एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
खरं तर व्यापारी बांधवांना राजकारणाशी काहीही देणंघेणं नसतं, आपला छोटा मोठा उद्योग व्यवसाय करून व्यापारी आपला प्रपंच चालवत असतात. अनेक संकटे, अनंत अडचणी असतांनाही कुठलीही तक्रार न करता दिवसभरातील 12-12 तास दुकानांवर सेवा देवून राज्य आणि देशाच्या विकासात व्यापारी योगदान देत असतात.
कोणता पक्ष सत्तेवर आहे, कोणी कोणाशी हात मिळवणी केली आहे, कोण कोणाच्या मांडीवर जावून बसलं आहे याच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नसतं. सरकार कोणत्याही पक्षाचे असो व्यापाऱ्यांचे योगदान कायम असतं. शासन ज्या योजना राबविते, जी विकासकामे करते त्यामध्ये व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही. कारण व्यापारी कर (टॅक्स) च्या माध्यमातून नियमितपणे शासनाची तिजोरी भरत असतो. तरीही त्याला अपमानित करणे योग्य आहे का ? याचा विचार करणे आवश्यक आहे.
राऊत काय म्हणाले होते ?
राजकीय भाष्य करण्याच्या नादात खासदार संजय राऊत यांनी म्हणाले होते की, अमित शहा खोटं बोलताहेत आणि व्यापारी नेहमी खोटं बोलतो आपल्या फायद्यासाठी, दुकानदार जो असतो हा एकतर आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो, किंवा खोटं बोलतो, ग्राहकाला फसवतो… असे ते म्हणाले होते.
व्यापाऱ्यांना कशाला ओढता !
खरं तर संजय राऊत यांनी राजकीय नेते मंडळी विषयी किंवा त्यांच्या प्रतिस्पर्ध्याविषयी काय बोलायचं त्यांनी बोलावं, पण त्यांनी राजकीय आखाड्यात व्यापारी बांधवांना ओढणे योग्य आहे का ? तुम्ही एका राजकीय पक्षाचे प्रवक्ते असला तरी तुम्ही एक जेष्ठ पत्रकार सुध्दा आहात याचं भान तरी ठेवायला हवं होतं अशी प्रतिक्रिया व्यापारी बांधव देत आहेत.
सरसकट दोष कशाला ?
ज्या प्रमाणे विविध क्षेत्रात एक दोन टक्के चुकीचे लोक असतात, त्याच प्रमाणे उद्योग व्यापार क्षेत्रात सुध्दा एक दोन टक्के चुकीचे लोक असू शकतात, परंतू त्यामुळे सरसकट सर्वच उद्योजक किंवा व्यापारी चुकीचे आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. जो कोणी चुकीचे काम करत असेल त्यासाठी कायदा आहे आणि चुकीचे काम करणाऱ्या दोषींवर कायद्यान्वये कारवाई होत असते. त्यामुळे बोलण्याच्या ओघात सरसकट व्यापाऱ्यांना विनाकारण दोष देणे योग्य नाही.
रोजगार देणारे व्यापारी !
राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थे मध्ये व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे, अर्थातच सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये सुध्दा या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही, अशावेळी मोठ्या प्रमाणावर तरूण छोटे मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवत असतात. शिवाय इतरांनाही रोजगार देत असतात. एक तर त्यांना कुठला सपोर्ट नाही उलट त्यांना अपमानित करणे योग्य आहे का याचाही विचार राऊत यांनी करणे आवश्यक आहे.
लाखो व्यापारी मराठी !
राज्यात उद्योग व्यापार क्षेत्रात लाखो मराठी तरूण आहेत. मराठी असलेले असंख्य व्यापारी बांधव कर्ज काढून व्यापार करत आहेत व राज्याच्या आणि देशाच्या विकासात योगदान देत आहेत, मग या तरूणांना तुम्ही खोटारडे म्हणणार आहात का ? फसवणारे म्हणणार आहात का ? 12-12 तास दुकानांवर व्यवसाय करून आणि मेहनत करणारे आणि दोन पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवणारे आपलेच मराठी तरूण फसवणूक करत आहेत असं तुम्हाला म्हणायचं का ? त्यांच्या विषयी अशा प्रकारे बेजबाबदारपणे बोलणे तुम्हाला शोभतं का ? असा सवालही व्यापारी बांधव विचारत आहेत.
वादग्रस्त विधाने !
संजय राऊत यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधाने केलेली आहेत. परंतू ते एक लोकप्रतिनिधी अर्थातच खासदार आहेतच सोबतच ते एक ज्येष्ठ पत्रकार सुध्दा आहेत याचं भान सुध्दा त्यांनी ठेवायला हवं. तुमचा मान ठेवला जातो, कोणी काही बोलत नाही म्हणून आपण वाट्टेल ते बोलायचं नसतं अशी प्रतिक्रियाही व्यापारी वर्गातून येत आहे.
वक्तव्याचा निषेध !
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा व्यापारी बांधवांनी तिव्र शब्दात निषेध केला आहे. तुम्ही तुमचं राजकारण करा, त्यात व्यापाऱ्यांना ओढू नका. व्यापारी राजकीय भानगडीत पडत नाही. किमान सध्या निवडणुका आहेत याचं तरी भान ठेवा, आणि राऊत साहेब, तुमच्या चषम्यातून व्यापार किंवा व्यापारी बरोबर दिसत नसेल तर चष्मा बदला ! राज्याच्या आणि देशाच्या विकासात व्यापाऱ्यांचे योगदान विसरू नका आणि विनाकारण त्यांची मनं दुखवू नका अशी प्रतिक्रिया सुध्दा व्यापारी बांधवांनी व्यक्त केली आहे.
- परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज (जालना)