एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
प्रगत महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यात अशी काही गावे आहेत ज्यांना आपण नशीबवान म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या तालुक्यातील जवळपास ९० टक्के गावात पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या गावातील सर्व नागरिक एवढे नशीबवान आहेत की त्यांच्या प्रत्येकाच्या घरात नळ कनेक्शन असून तुट्टी फिरवली की एवढे पाणी येते की बस म्हटले तरी लवकर थांबत नाही ! पाणी एवढे शुद्ध आहे की फिल्टरचे पाणी सुध्दा त्याच्या समोर फेल आहे.
नशीबवान गावे कोणती ?
- अंतरवाली दाई
- अंतरवाली राठी
- आवलगाव खु.
- बाचेगाव
- बहीरेगाव
- बानेगांव
- भादली
- भायगव्हाण
- भेंडाळा
- भोगगाव
- भुतेगाव
- बोडखा बु.
- बोलेगाव
- बोंधलापुरी
- बोर रांजणी
- बोरगांव खु.
- चापडगांव
- चित्रवडगांव
- डहाळेगांव
- दहीगव्हाण बु.
- दैठणा बु.
- देवहिवरा
- देवडी हादगांव
- ढाकेफळ
- गाढे सावरगांव
- घाणेगाव
- घोन्सी बु.
- घोन्सी खु.
- घोन्सी तांडा नं.१
- गुंज बु.
- गुरूपिंप्री
- हातडी
- जांबसमर्थ
- जिरडगांव
- जोगलादेवी
- कंडारी अंबड
- कंडारी परतूर
- करडगांव
- खडकावाडी
- खालापुरी
- खापरदेव हिवरा
- कोठाळा बु.
- कोठी
- कृष्णपूरवाडी
- कुंभार पिंपळगांव
- माहेरजवळा
- मांदळा
- मानेपुरी
- मंगु जळगांव
- मोहपुरी
- मुढेगांव
- मुरमा
- मुर्ती
- नागेशनगर
- निपानी पिंपळगांव
- पाडूळी बु.
- पानेवाडी
- पांगरा
- पिरगैबवाडी
- राहेरा
- राजेगांव
- रामसगांव
- रानी उंचेगाव
- रांजणी
- रांजणीवाडी
- रवना
- साकळगांव
- सरफगव्हाण
- शेवता
- शेवगळ
- शिंदे वडगाव
- शिवणगांव
- श्रीपत धामनगांव
- तळेगांव
- उक्कडगांव
- विरेगव्हाण
- वडी रामसगांव
- यावलपिंप्री तांडा
- येवला
ही सर्व गावे १०० टक्के नशीबवान झाली आहेत. बाकी राहिलेल्या १५ ते २० गावांची सुध्दा नशीबवान होण्याची जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि शासन दरबारी नोंदही झालेली आहे, फक्त काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता झाली की ही १५ ते २० गावे सुध्दा पूर्णपणे नशीबवान होवून जातील.
वरील लिस्ट मधील गावे नशीबवान असण्याची कारणे !
- गावात सगळीकडे पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
- गावात पाईपलाईन मध्ये कुठेही पाण्याची गळती होत नाही.
- गावातील प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळते.
- गावातील १०० टक्के कुटुंबाला नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळते.
- सर्वांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
- पाण्याची क्वालिटी केंद्र शासनाच्या BIS 10500 मानकाप्रमाणे शुद्ध आहे.
- पाणी पुरवठ्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
- पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यावर खोदण्यात आलेले सर्व रस्ते दुरूस्त करण्यात आले आहेत.
- गावातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्र, आश्रमशाळा, ग्रामपंचायत इमारत, आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी नळ जोडणी देण्यात आली आहे.
- घरातील, गावातील शासकीय संस्थांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.
- पावसाचे पडणारे पाणी जमिनीत पुनर्भरण करण्यात येत आहे.
थांबा… थांबा… असे आम्ही म्हणत नाही !
होय, वरील बाबी आम्ही म्हणत नाही तर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने वरील सर्व गोष्टींवर शिक्कामोर्तब केले आहे. हे शुभकार्य पार पाडतांना वरील सर्व मुद्दे लेखी स्वरूपात पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता यांनी (जि.प.कार्यकारी अभियंता यांच्या आशिर्वादाने अथवा संमतीने) शासनाला सादर केले आहे. म्हणजेच पाणी पुरवठा विभागाने वरील गावांच्या नावे हर घर जल गांव प्रमाणपत्र जारी केले असून केंद्र आणि राज्य शासन दरबारी वरील गावातील १०० टक्के नागरिकांना पाणी मिळत असल्याचे घोषित केले आहे. आता आपले गांव नशीबवान होत आहे म्हटल्यावर वरील लिस्ट मधील ग्रामपंचायतने सुध्दा मागे न राहता या शुभकार्यात आपले योगदान दिले आहे. वरील गावच्या ग्रामपंचायतने सुध्दा इतर गावे नशीबवान होत आहे म्हटल्यावर कुठलाही उशीर न करता पाणी पुरवठा विभागाला हसत खेळत ठराव देवून टाकलेला आहे. म्हणजेच ग्रामपंचायतने सुध्दा गावातील १०० टक्के नागरिकांना नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा होत असल्याबाबत लेखी स्वरूपात देवून हे शुभ कार्य पार पाडले आहे. बऱ्याच जणांना माहित नसेल पण ही सर्व गावे २०२३ मध्येच नशीबवान झाली आहेत.
