परंतू जेथे नागरिक कचरा टाकत होते त्या जागांवरही दुकाने, शेड किंवा इतर बांधकाम होत आहेत, म्हणजेच घराच्या आसपास कोठेही कचरा टाकण्यास पर्यायच उरलेला नाही.
मागील 4 महिने नागरिकांनी कसेबसे 4-8 दिवस कचरा साचवून कुठेतरी नेवून फेकला, परंतू आता पर्यायच दिसत नाही. कचरा टाकायला जागाच नाही. एकीकडे प्रत्येक गल्लीमध्ये सलग घरे आहेत, गल्ली मध्ये आसपास कचरा टाकण्याची जागाच नाही, तर दुसरीकडे घंटागाडी बंद आहे त्यामुळे कचरा टाकायचा कोठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
ओल्या कचऱ्यात अळ्या !
जो पर्यंत नागरिकांना शक्य होते तो पर्यंत नागरिकांनी ग्रामपंचायतची अडचण समजून सबुरीने त्रास सहन केला. 2 – 3 दिवस कचरा साचवला तर दुर्गंधी पसरते ते सुध्दा नागरिकांनी सहन केले, परंतू आता कचरा टाकण्यासाठी जागाच दिसत नसल्याने जास्त वेळ कचरा घरातच साचत असून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्यामध्ये अळ्या होवू लागल्या आहेत. म्हणजेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
कचरा टाकायचा कुठे ?
कुंभार पिंपळगावची (शहराची) लोकसंख्या जवळपास 20 हजार आहे. अंदाजे 2 ते 3 हजार कुटुंब आहेत. जिकडे तिकडे गल्ल्या गजबजलेल्या आहेत, मोकळी जागा सापडत नाही, मग अशावेळी हजारो नागरिकांनी घरोघरी साचलेला कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. खरं तर एक सूचना केली आणि डिझेल टाकले तर याक्षणी घंटागाडी सुरू होवू शकते, परंतू अनेकांना चिल्लर किंवा सामान्य वाटत असलेला हा प्रश्न किती गंभीर झाला आहे याचा अंदाज बहुतेक त्यांना आलेला दिसत नाही. केंद्र आणि राज्य सरकार स्वच्छतेसाठी लाखो किंबहुना कोट्यावधी रूपये देत असते तरीही सदरील प्रश्न मार्गी का लागत नाही असा सवाल नागरिक करत आहेत.
तोंडाला कुलुप लागलाय का ?
नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रशासनाने फक्त तमाशा पाहत बसण्याचं ठरवलंय का ? वरिष्ठ अधिकारी सुध्दा मुग गिळून गप्प का बसले आहेत ? घरांमध्ये कचऱ्यात अळ्या पडू लागल्या आहेत, विविध ठिकाणी घाण व दुर्गंधीमुळे आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरीही कोणी बोलायला तयार नसेल तर नुसतं मिरवायला पदं हवी आहेत की काय ? सगळं काही माहित असतांना वरिष्ठ अधिकारीही AC कॅबीन मध्ये बसून झोपा काढत असतील तर नागरिकांनी आपली कैफियत मांडायची कोणाकडे ? असा सवालही नागरिक करत आहेत.
..तर प्रश्न गंभीर होणार !
आजघडीलाच अनेक घरांमध्ये विविध रूग्ण दिसून येत आहेत. त्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. घरोघरी साचलेला ओला कचरा, त्यात झालेल्या अळ्या, डासांचा प्रादुर्भाव तसेच घाण व दुर्गंधी मुळे आरोग्याचा प्रश्न सुध्दा गंभीर होवू शकतो. त्यामुळे वेळीच उपाययोजना केल्या नाही तर परिस्थिती अधिकच गंभीर होईल यात शंका नाही.
इतर बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर किंवा खाली दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून एल्गार न्यूजच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.