एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
नवी आशा, नवी आकांक्षा, नवीन स्वप्न आणि नवीन संधीसह 2024 वर्ष सुरू झाले आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक दिवसच काही तरी करण्याची संधी देत असतो, मनात आणलं तर अशक्य ते शक्य करण्यासाठी दिशा सुध्दा मिळू शकते. परंतू यासाठी आपली मानसिकता आणि इच्छाशक्ती आवश्यक आहे.
गावाचा विकास !
गावाचा किंवा आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा विचार आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे. कोणी बोलत नाही म्हणून आपणही बोलायचे नाही ही मानसिकताच आपल्या परिसराचा विकास खुंटण्यासाठी कारणीभूत ठरत असते.
आपल्या गावाचा किंवा परिसराचा विकास व्हावा ही सर्वांची इच्छा असते परंतू विकास कशा प्रकारचा व्हावा, त्यात कोणते मुद्दे महत्वाचे आहेत, कोणते प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे, काय केल्यामुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात अमुलाग्र बदल होतील याचा विचार होणे आवश्यक आहे.
प्रश्न गावाचा असेल तर !
जर प्रश्न आपल्या गावाचा असेल तर गावात कोणकोणते प्रश्न आहेत, ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणते प्रश्न सुटू शकतात, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून कोणते प्रश्न सुटू शकतात, आमदार, मंत्री, खासदार यांच्या माध्यमातून कोणते प्रश्न मार्गी लागू शकतात याचा विचार होणे आवश्यक आहे.
परिसराचा प्रश्न असेल तर !
ज्या प्रमाणे गावाचे प्रश्न असतात त्याच प्रमाणे काही प्रश्न समस्या परिसर किंवा सर्कलच्या असतात, ज्याचा फायदा फक्त एखाद्या गावाला होत नसतो तर परिसरातील असंख्य गावाला होत असतो. अशा प्रकारचे प्रश्न मार्गी लागल्यास आणि विकास कामे होत राहील्यास त्या गावांसह परिसराचा विकास होत असतो. त्यामुळे आपल्या गावासह परिसरातील प्रश्नांचाही विचार होणे आवश्यक आहे.
सामुहीक चर्चेतून मार्ग !
आपल्या गावाचे प्रश्न असो किंवा आपल्या सर्कल किंवा परिसरातील प्रश्न असो याबाबत चर्चा करण्यासाठी वेळोवेळी बैठक आयोजित होणे आवश्यक आहे. गावातील प्रश्न असतील तर गावातील नागरिकांसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची बैठक घेवून संबंधित प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे पाठपुरावा करता येईल, याबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे.
प्रश्न परिसर किंवा सर्कलचा असेल तर आपल्या गावासह परिसरातील गावातील नागरिक व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासह प्रमुख व्यक्तींची बैठक आयोजित केल्यास चर्चेतून अनेक विषय समोर येवू शकतात. विविध विषयावर चर्चा करून आपल्या परिसरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी कशा प्रकारे आणि कोणाकडे पाठपुरावा करायचा याबाबत दिशा ठरवल्यास पुढील वाटचाल करणे अधिक योग्य ठरते.
माझं काय बंद पडलंय ही स्वार्थी मानसिकता नको !
आपल्या गावाचा आणि परिसराचा विकास व्हायला पाहीजे ही तर प्रत्येकाची मानसिकता असते, परंतू त्यासाठी आपण काहीच प्रयत्न करायचे नाही, उलट माझं काय बंद पडलंय ही स्वार्थी मानसिकता ठेवणे म्हणजे आपण आपलेच नुकसान करत आहोत याचाही विचार करणे आवश्यक आहे.
एखाद्या प्रश्नावर आपण जो पर्यंत स्वत:हून पुढाकार घेत नाही तो पर्यंत संबंधित प्रश्न तसाच प्रलंबित राहतो. असं म्हटलं जातं की, बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही, मग आपले प्रश्न आपण मांडल्याशिवाय संबंधित लोकप्रतिनिधी किंवा नेत्यांना कळणार तरी कसे ? एखाद्या प्रश्न किंवा समस्येचा पाठपुरावा केल्याशिवाय तो प्रश्न मार्गी लागणार तरी कसा ? याचाही विचार करणे आवश्यक आहे.
2024 निवडणूकीचे वर्ष !
या वर्षात विविध निवडणूका होणार आहेत, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा एकामागोमाग एक निवडणूक होणार आहेत. मात्र असे असले तरी आपल्या गाव व परिसराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. अर्थातच विकास एका झटक्यात होत नसतो, त्यासाठी प्रयत्न आणि सातत्य ठेवणेही आवश्यक असते.
चांगले लोकप्रतिनिधी निवडा !
आपल्या गावाचा किंवा परिसराचा विकास कोण करू शकतो ? आपल्या सर्वांसाठी कोण तत्पर असतो ? कोणत्या व्यक्तीमध्ये विकास करण्याची धमक आहे ? या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण आपला लोकप्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. कारण एकदा चुकीचा माणूस निवडून दिल्यास पुन्हा 5 वर्षे काहीच करता येत नाही.
नवीन वर्ष 2024
आता नवीन वर्ष सुरू झाले आहे, किमान या वर्षात तरी विविध विषय जसे की, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, रोजगार, स्वयंरोजगार, सुरक्षा, प्रशिक्षण, परिवहन, आधुनिक शेतीसाठी प्रशिक्षण, विविध योजना अशा अनेक गोष्टींसाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि पाठपुरावाही करू शकतो, तुम्ही पुढाकार घ्या, इतरही तुमच्यासोबत जुडतील.
सर्वांनी मिळून आपल्या गाव व परिसराचा विकास करण्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केल्यास नक्कीच बदल दिसून येईल यात शंका नाही… मग प्रयत्न आणि पाठपुरावा कराल ना…. असो… नवीन वर्ष आपणास व आपल्या परिवारास सुख, समृध्दी, आरोग्यदायी, आनंदाचा व प्रगतीचा जावो हीच मन:पूर्वक शुभेच्छा…
- परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज