Your Alt Text

तिर्थपुरी – कंडारी अंबड – मंगरूळ या खड्डेमय रस्‍त्‍याचे काम तात्‍काळ करा आणि वाळूची अवैध वाहतूक तात्‍काळ बंद करा !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील तिर्थपुरी – कंडारी अंबड – मंगरूळ या रस्‍त्‍याचे गेल्‍या अनेक वर्षांपासून डांबरीकरण व मजबूतीकरण करण्‍यात आलेले नाही सदरील रस्‍ता तातडीने करण्‍यात यावा तसेच या रस्‍त्‍यावर वाळूची अवैध वाहतुक तात्‍काळ बंद करण्‍यात यावी अशी मागणी अॅड.नितेश उढाण यांच्‍यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

रस्‍त्‍याची दुरावस्‍था !

घनसावंगी तालुक्‍यातील तिर्थपुरी – कंडारी अंबड – मंगरूळ या रस्‍त्‍याचे डांबरीकरण व मजबूतीकरण गेल्‍या अनेक वर्षांपासून करण्‍यात आलेले नाही. सदरील रस्‍ता रहदारीच्‍या दृष्‍टीने खुपच अरूंद असून रस्‍ता अत्‍यंत खराब झाला आहे. या रस्‍त्‍यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली असून रस्‍त्‍यावर अनेक गावे असून कारखाना देखील आहे. रस्‍ता अरूंद व सिंगल असल्‍याने एकाच वेळी दोन वाहने पास होण्‍यास अडथळा निर्माण होत आहे.

सदर रस्‍ता अनेक गावांचा मुख्‍य रस्‍ता असून या रस्‍त्‍याचे काम अनेक वर्षांपासून झालेले नसल्‍यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. त्‍यामुळे छोटे मोठे अपघात देखील घडत आहेत. रस्‍ता अत्‍यंत खराब असल्‍यामुळे या भागातील दळणवळणावर आणि विकासावर सुध्‍दा परिणाम झाला आहे. त्‍यामुळे सदरील रस्‍ता सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगल्‍या दर्जाचा व तातडीने करावा, तसेच अरूंद असलेला रस्‍ता मोठा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे अॅड. नितेश उढाण व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

वाळूची अवैध वाहतूक !

घनसावंगी तालुक्‍यातील मुद्रेगाव आणि मंगरूळ या भागातून वाळूचे अवैध उत्‍खनन करून अंतरवाली टेंभी, कंडारी अंबड फाट्यावरून मुरमा खु. या मार्गाने वाळूची अवैध वाहतुक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वाळुच्‍या अवैध वाहतुकीचे जास्‍त प्रमाण रात्रीचे असून हायवा व तत्‍सम वाहनाद्वारे ही वाहतुक केली जात आहे. सदरील वाहनांमध्‍ये क्षमतेपेक्षा जास्‍त वाळू भरून नेत असल्‍यामुळे या भागातील रस्‍त्‍यांची अत्‍यंत दयनीय अवस्‍था झाली आहे.

या भागातील रस्‍ते हे सिंगल किंवा अरूंद असल्‍यामुळे इतर वाहनांना सुध्‍दा खूप त्रास होत आहे, शिवाय वाळूची वाहने भरधाव वेगाने जात असल्‍याने अपघाताची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्‍यामुळे सदरील वाळूची अवैध वाहतूक महसूल व पोलीस प्रशासनाने तात्‍काळ बंद करावी अशी मागणी तहसीलदार घनसावंगी व पोलीस ठाणे तिर्थपुरी यांच्‍याकडे निवेदनाद्वारे अॅड.नितेश उढाण, रामकिसन नाईक, सुदर्शन जाधव, विठ्ठल उढाण, अस्‍लम पठाण, प्रल्‍हाद उढाण, गोपल खरात, महादेव उढाण, सिध्‍देश्‍वर उढाण, लालासाहेब पोटुळे, दादा चांदर, केशव गवारे, माऊली नाईक, सचिन उढाण, अमरसिंह उढाण, युवराज उढाण, यशराज उढाण, विश्‍वनाथ उढाण, महेश गायकवाड, कृष्‍णा उढाण, दत्‍तात्रय उढाण, सतिष उढाण, बाळासाहेब उढाण, गणेश बोबडे, शिवाजी उढाण इत्‍यादींनी केली आहे.


Elgaar News baner01
व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!