एल्गार न्यूज :-
एल्गार न्यूजचे संपादक परवेज पठाण हे त्यांच्या कुंभार पिंपळगांव येथील ऑफीस मध्ये एकटे बसलेले असतांना प्लॉटिंगवाल्यांनी जमाव करून धक्काबुक्की केली, तसेच शिवीगाळ करून ऑफीसची नासधूस व नुकसान केले आहे. याबद्दल सर्वस्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एल्गार न्यूजचे संपादक परवेज पठाण हे कुंभार पिंपळगाव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे राहतात, अर्थात त्यांचे हे जन्मगांव आहे. या ठिकाणी होत असलेल्या बेकायदेशीर प्लॉटिंग बाबत एल्गार न्यूज मध्ये बातमी प्रकाशित झाली होती. या गोष्टीचा राग मनात धरून दि.२६ रोजी परवेज पठाण हे ऑफीस मध्ये एकटेच असतांना ३० ते ४० जणांचा जमाव ऑफीस मध्ये घुसला, संपादक संबंधित व्यक्तींचे जे काही बोलणे आहे ते ऐकून घेण्यास तयार होते. काही बोलण्याआधीच त्यातील ४ ते ५ जणांनी अरेरावी करत, तुम्ही बातमी का घेतली, तुमच्या बातम्यांमुळे आमचे खूप नुकसान होत आहे, आता आम्ही सहन करणार नाही, तुम्हाला गावात राहू देणार नाही, असे सांगून धक्काबुक्की केली, बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, ऑफीस मधल्या सामानाची नासधूस करून नुकसानही केले, यामध्ये कॉम्प्यूटरच्या मॉनिटरचे नुकसान झाले, कॉम्प्यूटरच्या अनेक केबल तुटल्या, सीपीयू मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली, विद्युत बोर्डातल्या पीन तूटून पडल्या, काचा फुटल्या, तसेच जमावातील अज्ञात व्यक्तीने शिवीगाळही केली. सदरील लोक हे संपादकांवर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशानेच आले होते असे त्यांच्या कृत्यातून आणि रागाच्या भरात बोलण्यातून स्पष्ट दिसत होते.
यावेळी संपादक आणि प्लॉटिंगवाल्यांमध्ये बाचाबाची झाल्याने, तसेच सदरील प्रकार अचानक घडल्यानंतर परिसरातील लोकांनाही नेमकं काय झालं हे समजेनासे झाले. ऑफीस मार्केट मध्येच असल्याने पत्रकारांसह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ऑफीसकडे धाव घेवून जमावाला बाहेर काढले आणि संपादक यांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला.
राग मनात धरून हल्ला !
मागील काळात बातमी प्रकाशित केल्यानंतर याच प्लॉटिंगवाल्यांनी दुसऱ्याच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न केला होता, तो प्रयत्न यशस्वी झाला नसल्याने त्यांनी नवीन शक्कल लढवली होती ती म्हणजे बदनाम केल्यावर तरी बातम्या थांबतील, मात्र त्याचा फायदा झाला नाही, कारण संपादकांना गांव परिसरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील नागरिक ओळखतात, १७ वर्षात पत्रकारितेवर कुठलाही डाग लागलेला नाही. त्यानंतर दि.२५ रोजी पुन्हा बातमी प्रकाशित झाल्यानंतर या प्लॉटिंगवाल्यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी दि.२६ रोजी ३० ते ४० जणांचा जमाव करून ऑफीसमध्ये घुसले व त्यापैकी ४ ते ५ जणांनी धक्काबुक्की करत हल्ला केला तसेच शिवीगाळ करून नासधुस व नुकसान केले.
हिंसेचा मार्ग का ?
आपण लोकशाही मध्ये जगत आहोत, बातमीशी कोणी सहमत नसेल, तर ते लोक संवाद साधू शकले असते किंवा चर्चा करू शकले असते किंवा गाव परिसरातील मान्यवर व्यक्तींच्या माध्यमातून त्यांचे म्हणणे मांडू शकले असते, परंतू जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने ऑफीस मध्ये घुसून संपादकांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करणे, कॉम्प्यूटर व इतर साहित्याची नासधुस किंवा नुकसान करणे हे कोणत्या कायद्यात बसणारे आहे ? मनाला पटलं नाही म्हणून हल्ला करणार का ? धक्काबुक्की करणार का ? शिवीगाळ करणार का ? ऑफीसची नासधुस करणार का ? कुंभार पिंपळगावात वेगळा कायदा आहे का ? असं म्हटलं तर ही लोकशाही नाही हुकुमशाही म्हणायची का ? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. अर्थातच भविष्यात कोणत्याही माध्यमातून संपादक परवेज पठाण यांच्या जिवीतेला धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्लॉटिंगवाल्यांची राहील.
