एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथून तृतीयपंथीयांनी अरेरावीची व अपमानास्पद भाषा वापरून व्यापारी व नागरिकांकडून अंदाजे 40 हजारापेक्षा जास्त रक्कम वसूल केल्यामुळे या तृतीयपंथीयांना पोलीसांचा आशिर्वाद आहे का ? असा सवाल कुंभार पिंपळगांव येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे दि.21 रोजी काही तृतीयपंथी मार्केट मध्ये फिरून पैसे गोळा करत होते, होळी निमित्त पैसे द्या म्हणून सांगत होते. कुंभार पिंपळगांवात अंदाजे 1000 व्यापारी दुकाने आहेत. सदरील तृतीयपंथी प्रत्येक दुकानावर जावून प्रत्येकाला 100 रूपये मागत होते, किमान 50 रूपये दिल्याशिवाय पुढे जात नव्हते.
कोणी 10 किंवा 20 रूपये दिल्यास त्याला अपशब्द वापरणे, गलीच्छ भाषा वापरणे, अपमानास्पद बोलणे, दुकानात ढोल वाजवणे, वाद घालणे, इतरांसमोर अपमान करणारी भाषा वापरणे असे प्रकार करतांना दिसून आले. सदरील तृतीयपंथीयांनी व्यापारी व नागरिकांकडून 50 ते 100 आणि त्यापेक्षाही जास्त रक्कम बळजबरीने घेतल्याचे बोलले जात आहे.
किती पैशांची वसूली ?
कुंभार पिंपळगांवात फिरत असलेल्या तृतीयपंथीय लोकांकडे 500, 200, 100, 20, 10 अशा प्रकारचे अनेक पैशांचे बंडल पहायला मिळाले. कुंभार पिंपळगांवात अंदाजे 1000+ दुकाने आहेत, तृतीयपंथीय लोकांनी व्यापारी व नागरिकांकडून शक्यतो 50 ते 100 रूपये वसूल केल्याचे दिसून आले. किमान 50 रूपये जरी गृहीत धरले तरी 1000 व्यापारी व नागरिकांचे मिळून 50 हजार रूपये वसूल करून नेल्याचे सांगितले जात आहे.
बळजबरी कशामुळे ?
दररोज व्यापाऱ्यांकडे कोणी ना कोणी मागायला येतात, तेव्हा ते काहीही न विचारता दक्षणा म्हणून प्रेमाने देतात, परंतू तृतीयपंथी लोक जेव्हा दुकानात पैसे मागायला येतात तेव्हा त्यांची अपेक्षा अमुक एवढेच पैसे पाहीजेत, तेवढेच पैसे पाहीजेत म्हणून आग्रह असतो. दि.21 रोजी सुध्दा अशाच प्रकारे अपमानास्पद व अपशब्द वापरून व्यापारी व नागरिकांकडून पैसे वसूल करण्यात आले. परंतू कोणीही दुकानावर यायचे आणि त्यांनी हवे तेवढे पैसे मागायचे म्हणजे कुंभार पिंपळगांवात आता काय हप्ता वसूली सुरू झाली आहे का ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दर बुधवारी सुध्दा वसुली ?
अधून मधून वरील प्रमाणे एकापेक्षा जास्त तृतीयपंथीय लोक कुंभार पिंपळगांवात वसूली साठी येतच असतात, मात्र त्या सोबतच दर बुधवारी किंवा आठवड्यातून एकदा प्रत्येक दुकानदाराकडून हप्ता वसूली केली जाते. ही हप्ता वसूली कशामुळे आणि का ? असा प्रश्न व्यापारी व नागरिकांना पडला आहे.
पोलीसांचा आशिर्वाद आहे का ?
कुंभार पिंपळगांवात सर्रासपणे कोणी टोळकं घेवून फिरत असेल आणि बळजबरीने व अपमानास्पद बोलून व्यापारी व नागरिकांकडून मनमर्जी प्रमाणे वसूली करत असेल तर घनसावंगी पोलीस ठाण्याला किंवा कुंभार पिंपळगांव पोलीस चौकीला हे माहित नाही का ? हा प्रकार पोलीसांना माहित असेल तर कारवाई का नाही ? हप्ता वसूली करण्याची पोलीसांनी परवानगी दिली आहे का ? जर नसेल तर मग पोलीस प्रशासनाचा आशिर्वाद आहे का ? कायद्याने अशा प्रकारची वसूली करता येते का ? असे प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.