Your Alt Text

घनसावंगी तहसील मध्‍ये काही दिले नाही तर 15 दिवसात आणि खिसा गरम केला की एका दिवसात प्रमाणपत्र ? लाडक्‍या बहिणी आणि लाडके भाऊजी चकरांमुळे हैराण !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तहसील कार्यालयाचा कारभार सुधरण्‍या ऐवजी दिवसेंदिवस बिघडत चाललाय की काय असा प्रश्‍न पडू लागला आहे. कारण लाडक्‍या बहीणच नव्‍हे तर लाडके भाऊजी सुध्‍दा तहसील कार्यालयाच्‍या ढिसाळ कारभारामुळे बेजार झाले आहेत. अर्थातच विविध प्रमाणपत्रासाठी 10 ते 15 दिवस वाट पहावी लागत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्‍या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे विविध प्रमाणपत्रासाठी नागरिकांना अनेक दिवस थांबावे लागत आहे. ग्रामीण भागात नागरिक आपापल्‍या गावातील महा-ई-सेवा केंद्र किंवा CSC केंद्राच्‍या माध्‍यमातून विविध प्रमाणपत्रासाठी अर्ज करत असतात. मात्र सदरील गावांमधून ऑनलाईन पध्‍दतीने केलेल्‍या अर्जावर 10 ते 15 दिवस दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्‍हणजे तहसील मध्‍ये थेट गेल्‍यावर दलालांच्‍या माध्‍यमातून चिरीमिरी दिल्‍यावर अवघ्‍या एका दिवसात प्रमाणपत्र मिळत असल्‍याचे नागरिक सांगत आहेत.

लाडक्‍या बहिणी आणि भाऊजी बेजार !

ज्‍यांच्‍याकडे मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र कमी आहेत अशा महिला डोमीसाईल किंवा उत्‍पन्‍न प्रमाणपत्र काढण्‍यासाठी गाव पातळीवर असलेल्‍या महा ई-सेवा केंद्र किंवा CSC केंद्रातून अर्ज करत आहेत, शिवाय ज्‍यांचे नजीकच्‍या काळात लग्‍न झालेले आहे अशा महिलांना सुध्‍दा नवऱ्याकडील नाव आधारवर दुरूस्‍ती करण्‍यासाठी आधारकेंद्रावर डोमीसाईल प्रमाणपत्र लागत आहे, त्‍यासाठी सुध्‍दा महा ई-सेवा केंद्र किंवा CSC केंद्रातून अर्ज केले जात आहेत, परंतू 10 ते 15 दिवस प्रमाणपत्रच मिळत नाही.

त्‍याउलट घनसावंगी तहसील मध्‍ये गेल्‍यावर दलालांच्‍या माध्‍यमातून चिरीमिरी देवून कागदपत्र दाखल केल्‍यास अवघ्‍या एका दिवसात सदरील प्रमाणपत्र मिळत असल्‍याचे अनेकांनी सांगितले आहे. जर तहसील प्रशासनाला चिरीमिरी घ्‍यायची एवढीच सवय पडली असेल तर त्‍यांनी संबंधित मह-ई सेवा केंद्र किंवा CSC केंद्र चालकांना आदेश देवून चिरीमिरी जमा करावी आणि नागरिकांना तात्‍काळ प्रमाणपत्र वाटप करावेत अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

नॉन क्रिमीलेअरसाठीही टाळाटाळ !

एका मराठा बांधवाने सांगितले की, गावातील CSC केंद्रातून नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळावे म्‍हणून अर्ज केलेला आहे, परंतू महिना उलटला तरी अद्याप प्रमाणपत्र मिळाले नाही, संबंधित CSC केंद्र चालकाने सांगितले की, तहसील मधून अजून प्रमाणपत्र आलेच नाही, म्‍हणजेच तहसील मधून या प्रमाणपत्रासाठी सुध्‍दा टाळाटाळ केली जात आहे.

तहसीलदारांचा आशिर्वाद !

डोमीसाईल (रहिवाशी) किंवा उत्‍पन्‍न प्रमाणपत्र काढण्‍यासाठी गावातील CSC केंद्रातून ऑनलाईन अर्ज केल्‍यावर हे अर्ज आधी तहसील मधील क्‍लर्क व अव्‍वल कारकूनकडे जाते त्‍यानंतर नायब तहसीलदार यांना अधिकार असल्‍यामुळे ते थंब (अंगठा) लावून प्रमाणपत्र जारी करतात आणि त्‍यानंतर गावातील CSC किंवा महा-ई सेवा केंद्र चालक नागरिकांना त्‍याची प्रिंट काढून देतात, अशी त्‍याची प्रोसेस आहे, परंतू सदरील 3 टेबलापैकी कोणीतरी प्रमाणपत्र अनेक दिवस अडवून ठेवत असल्‍याचे दिसून येत आहे. विशेष म्‍हणजे तिन्‍ही टेबलावरील अधिकारी कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

पूर्व कल्‍पना असूनही दुर्लक्ष !

घनसावंगीच्‍या तहसीलदार योगीता खटावकर यांना लाडकी बहीण योजना सुरू झाल्‍यानंतर म्‍हणजे दिड महिन्‍यापूर्वीच कागदपत्रांसाठी नागरिकांची अडचण होणार याची पूर्व कल्‍पना देण्‍यात आली होती, विशेष म्‍हणजे त्‍यांनी 2 टेबल अधिक वाढवून विविध प्रमाणपत्र तातडीने देण्‍यात येतील असे सांगितले होते, परंतू बोलाचा भात आणि बोलाचीच कढी असंच काही होतांना दिसत आहे. एकूण परिस्थिती पाहता तहसीलदारांचे त्‍यांच्‍या अधिकारी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्‍याचे दिसून येत आहे.

नेते आणि वरिष्‍ठ अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष !

घनसावंगी तालुक्‍यात तहसील प्रशासनाच्‍या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे आणि चिरीमिरी घेण्‍याच्‍या मानसिकतेमुळे माता भगीनींना विविध प्रमाणपत्रासाठी महा-ई-सेवा केंद्र किंवा CSC केंद्रावर विनाकारण 10 ते 15 दिवस चकरा माराव्‍या लागत आहेत. विशेष म्‍हणजे वरिष्‍ठ अधिकाऱ्यांचे सुध्‍दा याकडे दुर्लक्ष होत असल्‍याचे दिसत आहे, एवढंच नव्‍हे तर निवडणुकीचा काळ जवळ असतांना नेते सुध्‍दा या गंभीर प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत असल्‍याने माता भगीनींमध्‍ये आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!