एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
राज्यातील कुरेशी (खाटीक) समाजाने जनावरांची खरेदी विक्री बंद केली असून जो पर्यंत शासन कुरेशी समाजावरील अन्याय अत्याचार दूर करून त्यांना न्याय देत नाही तो पर्यंत राज्यात जनावरांची खरेदी विक्री कुरेशी समाज करणार नाही अशी भूमिका कुरेशी समाजाने घेतली आहे.
याबाबत प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की, कुरेशी समाज हा महाराष्ट्र राज्यात पारंपारिक व कायदेशीर मार्गाने म्हैस, गाय, बैल, शेळ्या इत्यादी पशूंची खरेदी विक्री व शेती व्यवसायासाठी लागणारे बैल नेहमी वाहतूक करीत असतो. कुरेशी समाज नेहमी नियम कायद्याचे पालन करत असतो. भारत देशात १९७६ मध्ये गोहत्या कायदा अस्तित्वात आल्यानंतर गो मांसाचा व्यापार बंद करण्यात आला.
जेव्हा पासून गोहत्या किंवा कत्तल करण्यास मनाई आहे तेव्हापासून कुरेशी समाज सदरील कायद्याचा काटेकोरपणे पालन करीत आहे. परंतू २०१५ मध्ये गोवंश हत्या बंदी कायदा महाराष्ट्र शासनाने आणल्यामुळे भाकड बैलांची मांस विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुरेशी समाजाचा उपजिवीकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे २०१५ मधील करण्यात आलेला कायदा रद्द करण्यात यावा.
कुरेशी समाज पशु खरेदी विक्रीचा सुध्दा व्यवसाय करतो, मागील काही वर्षात जनावरांची वाहतूक करतांना सदरील जनावराच्या वाहनाला काही समाजकंटक अडवून कोणतीही शहानिशा न करता कुरेशी व शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या लोकांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करीत आहेत. पोलीस प्रशासन सुध्दा कोणतीही शहानिशा न करता गुन्हे दाखल करीत आहे.
कुरेशी समाज दुधाळ जनावरे तसेच शेळी, शेतीमध्ये कामे करणारे बैल जोड्या यांची शेतकऱ्यांकडून खरेदी करून बाजारात शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी वाहनाने घेवून जात असतांना स्वयंघोषित गोरक्षक यांच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन विनाकारण गुन्हे दाखल करीत आहे. पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे की कोणत्याही नागरिकावर अन्याय होता कामा नये, परंतू पोलीस प्रशासन सुध्दा सर्वच जनावरे ही कापण्यासाठी घेवून जात असल्याचे गृहीत धरून कोणतीही शहानिशा न करता किंवा सखोल चौकशी न करता खरेदी विक्री करणाऱ्या व्यापारी व कुरेशी समाजावर कारवाई करत आहे. त्यामुळे कुरेशी समाजावर अन्याय होत आहे.
महाराष्ट्र राज्यात राज्यात म्हशीचे मांस विक्री करण्यास बंदी नाही, परंतू म्हशीचे मांस हे गोमांस असल्याचे पोलीसांना सांगून काही स्वयंघोषित गोरक्षक हे कुरेशी समाजावर खोटे गुन्हे दाखल करीत आहे. पोलीस प्रशासन सुध्दा मांसाचे नमुने न तपासता खोटे गुन्हे दाखल करीत आहे. त्यामुळे कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्याया विरूध्द राज्यव्यापी जनावरांची खरेदी विक्री कुरेशी समाजातर्फे बंद करण्यात आली आहे.
जो पर्यंत महाराष्ट्र शासन २०१५ मधील गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करीत नाही व योग्य चौकशी केल्याशिवाय कुरेशी समाजावर गुन्हे दाखल न करण्याचे जीआर काढत नाही. तसेच वाहतूक करणाऱ्या कुरेशी व्यापाऱ्यांवर हल्ले होत आहेत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत नाही तो पर्यंत महाराष्ट्रात जनावरांची खरेदी विक्री कुरेशी समाज करणार नाही. त्यामुळे शासनाने कुरेशी समाजावरील अन्याय अत्याचार दूर करावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
राज्यभरात कुरेशी समाजाच्या वतीने प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात येत असून घनसावंगी तालुक्यातूनही ऑल इंडिया जमैतुल कुरेश या संघटनेच्या माध्यमातून शासनाला निवेदन सादर केले आहे. निवदेनावर माजी जि.प. सदस्य, खालेद कुरेशी, ग्रा.पं.सदस्य रफीक कुरेशी, अकबर कुरेशी, नूरमियां कुरेशी, इस्माईल कुरेशी, जावेद कुरेशी, अब्दुल रहीम कुरेशी, कासीम कुरेशी, फेरोज कुरेशी, गफ्फार कुरेशी, मुमताज कुरेशी, अशफाक कुरेशी, शकील कुरेशी, अल्ताफ कुरेशी, फकीर कुरेशी, हारूण कुरेशी, शफीक कुरेशी, मुक्तार कुरेशी, आरेफ कुरेशी यांच्यासह कुरेशी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.