एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या अडचणी कमी होतील असे वारंवार सांगण्यात आले असले तरी परिस्थिती अजूनही जैसेथेच दिसून येत आहे. मागील काळात ज्या प्रमाणे ऊस घेवून जाण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार विनंत्या कराव्या लागल्या तशीच परिस्थिती आजही दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भगवान सहादू सागे हे रेणाखळी (ता.पाथरी) येथील रहीवाशी असून घनसावंगी तालुक्यातील समृध्दी शुगर्स या कारखान्याचे शेअर्सधारक आहेत. भगवान सागे यांनी रेणाखळी येथील शेतात चार एकर ऊस लागवड केलेली आहे. गेल्या वेळेस समृध्दी कारखान्याने ऊस नेला होता, परंतू आता ऊसाला 15 महिने झाले तरी कारखाना ऊस घेवून जात नाही.
भगवान सागे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ऊसाची नोंद सुध्दा कारखान्याकडे केलेली आहे. त्यांच्या परिसरातील 10 महिने झालेले ऊस कारखान्याने घेवून गेले आहेत, परंतू त्यांच्या ऊसाला 15 महिने उलटले तरी कारखाना ऊस घेवून जात नाही, त्यामुळे ते मानसिक तनावाखाली आल्याचे त्यांनी सांगितले.
ऊस घेवून जाण्याबाबत श्री.सागे यांनी कारखान्याच्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना विनंती केली, सर्वांनी ऊस घेवून जावू असे वारंवार आश्वासन दिले परंतू अद्याप ऊस गेलेला नाही. ऊसाला देण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्यामुळे ऊस वाळून चालला आहे. वारंवार विनंती करूनही कारखान्याकडून ऊस घेवून जाण्याबाबत काहीच हालचाल करण्यात येत नसल्यामुळे हैराण होवून श्री.सागे यांनी समृध्दी कारखान्यासमोर दि.20 पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
भगवान सागे यांनी ऊस जात नसल्यामुळे जालना जिल्हाधिकारी, अंबडचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार घनसावंगी इत्यादींना निवेदन दिले आहे, परंत प्रशसनाकडूनही अद्याप कोणत्याही प्रकारची पाऊले उचलण्यात आल्याचे दिसत नाही.
सदरील प्रकरणाबाबत समृध्दी कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.
इतर महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.