गावं नशीबवान करण्यासाठी सर्वात प्रथम जि.प. पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या आशिर्वादाने व संमतीने उपअभियंता यांनी “हर घर जल गांव प्रमाणपत्र” जारी केले. मग ग्रामपंचायतींनी सुध्दा ठराव देवून या शुभकार्याला हातभार लावला. हे सर्व झाल्यावर जिल्हा परिषद मधील कार्यकरी अभियंता यांचे वरिष्ठ अधिकारी म्हणजेच २०२३ मधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांनी सुध्दा ही सर्व गावे नशीबवान करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आणि सर्व गावे एवढ्या जलदगतीने नशीबवान केली म्हणून तत्कालीन CEO मॅडम यांना तर अधिकाऱ्यांचे कौतुक कसे करावे याबद्दल शब्दही सापडत नव्हते.
पुरस्कार द्यायचा कोणाला ?
अखेर सर्वांनी जिवाचे रान करून वरील सर्व गावांना आणि गावातील प्रत्येक नागरिकाला नळ कनेक्शन द्वारे शुद्ध पाणी पुरवठा करून नाव लौकीक केले. सर्वांनी जीवाचे रान करून एवढे मोठे शुभकार्य केले म्हटल्यावर पुरस्कार द्यायचा कोणाला हा प्रश्न शासनाला पडला आहे.
ज्या उपअभियंत्याने एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या गावांना घराघरापर्यंत पाणी पोहोचवून “हर घर जल” गांव घोषित केले त्यांना पुरस्कार द्यावा. किंवा जे या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख आहेत व ज्यांच्या आशिर्वादानेच किंवा अमुल्य योगदानामुळे हे झाले त्या कार्यकारी अभियंता यांना पुरस्कार द्यावा. किंवा त्यांचे वरिष्ठ (त्यावेळेसचे) ज्यांच्या देखरेखीत हे शुभकार्य पार पडले ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांना द्यावा. किंवा ज्या ग्रामपंचायतींनी गावातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळावे म्हणून दिवसरात्र एक केली त्यांना द्यावा. किंवा तालुका पातळीवर ज्यांच्या अख्त्यारीत सर्व ग्रामपंचायती येतात त्या पंचायत समितीला द्यावा. किंवा या सर्वांचे बॉस संपूर्ण जिल्हा परिषदेच्या प्रमुख (तत्कालीन) मुख्य कार्यकारी अधिकारी यांना द्यावा. किंवा संपूर्ण जिल्ह्याचे प्रमुख असलेले सन्माननीय जिल्हाधिकारी यांना द्यावा किंवा अजून कोणी छूपा रूस्तुम असेल त्याला द्यावा असा प्रश्न सध्या शासनाला पडला आहे.
वाचा आणि थंड बसा…!
वरील लिस्ट मध्ये जर तुमच्या गावाचे नाव असेल आणि वर पाणी पुरवठ्या बद्दल सांगितलेल्या गोष्टी किंवा गावातील १०० टक्के नागरिकांना नळ कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा होत असल्या बद्दल सांगितलेल्या गोष्टी चुकीच्या असतील तर वाचा आणि थंड बसा. कारण आपल्याला निमुटपणे अन्याय सहन करण्याची सवय झाली आहे, आपली मानसिकता मुर्दाड झाली आहे. गावांच्या उरावर बसून पाणी पुरवठा विभागाने अख्खी गावे कागदोपत्री हर घर जल घोषित करून टाकली आहेत आणि शासन दरबारी तशी नोंद सुध्दा झाली आहे, तरीही आपल्याला काहीही फरक पडत नाही. अर्थातच आपल्या तोंडाला कुलुप लागलं असेल, त्यामुळे बोंबलू नका, वाचा आणि थंड बसा..!
