Your Alt Text

तलाठ्याची शेतकऱ्याला उद्धट भाषा ! अनुदान KYC करीता असलेली यादी कोणालाही दाखवायला मी रिकामा नाही आणि बांधिलही नाही ! – तलाठी

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
एक तर अनंत अडचणींमुळे जगाचा पोशिंदा हैराण आहे, कधी आस्‍मानी तर कधी सुल्‍तानी संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असते, अशातच शासनाकडून येणारा थोडाफार अनुदान जख्‍मेवर काही अंशी फुंकर घालणारा ठरतो, मात्र त्‍या थोड्याफार अनुदानासाठीही शेतकऱ्यांना वंचित ठेवण्‍याची मानसिकता एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून ठेवण्‍यात येत असेल तर शेतकऱ्यांनी करावे तरी काय असा प्रश्‍न उपस्थित होवू लागला आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, जालना जिल्‍ह्यातील घनसावंगी तालुक्‍यात सध्‍या नैसर्गिक आपत्‍तीमुळे नुकसान झालेल्‍या काही गावातील शेतकऱ्यांना अनुदान मिळत आहे. सदरील अनुदान मिळण्‍यासाठी शेतकऱ्यांना e-kyc करणे बंधनकारक आहे. केवायसी केल्‍यानंतर अनुदान थेट शेतकऱ्यांच्‍या बँक खात्‍या जमा होत आहे अथवा होणार आहे.

शेतकऱ्यांना E-KYC करता यावी यासाठी प्रशासनाने PDF स्‍वरूपात याद्या संबंधित तलाठी यांच्‍याकडे दिल्‍या आहेत, सदरील याद्यांमध्‍ये प्रत्‍येक शेतकऱ्याच्‍या नावापुढे VK नंबर आहे या नंबरच्‍या आधारेच E-kyc करता येते. VK नंबर असलेली शेतकऱ्यांची यादी नसेल तर E-kyc करता येत नाही.

सदरील PDF यादी मोबाईलवर मिळावी म्‍हणून जांबसमर्थ येथील एका शेतकऱ्याने कुंभार पिंपळगांव येथे तलाठी विजय बोचुडे भेटले असतांना त्‍यांना केवायसी करण्‍यासाठी VK नंबरची यादी मागितली. (सदरील प्रकार एल्‍गार न्‍यूजच्‍या कार्यालया समोर घडला) परंतू तलाठी बोचुडे यांनी सदरील शेतकऱ्याला अचानक असभ्‍य भाषा बोलण्‍यास सुरूवात केली. यादी जांबसमर्थ येथील ग्रामपंचायतला लावलेली आहे तेथे पहा, मी कोणालाही यादी द्यायला रिकामा नाही आणि कोणाला यादी द्यायला मी बांधिलही नाही असे सांगितले.

जेव्‍हा शेतकऱ्याने मोबाईलवर यादी देण्‍यास एक मिनिटही लागणार नाही असे सांगितले, तेव्‍हा तलाठी म्‍हणाले की, यादीची पाने ही वेगवेगळी आहेत त्‍यांना एकत्र करून PDF बनवून तुम्‍हाला द्यायची आणि खिशातून पैसे खर्च करायचे हे कोणी शिकवले. त्‍यानंतर शेतकऱ्याने त्‍यांना सांगितले की, साहेब यादी तर पीडीएफ स्‍वरूपात आहे पाने वेगवेगळी नाहीत, फक्‍त मोबाईलवर पाठवा, तेव्‍हा तलाठी म्‍हणाले मला यादी ईमेलवर आलेली आहे, मला ईमलवर पाठवता येत नाही किंवा डाउनलोड करता येत नाही. तेव्‍हा सदरील तलाठी यांना एल्‍गार न्‍यूजचे संपादक परवेज पठाण यांनी बोलावून सांगितले की, मोबाईल इकडे दाखवा आणि तलाठी यांच्‍या समोरच इमेलवरून ekyc करण्‍यासाठी असलेली pdf अवघ्‍या एक मिनिटात स्‍वत:च्‍या मोबाईलवर घेतली.

विशेष म्‍हणजे सुरूवातीला तलाठी सांगत होते की, माझ्याकडे यादीचे स्‍वतंत्र पाने असून पीडीएफ नाही, परंतू जेव्‍हा एल्‍गार न्‍यूजचे संपादक परवेज पठाण यांनी सर्व पाने एकत्र असलेली पीडीएफ स्‍वत:च्‍या मोबाईलवर घेवून त्‍यांना दाखविली तेव्‍हा तलाठी यांच्‍याकडे उत्‍तर नव्‍हते. शेतकऱ्याला अशा प्रकारची उद्धट आणि असभ्‍य भाषा वापरल्‍यामुळे एल्‍गार न्‍यूजच्‍या वतीने तलाठी यांना जाब विचारण्‍यात आला परंतू उडवाउडवीची उत्‍तरे देण्‍यापलीकडे त्‍यांना काहीही बोलता आले नाही, शेवटी सदरील तलाठ्याने तेथुन काढता पाय घेतला.

अरेरावी कशासाठी ?

सदरील तलाठी हे शेतकरी आणि नागरिकांचे सेवक आहेत हेच विसरून गेल्‍याचे दिसून आले. अवघ्‍या एक मिनिटात शेतकऱ्याला यादी देणे शक्‍य असतांनाही तलाठ्याने टाळाटाळ करण्‍यामागे कारण काय ? सदरील तलाठ्याला शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवायचे होते का ? सदरील तलाठी यांना शेतकऱ्याकडून काही अपेक्षित होते का ? गोरगरीब व सर्वसामान्‍य शेतकरी बांधवाला तलाठ्याची ही असभ्‍य आणि अहंकारी भाषा कशामुळे ? असा प्रश्‍न यानिमित्‍ताने उपस्थित होत आहे.

तलाठ्यांची गैरहजेरी !

सदरील तलाठी यांची माहिती घेतली असता, त्‍यांच्‍याकडे जांबसमर्थ, लिंबी, श्रीपत धामनगांव या कमी लोकसंख्‍या असलेल्‍या गावांचा पदभार आहे. तिन्‍ही गावातील नागरिकांना विचारले असता तलाठी महाशय महिना महिना गावात दिसत नाही किंवा येत नाही असे सांगितले. मग सदरील तलाठी उंटावर बसून शेळ्या हाकण्‍याचा पगार घेतात का ? किंवा घरी बसून कार्बन डाय ऑक्‍साईड सोडणे आणि ऑक्सिजन घेणे यासाठीच पगार घेतात का ? असा सवाल शेतकरी करत आहेत.

समज देणार !

शेतकऱ्याला अशा प्रकारची भाषा वापरणे मुळीच योग्‍य नाही, शेतकऱ्यांपर्यंत यादी पोहोचवणे, त्‍यांची केवायसी व्‍हावी यासाठी प्रयत्‍न करणे आणि शेतकऱ्यांना सहकार्य करणे हे तलाठी यांचे काम आहे. झालेला प्रकार योग्‍य नाही, याबाबत तहसीलदार यांना कळवून संबंधित तलाठ्याला योग्‍य ती समज दिली जाईल आणि भविष्‍यात असा प्रकार होवू नये याची काळजी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया अंबडचे उपविभागीय अधिकारी दिपक पाटील यांनी दिली.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी वर दिसत असलेल्‍या “जॉईन करा” या चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या व्‍हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!