शौर्य की गुंडगिरीचं प्रदर्शन ?
ज्या माणसाने घर जाळून कोळशे करत आयुष्यातील १७ वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून सर्व समाजासाठी दिली, ज्याने अनेक अडचणी असतांनाही कधीही कुठलीही अपेक्षा केली नाही, ज्याने एवढे दु:ख भोगले की त्याची सीमा नाही, जो कोणत्याही समाजासाठी नेहमी तत्पर राहीला, नि:पक्ष, निर्भीड व रोखठोकपणे सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढला, त्याच्यावर हल्ला करायला त्यांना लाज वाटली नाही का ? एकटा माणूस ऑफीस मध्ये असतांना ३० ते ४० जणांचा जमाव करून जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने धक्काबुक्की करणे, शिवीगाळ करणे, नासधुस व नुकसान करणे, हे शौर्य आहे की गुंडगीरीचं प्रदर्शन ? हीच का तुमची मर्दानगी ? हा सुध्दा प्रश्न उपस्थित होतो.
याला लोकशाही म्हणायचं का ?
३० ते ४० जणांचा जमाव करून एकट्या पत्रकारावर हल्ला करता, धक्काबुक्की करून अरेरावीची भाषा करता, त्याचे नुकसान करता, अरे थोडी तरी लाज वाटू द्या. एवढंच नव्हे तर पडद्यामागे लपून गावातून बाहेर काढण्याची भाषा करता, कुंभार पिंपळगांव कुणाच्या बापाची मालमत्ता आहे का ? किंवा कुणाच्या आज्या पंज्याने गाव विकत घेतलं होतं ? म्हणजे गावाच्या बाहेर काढण्याची भाषा करता. असे असेल तर लोकशाही शिल्लक राहिली असं म्हणता येईल का ?
असे करून धार्मिक कार्य करणार का ?
ज्या धर्मात दुसऱ्यांना (मग तो कोणत्याही समाजाचा असो) कुठलाही त्रास होता कामा नये, कोणाचे मन दुखावू नये, हे स्पष्ट सांगितलंय, त्याच धर्मातील लोक स्वधर्मीय व्यक्तीलाच धक्काबुक्की करून शिवीगाळ करत असतील, हल्ला करत असतील, ऑफीसची नासधुस करत असतील, नुकसान करत असतील तर या व्यक्ती धर्माचा पालन करत आहेत का ? असे कृत्य करून धार्मिक कार्यासाठी जाणार का ? असे कृत्य करून कोणत्या तोंडाने धर्माचा उपदेश करणार ? असे कृत्य करून विदेशात धार्मिक कार्यासाठी जाता येते का ? भारतीय कायद्याच्या विरूध्द केलेला कोणताही व्यवसाय २ नंबरच्या श्रेणीत येतो, मग २ नंबरचे धंदे करून जमा केलेला पैसा धार्मिक कार्यासाठी चालतो का ? धक्काबुक्की, शिवीगाळ आणि नासधूस करून आपण समाजासमोर काय उदाहरण ठेवत आहोत. असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
मान्यवरांकडून विनंती !
सदरील प्रकार दि.२६ रोजी घडल्यानंतर सायंकाळपर्यंत गावातील पत्रकार बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संपादक परवेज पठाण यांची भेट घेवून शांत राहून संयमाने विषय हाताळण्याची विनंती केली. कारण संपादकांच्या कुटुंबातील सदस्य दबावाखाली दिसत असून संपादक यांच्या कुटुंबातील एक सदस्य आजारी आहेत, त्यानुसार सर्व पत्रकार बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सल्ल्याने पुढे काय पाऊल उचलायचे याचा निर्णय घेण्यात येईल.