Your Alt Text

जांबसमर्थ येथे अंगणवाडीतून एवढा निकृष्‍ट दर्जाचा पोषण आहार वाटप झालाय की वास घेतला तर होत आहे मळमळ ! जनावरे सुध्‍दा खाऊ शकणार नाहीत ! लहान मुलांसह महिलांचे जीव धोक्‍यात !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
श्रीक्षेत्र जांबसमर्थ (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे अंगणवाडीच्‍या माध्‍यमातून गरोदर महिला व लहान बालकांना जो पोषण आहार वाटप करण्‍यात आला आहे तो एवढा निकृष्‍ट दर्जाचा आहे की त्‍याचा वास घेतला तर मळमळ होवू लागली आहे. अर्थातच हा पोषण आहार महिला किंवा बालकांनी खालल्‍यास त्‍यांच्‍या जीवाला धोका निर्माण होवू शकतो, त्‍यामुळे संबंधित विभागाला या महिला व लहान बालकांचे नाहक बळी घ्‍यायचे आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील जांबसमर्थ येथे महिला व बालकल्‍याण विभागाच्‍या अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीच्‍या माध्‍यमातून गरोदर महिला, स्‍तनदा माता व लहान बालकांना पोषण आहार वाटप केला जातो, ज्‍यामध्‍ये मूग डाळ, मसूर डाळ, गहू यासह इतर अनेक प्रकारच्‍या साहित्‍य वाटप केले जाते मात्र सदरील पुरवठादाराने एवढा निकृष्‍ट दर्जाचा माल पुरवठा केला आहे की, गरोदर महिला, स्‍तनदा माता व लहान बालकांचे आरोग्‍य धोक्‍यात येवू शकते अथवा जीव सुध्‍दा धोक्‍यात येवू शकतो.

सॅम्‍पल उपलब्‍ध !

पुरवठादाराने जांबसमर्थ येथे दिलेल्‍या पोषण आहाराच्‍या मालापैकी मसूर डाळ, मूग डाळ आणि गहू या 3 डाळ अथवा धान्‍याचे सॅम्‍पल एका नागरिकाने एल्‍गार न्‍यूज ला दाखवल्‍यानंतर त्‍याचा वास घेतला असता अक्षरश खरचं मळमळ होवू लागली आहे, शिवाय हळदीचे पाकीट सुध्‍दा खूप जुने दिसत आहे. सदरील डाळी व गहू एवढे निकृष्‍ट दर्जाचे आहे की, त्‍यास जनावरे सुध्‍दा खाणार नाही. अर्थातच अत्‍यंत निकृष्‍ट दर्जाचा पुरवठा करण्‍यात आल्‍याचे स्‍पष्‍ट दिसत आहे.

जीव घ्‍यायचे आहेत का ?

जांबसमर्थ येथे वाटप करण्‍यात आलेले पोषण आहार एवढे निकृष्‍ट दर्जाचे आहे की, अनेक नागरिकांनी ते फेकून दिले आहे. गरोदर माता, स्‍तनदा माता किंवा लहान बालकांनी हे पोषण (?) आहार घेतल्‍यास नक्‍कीच ते आजारी पडतील, त्‍यांना उलट्या होतील किंवा त्‍यांचा जीव धोक्‍यात येईल अशा प्रकारचे हे साहित्‍य किंवा माल वाटप करण्‍यात आले आहे. सदरील निकृष्‍ट दर्जाचा पोषण आहार पाहता संबंधित विभाग आणि पुरवठादाराला महिला व लहान बालकांचे जीव घ्‍यायचे आहेत का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

पुरवठा अजून कोठे ?

ज्‍या अर्थी पुरवठादाराने जांबसमर्थ (ता.घनसावंगी) येथील अंगणवाडी मध्‍ये पोषण आहाराचा पुरवठा केला आहे त्‍या अर्थी जांबसमर्थ मधील सर्व अंगणवाड्या मध्‍ये हाच पुरवठा झाला आहे असं म्‍हणता येईल. एवढंच नव्‍हे तर या पुरवठादाराने फक्‍त जांबसमर्थच नव्‍हे तर घनसावंगी तालुक्‍यात कोणकोणत्‍या गावात हा अत्‍यंत निकृष्‍ट दर्जाचा पुरवठा केला आहे याचा सखोल तपास तात्‍काळ होणे अत्‍यंत गरजेचे आहे, नसता या पोषण आहारामुळे अनेक महिला व मालकांचे आरोग्‍य आणि जीव सुध्‍दा धोक्‍यात आल्‍याशिवाय राहणार नाही अशी गंभीर परिस्थिती आहे.

याबाबत घनसावंगीचे बालविकास प्रकल्‍प अधिकारी विनोद दाबेराव यांच्‍याशी संपर्क साधला असता संबंधित गावात पोषण आहाराचा माल उतरवून घेतांना तपासूनच घ्‍यावा असे सांगितलेले आहे, तरीही जर माल निकृष्‍ट दर्जाचा आला असेल तर त्‍याची चौकशी केली जाईल असे त्‍यांनी सांगितले.

यंत्रणा कुठे आहे ?

अशा प्रकारे महिला व लहान बालकांचे आरोग्‍य आणि जीव धोक्‍यात येईल असा माल गावापर्यंत येतोच कसा ? जेव्‍हा संबंधित पुरवठादार पोषण आहाराचा माल गोडावून मधून उचलतो त्‍यावेळी त्‍या पोषण आहाराच्‍या मालाची तपासणी केली जात नाही का ? संबंधित विभागाने सदरील पुरवठादाराला कोणत्‍याही प्रकारचा निकृष्‍ट दर्जाचा माल मनमर्जी प्रमाणे पुरवठा करण्‍याची परवानगी दिली आहे का ? जर या पोषण आहारामुळे एखाद्या महिलेचा किंवा लहान बालकांचा जीव गेला तर याची जबाबदारी कोणाची ? असे अनेक प्रश्‍न यानिमित्‍ताने उपस्थित होत आहे.

अशा प्रकारे निकृष्‍ट दर्जाचा पोषण आहार वितरीत करण्‍यात आला असेल तर ही गंभीर बाब असून याची तात्‍काळ चौकशी केली जाईल व कोणी दोषी आढळून आल्‍यास कारवाई केली जाईल.

  • कोमल कोरे (Dy. CEO)
    महिला व बाल कल्‍याण विभाग, जि.प.जालना


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!