एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेकडून (दि. 31) घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव, पिंपरखेड, अरगडे गव्हाण या ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या मुलांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. मागील सहा महिन्यापासून मराठावाडा ग्रामीण विकास संस्था ही आरोग्य, शिक्षण आणि पोषण या विषयावर ऊसतोड कामगारांनसोबत काम करत आहे.
जालना जिल्हातील परतूर आणि घनसावंगी तालुक्यातील 30 ते 35 गावांमध्ये ही संस्था काम करत आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या सुदृढ आरोग्यसाठी खेळाचे विनामूल्य साहित्य या संस्थेकडून वाटप करण्यात येत आहेत.
यापुढे देखील ऊसतोड कामगारांना संस्थेकडून उपजीविका मदतीसाठी शेळीपालन, कुक्कुटपालन, किराणा शॉपच्या व्यवसायासाठी देखील मदत करण्यात येणार असल्याचे संस्थेचे जिल्हा समन्वयक तुकाराम कुऱ्हाडे,संस्थेचे गाव समन्वयक अजय गाढे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
यावेळी अरगडे गव्हाण येथील शिवराम गुजर, समाधान तोडके तर शिवणगाव येथील सरपंच शकुंतला विजयकुमार तौर, कैलास तौर, उमेश तौर, पिंपरखेड येथील गणेश सिरसाठ, विलास देहाडे आदींच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले आहे.