Your Alt Text

1 कोटी 17 लाखांची राष्‍ट्रीय पेयजल योजना… 13 वर्षांपूर्वी कामाचा शुभारंभ झाला अन भ्रष्‍टाचाऱ्यानी अर्धवट अवस्‍थेत योजनेचा मुडदा पाडला !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
असं म्‍हटलं जातं की, तहानलेल्‍या व्‍यक्‍तीला पाणी पाजलं तर खूप पुण्‍य मिळतं, परंतू 13 वर्षांचा वनवास संपवूनही गांवकऱ्यांना थेंबभर पाणीही मिळालं नसेल उलट भ्रष्‍टाचाऱ्यांनी कोट्यावधी रूपयांची योजनाच गिळून टाकली असेल तर याला कोणता महापाप म्‍हणावं असा प्रश्‍न गांवकऱ्यांना पडला आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, त्‍यादृष्‍टीने संपूर्ण गावाला नळ कनेक्‍शन द्वारे पाणी मिळावे यासाठी सन 2011 साली 1 कोटी 17 लाखांची राष्‍ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्‍यात आली होती व त्‍याचे कामही सुरू झाले होते. मात्र संबंधित गुत्‍तेदार हे दुसऱ्या जिल्‍ह्यात राहायला होते व महिना 2 महिन्‍यात एखाद्यावेळी चक्‍कर मारून थोडंफार काम करून परत जात होते.

बराच कालावधी उलटल्‍यानंतरही कामात प्रगती होत नसल्‍यामुळे पत्रकार बांधवांनी बातम्‍यांच्‍या माध्‍यमातून हा प्रश्‍न उचलला, त्‍यामुळे थोडंफार का असेना कामाला सुरूवात झाली मात्र भ्रष्‍टाचाराची किड लागलेल्‍या या कामाची काही काळानंतर पुन्‍हा जैसेथेच परिस्थिती झाली, त्‍या काळात संबंधित गुत्‍तेदाराला जि.प.कडून दंडही आकारण्‍यात आला. वारंवार पाठपुरावा करूनही गुत्‍तेदाराने कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. .अनेक वर्ष हे काम कासव गतीपेक्षाही कमी गतीने सुरू राहीले व शेवटी या योजनेची अंधारत बिले उचलून योजनेचा बळी देण्‍यात आला.

थेंबभरही पाणी नाही !

2011 साली सुरू झालेल्‍या 1 कोटी 17 लाखाच्‍या या योजनेचे थेंबभरही पाणी गांवकऱ्यांना मिळाले नाही. अर्धवट अवस्‍थेत काम करून गुत्‍तेदाराने पळ काढला आणि त्‍यावेळेसच्‍या अनेक अधिकारी व गावातील काही लोकांच्‍या संगणमताने बिले उचलून योजनेचा मुडदा पाडला. अक्षरश: 13 वर्षे उलटूनही थेंबभर पाणी मिळाले नाही. एवढंच काय वरिष्‍ठ पातळीवरून या योजनेची चौकशी होणे अपेक्षित असतांना कोणीही याकडे लक्ष दिले नाही.

गुत्‍तेदाराला नेत्‍याचा आशिर्वाद !

कुंभार पिंपळगाव येथील राष्‍ट्रीय पेयजल योजनेचे काम ज्‍या गुत्‍तेदाराने घेतले होते, त्‍या गुत्‍तेदाराला जालना जिल्‍ह्यातील अथवा घनसावंगी तालुक्‍यातील कोणत्‍या तरी नेत्‍याचा आशिर्वाद होता असे सांगितले जाते. त्‍या नेत्‍याच्‍या भरवशावरच संबंधित गुत्‍तेदाराने अधर्वट काम करून बिले उचलून पळ काढल्‍याचे सांगितले जात आहे.

गावात कोणाचा आशिर्वाद !

राष्‍ट्रीय पेयजल योजनेचे काम जेवढे वर्ष सुरू होते तेवढ्या काळात गावातील काही व्‍यक्‍तींनी गुत्‍तेदाराकडून आपले खिसे गरम करून घेतल्‍याचेही ऐकायला मिळत आहे. अर्थातच गावातील काही व्‍यक्‍ती, अधिकारी आणि संबंधित नेत्‍याला खुश करून गुत्‍तेदाराने सदरील काम अर्धवट सोडून व बिले उचलून पळ काढल्‍याचे सांगितले जात आहे.

अपूर्ण कामाची बिले कशी ?

जर 2011 सालच्‍या राष्‍ट्रीय पेयजल योजनेचे काम आजही अर्धवटच आहे तर मग त्‍या गुत्‍तेदाराला ग्रामपंचायतने टप्‍प्‍या टप्‍प्‍याने बिले मिळण्‍यासाठी सहकार्य का केले ? काम अर्धवटच असतांना गुत्‍तेदाराला कामाची बिले कशी मिळत गेली ? गुत्‍तेदाराने कोणाकोणाला मॅनेज केले ? कोणाकोणाचे खिसे गरम केले ? याचा तपास होणे आवश्‍यक आहे.

जि.प. सुध्‍दा जबाबदार !

जिल्‍हा परिषद व पाणी पुरवठा विभागाच्‍या माध्‍यमातून या योजनेवर लक्ष ठेवण्‍यात आले होते, काम नियमान्‍वये व इस्‍टीमेट प्रमाणे करून घेण्‍याची जबाबदारी जिल्‍हा परिषदेची होती मग जिल्‍हा परिषदेने किंवा पाणी पुरवठा विभागाने पाठीशी का घातले ? जिल्‍हा परिषदेने गुत्‍तेदारावर काय कारवाई केली ? 13 वर्षे उलटूनही योजना अर्धवटच राहीली मग त्‍या गुत्‍तेदारावर एखादा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला का ? वसुली करण्‍यात आली का ? गुत्‍तेदाराला पाठीशी घालण्‍यात जिल्‍हा परिषद व पाणी पुरवठा विभागाचे कोणते अधिकारी जबाबदार आहेत ? याचाही तपास होणे क्रमप्राप्‍त आहे.

वरिष्‍ठ अधिकारी चौकशी करणार का ?

जिल्‍हाधिकाऱ्यांसह जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (पंचायत) व इतर अधिकारी या सर्व प्रकारणाची चौकशी करणार का ? राष्‍ट्रीय पेयजल योजनेचा मुडदा पाडणाऱ्या सर्व जबाबदार व्‍यक्‍तींवर अथवा दोषींवर कारवाई करणार का ? नसता हे प्रकरण थंड बस्‍त्‍यात असेच पडून राहणार का ? असा सवाल गावातील नागरिक करत आहेत.

जलजीवनला गती मिळणार का ?

राष्‍ट्रीय पेयजल योजनेचा मुडदा पाडल्‍यानंतर आता गावाला जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रूपयांची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. मात्र या योजनेचे कामही कासवगतीनेच सुरू आहे. घराघरात नळ कनेक्‍शन द्वारे पाणी मिळण्‍यासाठी अजून किती वर्ष वाट पहावी लागते हे सांगणे अवघड आहे. कदाचित राष्‍ट्रीय पेयजल योजने सारखीच परिस्थिती राहील्‍यास स्‍वत:च्‍या आणि मुलाबाळांच्‍या काळात तर सोडाच नातवांच्‍या काळात तरी नळ कनेक्‍शन द्वारे पाणी मिळेल का ? याबाबत शंकाच असल्‍याचे नागरिक सांगत आहेत.



व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!