एल्गार न्यूज मागील महिनाभरापासून दबाव झुगारून लढा देत आहे, सडेतोड शब्दात आवाज उठवत आहे. तरीही आपल्या लक्षात येत नाही. एल्गार न्यूजने फक्त घनसावंगी तालुकाच नव्हे तर जालना जिल्ह्यातील हा महाघोटाळा सर्वप्रथम उघड करून आतापर्यंत ७ बातम्या तिखट शब्दात बातम्या प्रकाशित केल्या आहेत. परंतू बातम्या वाचून तुम्हाला वाटले दुसऱ्याचे घर जळाले असेल आपले नाही, आता वरील लिस्ट मध्ये तुमच्या गावाचे नाव असेल आणि परिस्थिती उलट असेल तर काय झाले. अर्थातच आपल्या तोंडाला कुलुप लागलं असेल, त्यामुळे बोंबलू नका, वाचा आणि थंड बसा…
जिल्ह्यातील इतर तालुक्यांनी आनंदी व्हायचं कारण नाही, कारण जिल्ह्यातील इतर तालुक्यात सुध्दा हीच परिस्थिती आहे. यामध्ये जालना तालुका, बदनापूर तालुका, भोकरदन तालुका, जाफ्राबाद तालुका, अंबड तालुका, परतूर व मंठा तालुक्याचा सुध्दा समावेश आहे.
शासन दरबारी वरील सर्व गावांना आणि गावातील प्रत्येक कुटुंबाला (१०० टक्के नागरिकांना) शुद्ध पाणी मिळत आहे म्हटल्यावर शासनापुढे आमच्या गावात पाणी टंचाई आहे असे बोंबलून सांगायला अधिकाऱ्यांनी चान्सच ठेवला नाही. आपण काहीच बोलत नाही आणि अधिकाऱ्यांनी आधीच संपूर्ण गावाला पाणी पाजलंय म्हटल्यावर शासन गावाकडे लक्ष देईल तरी कशाला. अर्थातच आपल्या तोंडाला कुलुप लागलं असेल, त्यामुळे बोंबलू नका, वाचा आणि थंड बसा…
ज्या अधिकाऱ्यांनी सर्व गावांवर अन्याय केला आहे त्यांनी तर लाज सोडूनच हे सर्व केलंय यात शंका नाही. मात्र गावालाच काय तुमच्या घराला सुध्दा नळ कनेक्शन द्वारे पाणी मिळत नसतांना जर तसे घोषित करण्यात आले असेल आणि तुम्ही शांत असाल तर हे थोडे जास्तच होत आहे असंच म्हणता येईल. गावाविषयी थोडीशी आपुलकी शिल्लक असेल, अन्याया विरूध्द लढण्याची थोडी सुध्दा हिम्मत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारा, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शासनाला गावातील / तालुक्यातील / जिल्ह्यातील या महाघोटाळ्याबद्दल किंवा फसवणूकी बद्दल आवश्यक तक्रार करा. तसेच जिल्ह्यातील या घोटाळ्याची चौकशी होवून कारवाई व्हावी म्हणून सामाजिक बांधिलकी असणाऱ्या निर्भीड व्यक्तींनी जर मा.उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली तर मग किती जण सस्पेंड होतील याचा अंदाजही बांधता येणार नाही.
बनवाबनवी सुरू !
एल्गार न्यूजने सलग ७ भाग (बातम्या) प्रकाशित करून या घोटाळ्याचा पंचनामा केल्यानंतर व शासनापर्यंत हा विषय गेल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमली आहे. परंतू जि.प.च्या माध्यमातून सर्व घोटाळेबाजांना वाचवण्याचे पूर्ण नियोजन करण्यात आले असून अपवाद वगळता ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांचीच भरती या चौकशी समितीत करण्यात आली आहे. आरोपीच स्वत:ची चौकशी कशी करतील ? याचे भान सुध्दा समिती स्थापन करणाऱ्यांना राहिलेलं दिसत नाही. हे सर्व घडतंय कारण, अर्थातच आपल्या तोंडाला कुलुप लागलं असेल, त्यामुळे बोंबलू नका, वाचा आणि थंड बसा…!
फक्त विभागीय किंवा राज्यस्तरीय समितीच !
घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील शेकडो गावात झालेला हा महाघोटाळा व शासनाची फसवणूक पाहता तसेच संबंधित अधिकाऱ्यांचा आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पाहता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. सदरील चौकशी विभागीय स्तरावर किंवा राज्य स्तरावर झाली तरच काही उपयोग होईल नसता अनेक दिवस टाईमपास करून सध्याच्या जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून प्रकरण पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न होईल यात शंका नाही. राज्यस्तरावरून किंवा विभागीय स्तरावरून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची चौकशी समिती किंवा पथक आल्यास पुरावे व माहिती द्यायला एल्गार न्यूज तयार आहे. असो… अजूनही काही लक्षात आले नसेल तर अर्थातच आपल्या तोंडाला कुलुप लागलंय असं समजून बोंबलू नका, वाचा आणि थंड बसा…!
म्हातारी मेल्याचंही दु:ख आहे
आणि काळ पण सोकावतो आहे
———————————-