एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
महिला सक्षमीकरणासाठी शासनाने कितीही नियम कायदे केले तरी मुळात प्रशासकीय यंत्रणेची भुमिका विपरीत दिसून येत असल्याने महिलांना त्यांच्या अधिकाराचा फायदा होतांना दिसून येत नाही. निवडून आलेल्या महिलांना घरी बसवून पती किंवा मुलगाच कारभार पाहणार असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना दिलेल्या आरक्षणाचा फायदा काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील ग्रामपंचायत मध्ये जवळपास 12 महिला सदस्य निवडून आलेल्या आहेत, मात्र अपवाद सोडल्यास यापैकी एकही महिला सदस्यांना ग्रामपंचायत मध्ये येवू दिले जात नाही किंवा कोणत्याही मिटींग मध्ये त्यांना सहभागी होवू दिले जात नाही, त्यांच्या जागी पती किंवा मुलगाच काम पाहत आहे.
कुंभार पिंपळगांव येथील ग्रामपंचायत मध्ये दि.13 रोजी सुध्दा मासिक मिटींगचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या मिटींग मध्ये अपवाद वगळता महिला ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नव्हत्या. अर्थातच त्यांच्या जागी पती किंवा मुलगा या मिटींग मध्ये हजर असल्याचे दिसून आले. म्हणजेच सदरील महिला ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायतच्या विविध मिटींग व कामकाजात सहभागी होण्याची इच्छा असतांनाही पती किंवा मुलाकडून त्यांना ग्रामपंचायत मध्ये येण्यापासून रोखले जात आहे.
महिला नामधारीच…!
कुंभार पिंपळगांव ग्रामपंचायत मध्ये महिला नामधारी अन पुरूष कारभारी असण्याचा प्रकार फक्त आजच होत आहे असे नाही, यापूर्वी सुध्दा अशाच प्रकारे महिला सदस्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे प्रकार घडले आहेत. आता सुध्दा तीच परंपरा पुढे सुरू आहे. महिला सदस्यांना ग्रामपंचायतची माहिती नाही असे सांगुन त्यांना घरीच बसवले जात आहे. अर्थातच महिलांना आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे.
ग्रामसेवकांचा आशिर्वाद !
ग्रामपंचायत मध्ये जेव्हा एखादी मासिक किंवा इतर मिटींग (बैठक) आयोजित केली जाते त्या मिटींगची संपूर्ण जबाबदारी ही ग्रामसेवक अथवा ग्रामविकास अधिकारी यांच्यावर असते, परंतू कुंभार पिंपळगांवचे ग्रामसेवक श्री.रूपनर हेच महिलांना वंचित ठेवण्यात हातभार लावत असल्याचे सध्या नागरिक सांगत आहेत. मासिक मिटींगचे आयोजन केले असतांना त्या मिटींग मध्ये निवडून आलेल्या महिला सदस्यांच्या जागी पती किंवा मुलगा कसा बसत आहे हे विचारण्याची हिम्मत ग्रामसेवक महोदयांमध्ये नाही. अर्थातच पती किंवा मुलानेच येवून मिटींग मध्ये सहभाग घ्यावा आणि मलाई कशी वाटून खायची याची चर्चा करता यावी यासाठी त्यांचाच आशिर्वाद असल्याचे नागरिक सांगत आहेत.
वरिष्ठांचे दुर्लक्ष !
कुंभार पिंपळगावात नियम कायदे पायदळी तुडवले जात असतांना पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेचे अधिकारी मुकदर्शक होवून पाहत आहेत. वर्षानुवर्षे स्थानिक अधिकारी नियम कायदे बाजूला सारून मनमर्जीप्रमाणे वागत असतांना वरिष्ठांचे होत असलेले दुर्लक्ष पाहता वरिष्ठांबाबतही संशय निर्माण होवू लागला आहे.