एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे जलजीवन मिशन अंतर्गत २ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचे एक पाईप सुध्दा गावात टाकण्यात आलेले नसतांना गावाला हर घर जल घोषित करण्यात आले. त्यामुळे हर घर जल घोषित करतांना २ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी भुतांना पाजलंय का ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पाण्यासाठी भटकंती !
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे सर्वसामान्य नागरिकांना आजरोजी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतकडेच पाणी पुरवठा असतो याचा विसर ग्रामपंचायतला पडलेला आहे, त्यामुळे कोणत्याही माध्यमातून नागरिकांना पाणी मिळत नसल्याने नाईलाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांना खाजगी टॅंकरद्वारे पैसे खर्च करून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
२ कोटीची योजना अर्धवट !
कुंभार पिंपळगांव येथे जलजीवन मिशन अंतर्गत सन २०२३ मध्ये जवळपास २ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर होवून त्याचे काम सुरू झाले होते, काम पूर्ण करण्याचा कालावधी दिड वर्षाचा होता, परंतू २ वर्षापेक्षा जास्त कालावधी होवूनही काम पूर्ण झालेले नाही, मागील अनेक महिन्यांपासून सदरील योजनेचे काम अर्धवट अवस्थेत बंद आहे.
एक पाईप सुध्दा नाही !
कुंभार पिंपळगांवला जलजीवन मिशन योजने अंतर्गत २ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती, या योजने अंतर्गत गावातील (१०० %) प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन द्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे आवश्यक होते, परंतू आज रोजी पर्यंत गावात योजने अंतर्गत एक पाईप सुध्दा टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे पाणी मिळण्याचा प्रश्नच नाही.
हर घर जल घोषित !
माणसांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना थेंबभर पाणी सुध्दा आज रोजी मिळत नाही, कदाचित ग्रामपंचायतने पाणी पुरवठा योजने अंतर्गत आकाशातून पाईपलाईन केली असेल आणि कदाचित नळ कनेक्शन द्वारे भुतांना पाणी पाजले असेल त्यामुळे कुंभार पिंपळगांव “हर घर जल” घोषित करण्यात आले असावे. फक्त घोषित नव्हे तर पाणी पुरवठा विभागाने हर घर जल प्रमाणपत्र जारी केले असून ग्रामपंचायतने सुध्दा ग्रामसभेचा ठराव देवून तशी नोंद शासन दरबारी करण्यात आली आहे.
हर घर जल प्रमाणपत्रानुसार सध्या कुंभार पिंपळगांवात…
- गावात सगळीकडे पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
- गावात पाईपलाईन मध्ये कुठेही पाण्याची गळती होत नाही.
- गावातील प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळते.
- गावातील १०० टक्के कुटुंबाला नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळते.
- सर्वांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
- पाण्याची क्वालिटी केंद्र शासनाच्या BIS 10500 मानकाप्रमाणे शुद्ध आहे.
- पाणी पुरवठ्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
- पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यावर खोदण्यात आलेले सर्व रस्ते दुरूस्त करण्यात आले आहेत.
- गावातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्र, आश्रमशाळा, ग्रामपंचायत इमारत, आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी नळ जोडणी देण्यात आली आहे.
- घरातील, गावातील शासकीय संस्थांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.
- पावसाचे पडणारे पाणी जमिनीत पुनर्भरण करण्यात येत आहे.
प्रत्यक्षात असे काहीही झालेले नाही, शासन दरबारी खोटे प्रमाणपत्र आणि खोटी नोंद करून सर्वसामान्य नागरिकांसह शासनाची फसवणूक करण्यात आली आहे.
शासन दरबारी नोंद !
