एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून घरोघरी पाणी मिळेल या उद्देशाने शासनाने जलजीवन मिशन योजने अंतर्गत जवळपास २ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली, परंतू २ वर्षे उलटूनही गावाला अजून थेंबभर पाणीही मिळाले नाही, त्यामुळे मागील योजने प्रमाणेच या योजनेचा सुध्दा मुडदा पाडायचा का ? असा सवाल नागरिक करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, घरोघरी नळ कनेक्शनच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होवून पाणी टंचाई दूर व्हावी या चांगल्या उद्देशाने शासनाने १, ९५, ६४, २११ रू. ची जलजीवन मिशन योजना मंजूर केली, सदरील योजनेला मंजूरी मिळून ५ जानेवारी २०२३ पासून ५४५ दिवसात (दिड वर्षात) या योजनेचे काम पूर्ण करणे आवश्यक होते.
मात्र आजघडीला २ वर्षे उलटूनही म्हणजेच कामाचा कालावधी उलटूनही अतिरिक्त ६ महिने उलटूनही सदरील जलजीवन योजनेचे काम अर्धवट अवस्थेत बंद आहे. अर्थातच योजना अर्धवट असल्याने अद्याप थेंबभर पाणीही गावाला मिळालेले नाही. ६ महिन्यापूर्वी संबंधित गुत्तेदाराने योजनेअंतर्गत गावाबाहेरचे काम बऱ्यापैकी होत आले आहे लवकरच गावातील काम सुरू करण्यात येईल असे सांगितले होते, परंतू तेव्हापासून सुध्दा काहीच काम झाले नसल्याचे दिसत आहे.
कुवत पाहूनच काम !
ज्या वेळेस कोणत्याही योजनेचे काम एखाद़्या गुत्तेदाराला दिले जाते तेव्हा त्या गुत्तेदाराची काम करण्याची कुवत आहे का ? हे संबंधित विभागाकडून पाहिले जाते. जलजीवन मिशन योजने अंतर्गतही जेव्हा संबंधित गुत्तेदाराला काम देण्यात आले तेव्हा या कामासाठी लागणारे २ कोटी रूपये या गुत्तेदाराकडे असतील तेव्हाच काम देण्यात आले असेल ना ? त्यामुळे शासनाचे बील यदाकदाचित आले नसेल तरीही मुदतीच्या आत काम करणे आवश्यक असते, अधिकचे ६ महिने उलटूनही काम अर्धवट अवस्थेत बंद असेल तर काम देतांना संबंधित अधिकाऱ्यांकडून काही चूक झाली का ? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
राष्ट्रीय पेयजल योजनेचा मुडदा !
कुंभार पिंपळगांव येथे सन २०११ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत १ कोटी १७ लाख रूपये मंजूर करण्यात आले होते, कामाला सुरूवातही झाली होती, मात्र काम अर्धवट अवस्थेत बंद करून गुत्तेदार गायब झाला होता, सदरील पाणी पुरवठा योजनेत अनेकांनी हात धुवून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थातच सदरील योजने अंतर्गत १ कोटी १७ लाख रूपये मंजूर होवूनही गावाला थेंबभर पाणीही मिळाले नाही आणि योजना बंद पडली, गुत्तेदाराने अनेकांना हाताशी धरून योजने अंतर्गत कामाची बिले काढून पळ काढला होता, अद्याप या भ्रष्टाचाराची आणि एकूणच योजनेची कुठलीही चौकशी झाली नाही हे विशेष.
ज्या प्रमाणे राष्ट्रीय पेयजल योजनेचा मुडदा पाडून १ कोटी १७ लाख रूपये अनेकांच्या घशात घालण्यात आले त्या प्रमाणे २ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या जवळपास २ कोटी च्या जलजीवन मिशन योजनेचे सुध्दा होणार का ? ही पाणी पुरवठा योजना सुध्दा बंद पाडून अनेकजण हात धुवून घेणार का ? योजनेवर देखरेख करणारी यंत्रणाही झोपी गेली आहे का ? कालावधी संपूनही अधिकारीही कुठलीही कारवाई करत नसतील तर अधिकाऱ्यांचाही संबंधित गुत्तेदाराला आशिर्वाद आहे का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
…तर २०२५ मध्येही टॅंकरच ?
गत वर्षी म्हणजेच २०२४ च्या उन्हाळ्यात अनेक मोठ्या टॅंकरने गावाला पाणी पुरवठा करण्यात आला, तरीही छोट्या गल्ल्यांमुळे तेव्हा अनेक कुटुंब वंचित राहिले, या काळात लाखो रूपये पाण्यावर खर्च करण्यात आले, आता पुन्हा लाखो रूपये यावर्षी सुध्दा शासनाला खर्च करावा लागणार का ? कारण २ कोटीची जलजीवन मिशन योजना २ वर्षांपूर्वी मंजूर होवूनही काम अर्धवट अवस्थेत बंद आहे, मग पुन्हा उन्हाळ्यात टंचाईमुळे टॅंकरच्या भरवशावरच पाणी मिळणार का ? असा सवाल नागरिक करत आहेत.
नेत्याचा काय संबंध ?
सदरील गुत्तेदार हा माजी आमदाराचा प्रिय गुत्तेदार असल्याचे कळते, एखाद़्या नेत्याचे जवळचे असल्यास काम गुंडाळून ठेवण्याचा परवाना मिळतो का ? वर्षानुवर्षे गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो तरीही संबंधित नेत्याने काम बंद ठेवण्याची मुभा दिलेली आहे का ? दिलेल्या मुदतीत काम करणे आवश्यक असतांना कालावधी पेक्षा ६ महिने जास्त होवूनही काम अर्धवट अवस्थेत बंद ठेवण्यासाठी संबंधित माजी आमदाराने सांगितले का ? माजी आमदारांचे अनेकांवर प्रेम आहे मग त्यात माजी आमदाराचा काय दोष ? माजी आमदाराच्या आडून काम बंद ठेवून आणि बिले उचलून पसार व्हायचे नियोजन तर नाही ना ? असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत.
जबाबदारी कोणाची ?
याबाबत कुंभार पिंपळगांव येथील सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता काम करण्यासाठी आमचे सर्व सहकार्य आहे, ग्रामपंचायतमुळे हे काम थांबलेले नाही असे सांगितले. तर ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) महादेव रूपनर यांच्याशी संपर्क साधला असता कदाचित वरून बील मिळाले नसेल त्यामुळे काम थांबले असेल असे त्यांनी सांगितले. तर गटविकास अधिकारी समीर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांना योग्य त्या सूचना करण्यात येतील व आवश्यक ती चौकशी केली जाईल असे सांगितले. तर पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता श्री.ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता योजनेचे काम बंद का पडले आणि काम पूर्ण का झाले नाही याची चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले.
तसेच जि.प.पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही, तसेच या योजनेवर देखरेख करणाऱ्या यंत्रणेचे अधिकारी अमित कुमार यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेवून सांगतो असे त्यांनी सांगितले, त्यामुळे नेमकी जबाबदारी कोणाची ? आणि गुत्तेदाराला पाठीशी कोण घालतंंय ? असा सवाल उपस्थित होत आहे.