Your Alt Text

कुंभार पिंपळगांव येथे पोलीस ठाणे मंजूर करण्‍याची गृहराज्‍यमंत्री यांच्‍याकडे मागणी !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव सह परिसरातील गावांमध्‍ये कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राखण्‍याच्‍या दृ्ष्‍टीने कुंभार पिंपळगांव येथे पोलीस ठाणे मंजूर करण्‍यात यावे अशी मागणी गृहराज्‍यमंत्री योगेश कदम यांच्‍याकडे निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

सदरील निवेदनानुसार घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव हे १५ ते २० हजार लोकसंख्‍येचे शहर आहे. या शहरात जवळपास १००० पेक्षा जास्‍त व्‍यापारी दुकाने आहेत. शिवाय राष्‍ट्रीयकृत बॅंका, अनेक मल्टिस्‍टेट पतसंस्‍था, अनेक मराठी – इंग्रजी शाळा, कन्‍या शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्‍लासेस, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती बाजारपेठ आहे. कुंभार पिंपळगांव हे २५ ते ३० गावांचे केंद्रबिंदू असून सर्व गावांना बाजारपेठ तसेच जाण्‍यायेण्‍यासाठी कुंभार पिंपळगांव हेच मुख्‍य मार्ग आहे.

कुंभार पिंपळगांव येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो, यामध्‍ये ५० हजार पेक्षा जास्‍त नागरिक बाजारात येत असतात. मागील अनेक वर्षांपासून कुंभार पिंपळगांवला पोलीस चौकी असून ३ ते ४ कर्मचाऱ्यांवर कुंभार पिंपळगांवसह १५ ते २० गावांचा भार आहे. मात्र सर्वांवर असलेल्‍या जबाबदाऱ्या पाहता कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राखणे शक्‍य नाही. अनेकदा कुंभार पिंपळगांव व परिसरात कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण झाल्‍यास त्‍यावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते.

कुंभार पिंपळगांव सह परिसरातील काही गावे संवेदनशील आहेत. कुंभार पिंपळगांवला पोलीस ठाणे व्‍हावे यासाठी यापूर्वीच्‍या पोलीस अधिक्षकांनी शासनाला अनेक वर्षांपूर्वी प्रस्‍ताव पाठवलेला आहे, परंतू अद्याप निर्णय झालेला नाही. त्‍यामुळे कुंभार पिंपळगांवला तातडीने पोलीस ठाणे मंजूर करून कुंभार पिंपळगांवसह परिसरातील २५ ते ३० गावातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी गृहराज्‍यमंत्री योगेश कदम यांच्‍याकडे सर्वांच्‍या वतीने करण्‍यात आली आहे.

गृहराज्‍यमंत्री यांना आमदार हिकमत उढाण यांच्‍यावतीने एक पत्र, व्‍यापारी महासंघाच्‍या वतीने एक पत्र आणि कुंभार पिंपळगांवसह परिसरातील नागरिकांच्‍या वतीने एक पत्र असे ३ पत्र अथवा निवेदने एकत्रितपणे देवून पोलीस ठाणे मंजूर करण्‍याची एकमुखी मागणी करण्‍यात आली आहे. गृहराज्‍यमंत्री योगेश कदम यांनी सदरील मागणीचा योग्‍य तो विचार केला जाईल असे सांगितले. यावेळी आमदार डॉ.हिकमत उढाण, कुं.पिंपळगांव व्‍यापारी महासंघाचे अध्‍यक्ष प्रकाश कंटुले, मतीन शेख यांच्‍यासह अनेक मान्‍यवर, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!