एल्गार न्यूज :- (परवेज पठाण)
वाळूचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आता ड्रोनचा वापर करण्याच्या तयारीत आहे. वाळूमाफीयांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासन आता तयारीला लागले असून लवकरच आपल्याला नदी परिसरात ड्रोन उडतांना दिसू शकतात.
इतर जिल्ह्यांप्रमाणेच जालना जिल्ह्यात सुध्दा मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन व अवैध वाहतुक सर्रासपणे सुरू आहे. अनेक प्रयत्न करूनही वाळूची अवैध वाहतुक रोखण्यात प्रशासनाला अपयश येत असल्यामुळे जिल्हा प्रशासन आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग याकामी करण्याचा तयारीत आहे.
स्वस्त वाळूचा लाभ !
सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने धोरण बदलले आहे, डेपो तयार करून वाळू वितरीत करण्याचा प्रयत्न आहे, मात्र या धोरणाची अपेक्षित अंमलबजावणी होवू शकली नाही, त्यामुळे नागरिकांना स्वस्त वाळू मिळणे आजही अवघड आहे.
अवैध वाळूचे उत्खनन व अवैध वाहतुक रोखणे व निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून जनतेला स्वस्तात वाळू उपलब्ध करून देणे असा शासन, प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीनेच विविध उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत.
जास्त क्षमतेचे ड्रोन !
गुन्हेगारांना शोधण्यासाठी सध्या पोलीसांकडे असलेले ड्रोन कमी क्षमतेचे असल्याचे कळते, त्यामुळे जास्त क्षमतेचे अथवा क्वालिटीचे ड्रोन खरेदी करून त्या द्वारे दिवसा व रात्री सुध्दा नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुक रोखण्यात यश येईल असे पोलीसांसह प्रशासनाला वाटत आहे.
राज्यात पहिलाच प्रयोग !
वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुक सध्या राज्यात सगळीकडेच दिसून येत आहे. जालना जिल्ह्यात वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी ड्रोनचा वापर होणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर जिल्ह्यातही असा प्रयोग केला जाणार असल्याचे कळते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर !
वाळूची तस्करी रोखण्यासाठी पोलीसांसह महसूल प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागते, वाळू माफीयांनी वाळू तस्करीसाठी विविध मार्ग शोधलेले आहेत, मात्र ड्रोनचा वापर झाल्यास कोणत्या भागात वाळूची अवैधरित्या उत्खनन होत आहे किंवा वाहने कोणत्या दिशेला जात आहे याचा शोध घेणे व त्या दृष्टीने तात्काळ कारवाई करणे महसूल व पोलीस प्रशासनाला शक्य होणार आहे.
नागरिकांना दिलासा केव्हा !
सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू केव्हा मिळणार हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. कारण अनेक ठिकाणी वाळूचे लिलाव झालेले नाही तर दुसरीकडे वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जास्त पैसे देवून वाळू खरेदी करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने पाऊले उचलनू सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.