एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
आमच्या गावावर अधिकाऱ्यांचा वर्षानुवर्षे काय राग आहे, काय द्वेष आहे, काय दुष्मनी आहे ? काही कळायला मार्ग नाही. अनेक वर्षांपासूनची जणू परंपराच झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तर चेहरेच गावकऱ्यांना पहायला मिळत नाही, अर्थातच ते गावात येतच नाहीत. राहीला सर्वात महत्वाचा प्रश्न ग्रामसेवकांचा तर ते विचारूच नका अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
आमच्या कुंभार पिंपळगावचं कसंय, आमचे सन्माननीय ग्रामसेवक महिना 15 दिवसात एखाद्यावेळी चुकून ग्रामपंचायतला आलेच, तर त्यांना ग्रामपंचायत मध्ये भूत असल्याचा भास होतो, मळमळ होते, घाम फुटतो जणू त्यांना जागा उचलून फेकते, त्यामुळे ते मागचा पुढचा काहीच विचार न करता तात्काळ गावाच्या बाहेर पडून अंबड रोडला लागतात. असंच काही होत असावं असं आम्हाला वाटतंय अशी प्रतिक्रिया गावातील नागरिक देत आहेत.
गावाबाहेर मात्र जमतंय !
आमचे ग्रामसेवक चुकून गावात आल्यावर त्यांना ग्रामपंचायत मध्ये जरी भूत असल्याचा भास होत असेल, मळमळ होत असेल, घाम फुटत असेल, जागा उचलून फेकत असेल किंवा अजून काही होत असेल मात्र गावाबाहेर अंबड रोडला (हायवेला) लागले तर त्यांना असं काही होत नाही. मग ते कधी हॉटेल मध्ये, कधी धाब्यावर, कधी एखाद्याच्या विशेष ऑफीस मध्ये, कधी थंडगार झाडाखाली बसून मर्जीतल्या लोकांसोबत अर्थपूर्ण कार्य करतात. आणि गावाबाहेर सुध्दा येणे शक्यच नसेल तर मग घनसावंगी किंवा अंबडला बोलावून तेथे अर्थपूर्ण कार्य पूर्ण करतात. मग तुम्ही सांगा सगळं काही बाहेरच व्हायला लागलं तर मग ग्रामपंचायला यायची काय गरज आहे ? अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
आमचे ग्रामसेवक बिझी !
ग्रामपंचायतशी संबंधित एखादे काम असेल तर आमचे ग्रामसेवक गावात नसतात. बरं आमच्या ग्रामसेवकांना फोन केला तर त्यांच्या मागे शासनाने बाहेरगावी एवढ्या मिटींगा लावल्या आहेत की, कलेक्टरला सुध्दा एवढ्या मिटींग नसतील. दर दिवशी त्यांच्या मागे एखादी मिटींग असतेच, बरं मिटींग सुध्दा अशा असतात की, आमचे ग्रामसेवक मिटींगला हजर राहीले नाही तर ती मिटींगच बरखास्त करावी लागते. अन यदाकदाचित मिटींग नसली तर एखादे एवढे महत्वाचे काम असते की त्यांच्या शिवाय ते होवूच शकत नाही, त्यामुळे ते गावात येत नाहीत, अशीही आम्हाला माहिती मिळाल्याचे गावकरी सांगत आहेत.
विकास काय अन आराखडा काय ?
अहो, आमचे ग्रामसेवक आम्हाला भेटतच नाहीत, तर विकास अन गाव विकास आराखड्याचा काय सांगताय ? कधी ग्रामसभा माहित नाही, गावाचे प्रश्न, गावातील समस्या याबद्दल चर्चा नाही, निधी किती आलाय ? कुठे खर्च झालाय ? पुढील नियोजन काय ? याच्याशी काहीच देणेघेणे नाही. कारण आमचे ग्रामसेवक गावातच येत नाहीत. बरं ते गावात येत नाहीत अन वरिष्ठ अधिकारीही याकडे लक्ष देत नाही. कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही AC मधून बाहेर पडायला अवघड वाटतंय, सध्या उन जास्त पडलंय त्यामुळे असं होत असावं असं आपणास वाटेल पण तसं नाही, 12 महिने असंच दुर्लक्ष आहे. शिवाय अधिकाऱ्यांचे एकमेकांशी हॉटेल व धाब्यांवर असलेले अर्थपूर्ण संबंध, मग चौकशीचा प्रश्न येतोच कुठे ? अशीही भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
BDO ला तर गरजच नाही !
आमचे ग्रामसेवक जेवढे बिझी आहेत त्यांच्यापेक्षा 10 पटीने आमचे बीडीओ बिझी आहेत. या बीडीओ यांनी विहीरी अन घरकुलचा मलीदा एवढा खाललाय की आता त्यांना जागचं उठता येईना झालंय. कोणी बीडीओ यांना काही म्हटलं की, लोकं काय म्हणतात याने मला काही फरक पडत नाही, मी पं.स. किंवा घनसावंगी सोडणार आहे, बदली करून जाणार आहे, असं सांगतात. अरं बाबा एवढं दोन जीवावर कशाला थांबलात, एक तर आमचं घनसावंगी तालुक्याचं आधीच वाजलेलं आहे, तुम्ही दोन जीवावर इथं थांबून कशाला आमचं वाटूळं करताय, खुशाल बदली करून आम्हाला मोकळं करा, अशी प्रतिक्रियाही नागरिक देत आहेत.
एक तर बीडीओ कोणत्याही गावाला कधी भेट देत नाही, तालुक्यात कोणत्या गावात काय चाललंय हे त्यांना माहित नाही, लोकांच्या तक्रारीचं त्यांना काहीही देणंघेणं नाही, लोकांच्या अडचणीं विषयी त्यांना काहीही वाटत नाही, त्यांनी चुकून एखाद्या गावाला भेट दिली तर त्या गावात पुन्हा कधी भेट देतील याची शाश्वती नाही. आमचे सन्माननीय बीडीओ हे घनसावंगी तालुक्यात येवून बराच कालावधी झाला आहे, त्यांना तालुक्यातील 117 गावापैकी फक्त अर्ध्या गावांचेच नाव सांगा म्हणावं. अशी भावनाही नागरिक व्यक्त करत आहेत.
फक्त त्यांना दोष देवून काय फायदा ?
गावात विकास कामे करण्यासाठी जे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, जे गावाला कधी भेट देत नाहीत, जे गावाला वाळीत टाकल्यासारखं करतात त्यांना जाब विचारणारे विविध पक्षाचे आमचे नेते अन पदाधिकारीच मुग गिळून गप्प बसलेले आहेत. फक्त बोलण्यापुरते ते अधिकाऱ्यांना फोन लावतात अन बाजुला गेले की तुम्हाला जसं करायचं तसं करा असं सांगुन पाठीशी घालतात, मग काय अधिकारीही मनमर्जीप्रमाणे वागतात आणि गावाकडे दुर्लक्ष करून मोकळे होतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनाच दोष देवून काय उपयोग, चुक तर आमचीच आहे अशी प्रतिक्रियाही नागरिक देत आहेत.
पुढील पंचनामा लवकरच…
इतर बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर किंवा खाली दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.