एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी च्या खातेदारांनी काळजी करू नये, शांतता राखावी सर्वांना पैसे मिळतील अशी प्रतिक्रिया कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) शाखेचे व्यवस्थापक आकाश काशिद यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सर्वसामान्य नागरिकांनी मागील काळात ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा ठेवले होते, मात्र काही कारणास्तव ज्ञानराधा शाखा बंद ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या कष्टाचा जमा केलेला पैसा परत मिळणार की नाही अशी त्यांना भिती वाटत होती.
ज्ञानराधा मल्टिस्टेट मध्ये कोणी लग्नासाठी पैसे ठेवले होते, कोणी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी कोणी बचत म्हणून तर कोणी इतर कारणांसाठी पैसे ठेवले होते, परंतू मागील काळात ज्ञानराधाच्या शाखा अचानक बंद ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठा धक्का बसला होता आणि सर्वांना आपले पैसे मिळतील की नाही याबाबत चिंता वाटत होती, मात्र आता ज्ञानराधाच्या वतीने RTGS च्या माध्यमातून पैसे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पैसे कसे भेटणार !
शाखा व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि.05 रोजी खातेदारांना टोकन वाटप करण्यात येणार आहे, एकाच दिवसात सर्वांना टोकन वाटप करणे शक्य नाही, त्यामुळे योग्य ते कागदपत्र घेवून टोकन देण्यात येणार आहेत, त्यानंतर RTGS च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. साधारण 2 लाखाच्या आत रक्कम असणाऱ्या खातेदारांना एका टप्प्यात तर जास्त रक्कम असणाऱ्यांना 2 किंवा 2 पेक्षा जास्त टप्प्यात पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत, खातेदारांनी काळजी करू नये, सर्वांना पैसे मिळतील असे शाखा व्यवस्थापक आकाश काशिद यांनी सांगितले.
व्हाईस चेअरमनचे पत्र !
ज्ञानराधाचे व्हाईस चेअरमन वाय.व्ही.कुलकर्णी यांनी दि.4 व 5 रोजी सर्व शाखा व्यवस्थापकांना उद्देशून पत्र पाठवले असून त्यानुसार सर्व ठेवीदारांच्या ठेवी RTGS द्वारे देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. प्रत्येक दिवशी ठराविक टोकन देण्यात येणार असून दिलेल्या दिनांकानुसार त्या त्या दिवशी योग्य ते कागदपत्र घेवून संबंधितांचे पैसे RTGS करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.