जि.प.पाणी पुरवठा विभाग आणि ग्रामपंचायतने शासन दरबारी हर घर जल घोषित करून केलेल्या नोंदीनुसार (खालील स्क्रीनशॉट प्रमाणे) कुंभार पिंपळगांवाची लोकसंख्या ८५९० असून यामध्ये अनुसूचित जाती १०३१ असून अनुसूचित जमाती – १४ आहेत तर जनरल – ७५४५ आहेत. गावात एकूण कुटुंब १६१० असून संपूर्ण १६१० म्हणजेच १०० % कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे शुद्ध पाणी मिळत असल्याची शासन दरबारी नोंद करण्यात आली आहे. (स्क्रीनशॉट खाली दिला आहे.)

सर्व शाळा अंगणवाड्यांना पाणी !
जि.प.पाणी पुरवठा विभाग, ग्रामपंचायत यांनी शासन दरबारी केलेल्या नोंदीनुसार कुंभार पिंपळगांवात ८ शाळा व ११ बालवाडी / अंगणवाड्यांना नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे घोषित करून तशी नोंद शासन दरबारी केली आहे. (स्क्रीनशॉट खाली दिले आहेत.)


हर घर जल घोषित मग पाणी कुठंय !
कुंभार पिंपळगांवात जल जीवन मिशन अंतर्गत २ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचे एक पाईप सुध्दा गावात टाकण्यात आलेले नाही, त्यामुळे नळ कनेक्श्न द्वारे पाणी मिळण्याचा प्रश्नच नाही. गावात काही गल्ल्यांमध्ये जागोजागी फुटलेल्या पाईपलाईन मधून कधीतरी जो पाणी पुरवठा होतो तो सुध्दा जुन्या पाईपलाईनचाच आहे.
टॅंकरचा भुर्दंड !
उन्हाळ्याचे दिवस सुरू असून विहीर व बोअरवेलचे पाणी आटले आहे, त्यातच वर्षानुवर्षे ग्रामपंचायतला मुलभूत गरज म्हणून साधे पाणी सुध्दा गावाला पुरवता आलेले नाही. पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांना खाजगी टॅंकरच्या माध्यमातून पैसे देवून अर्थातच विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
ग्रामसेवक नेहमी गायब !
कुंभार पिंपळगांवच्या ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी) यांना शासनाकडून कदाचित विशेष सवलत देण्यात आली असावी, त्यामुळे ते आठवड्याला किंवा १५ दिवसाला मनात येईल तेव्हाच फेरफटका मारायला येतात. ज्यांचे अर्थपूर्ण कार्य आहे त्यांना गावाच्या बाहेर, झाडाखाली, हॉटेल मध्ये, धाब्यावर किंवा घनसावंगीला बोलावून खिसे गरम केले जातात आणि काम करून दिले जाते. गावाचं वाटूळं करण्यात या महाशयांचा मोलाचा वाटा आहे. हर घर जल घोषित असो किंवा जलजीवन मिशन योजना असो यांच्या सहकार्याशिवाय सदरील कारनामा होवूच शकत नाही.
२ कोटीची योजना पूर्ण होणार का ?
पाणी टंचाईतून मुक्ती मिळावी, घरोघरी नळ कनेक्शनच्या माध्यमातून शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने कुंभार पिंपळगांवला सन २०२३ मध्ये २ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती, मात्र शासकीय टेंडरनुसार गुत्तेदाराने ठरवून दिलेल्या दिड वर्षाच्या कालावधीत काम पूर्ण केले नाही, उलट अधिकचे ९ महिने झालेले आहेत. तरीही आजरोजी अर्धवट अवस्थेत काम बंद आहे. मागील अनेक महिन्यांपासून सदरील योजनेचे काम बंद ठेवून गुत्तेदार पसार झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे २ कोटीची योजना पूर्ण होणार का ? सर्वसामान्य नागरिकांना नळ कनेक्शनद्वारे पाणी मिळणार का ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
घोटाळा अन फसवणूक !
जिल्हा परिषद, पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत व देखरेख करणारी यंत्रणा अशा सर्वांनी मिळून कुंभार पिंपळगांवसह जिल्ह्यात हर घर जल घोटाळा केला असून शासनाची सरळ सरळ फसवणूक केली आहे. त्यामुळे दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई होणार का ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.