एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
सोनार समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी, विविध संघटना व समाज बांधवांकडून करण्यात येत होती, या दृष्टीने शासनाने आता सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून तसा जीआर सुध्दा काढला आहे.
राज्यातील इतर मागासवर्गीयांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सध्या कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळा अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या सोनार समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सदरचे महामंडळ “संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ” (महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी) या नावाने संबोधले जाईल.
सदरील महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहील. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यालये कार्यरत राहणार आहेत. संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळास (उपकंपनी) अधिकृत भागभांडवल ५० कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहेत.
महामंडळाचे कार्य :-
राज्यातील सोनार समाजाच्या कल्याण व विकासाठी काम करणे, सोनार समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगारा करीता कर्ज उपलब्ध करून देणे. सोनार समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थपकीय साधने पुरविणे, राज्यातील सोनार समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरू करणे आणि त्यांना चालना देणे अशी अनेक कार्ये या महामंडळाच्या माध्यमातून केली जाणार आहेत.