Your Alt Text

घनसावंगी मतदारसंघात इच्‍छुकांच्‍या मन मे लड्डू ! सोयरीक करायची का नाही हे अजून ठरलेलंच नाही, वधू पक्षासोबत बोलणी सुरू आहे, अन इकडे नवरदेव लग्‍नमंडपात जावून बसलेत !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
ज्‍या प्रमाणे महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात खिचडी झाली आहे, ज्‍या प्रकारे राजकीय पक्षात दोनचे चार हात आणि चारचे आठ हाथ झाले आहेत आणि ज्‍या प्रकारे सगळा गोंधळ सुरू आहे त्‍यापेक्षा जास्‍त गोंधळ घनसावंगी मतदार संघात सुरू आहे असं म्‍हटल्‍यास वावगं ठरणार नाही.

विधानसभा निवडणुकीत मतदान कोणत्‍या उमेदवाराला करायचं आहे या प्रश्‍नाने जेवढं मतदारांना गोंधळात टाकलं आहे त्‍यापेक्षा जास्‍त इच्‍छुक उमेदवार गोंधळून गेलेत की काय असा प्रश्‍न पडल्‍याशिवाय राहत नाही. कारण आचारसंहिता लागायला अवघे काही दिवस शिल्‍लक असतांना कोणत्‍या पक्षाकडून लढायचं हेच बहुतांश उमेदवारांचं अजूनही ठरलेलं दिसत नाही.

जर निवडणुका तोंडावर असतांना अजून पक्षच फायनल नसेल, पक्षाची उमेदवारी मिळेल का नाही हे पण निश्चित नसेल, तर मग मतदारांपर्यंत पोहोचणार कसं ? कोणत्‍या पक्षाचा प्रचार करायचा ? कोणत्‍या पक्षाची बाजू पटवून द्यायची ? उमेदवाराने स्‍वत:ची बाजु केव्‍हा पटवून द्यायची ? उमेदवाराने स्‍वत:च्‍या बाजुने मतदारांना कधी वळवायचं ? असे अनेक प्रश्‍न यानिमित्‍ताने उपस्थित करण्‍यात येत आहेत. म्‍हणजे ते असं झालंय की, सोयरीक करायची का नाही हे अजून ठरलेलंच नाही, वधू पक्षासोबत बोलणी सुरूच आहे, अन इकडे नवरदेव लग्‍नमंडपात जावून बसलेत !

उमेदवारीची अनिश्चितता !

घनसावंगी मतदारसंघात मागील काळात अटीतटीची लढत पहायला मिळाली होती, परंतू अनेकजण इच्‍छुक असल्‍याने यावेळेस अटीतटीची लढत होईल का नाही हे आज सांगणे अवघड आहे. कोणत्‍या पक्षाची उमेदवारी कोणाला मिळेल ? मतांच्‍या विभागणीचा फायदा नेमका कोणाला होईल ? येणारी राजकीय परिस्थिती काय असेल ? यावर बरंच काही अवलंबून असेल.

जातीय समिकरणे !

गेल्‍या पंचवार्षिकला जशी परिस्थिती होती तशी आता नक्‍कीच नाही, मागील काळात झालेली विविध आंदोलने, उपोषणे, मोर्चे इत्‍यादी पाहता तसेच जातीय संघर्षाचा बोलबाला पाहता यावेळेस राजकीय समिकरणे बदलली आहेत. कितीही नाकारले तरी यावेळेस जात फॅक्‍टर प्रभावी ठरण्‍याची शक्‍यता दिसत आहे, अर्थातच या जात फॅक्‍टरचा फायदा कोणत्‍या उमेदवाराला होईल हे सांगणे अवघड आहे.

इच्‍छुकांचा बोलबाला !

घनसावंगी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्‍ट्रवादी (SP) आणि शिवसेना (UBT) यांच्‍याकडून उमेदवार इच्‍छुक आहेत. तर महायुतीकडून तिन्‍ही पक्षाचे 3 उमेदवार इच्‍छुक आहेत, तसेच इतर पक्षांचे सुध्‍दा उमेदवार इच्‍छुक आहेत. याशिवाय काही अपक्षही लढण्‍याच्‍या तयारीत आहेत. याचाच अर्थ घनसावंगी मतदार संघात यावेळेस उमेदवारांची संख्‍या जास्‍त असणार हे निश्चित आहे. मात्र हे सगळं असलं तरी कोणत्‍या इच्‍छुकाला कोणत्‍या पक्षाची उमेदवारी मिळणार हे अजून सांगणे कठीण आहे.

सध्‍या फोनवरच दिलासा !

विधानसभा निवडणूक लढण्‍यासाठी इच्‍छुक असलेले उमेदवार विविध पक्षांसोबत चाचपणी करत असल्‍याचे दिसत आहे, वरिष्‍ठ नेत्‍यांना कधी दिवसा तर कधी रात्री फोन करणे यासह भेटीगाठी सुध्‍दा सुरू आहेत, मात्र ठामपणे कोणालाही शब्‍द मिळाला असेल असे दिसत नाही. वरिष्‍ठ नेत्‍यांकडून फोनवर काही चांगले शब्‍द ऐकायला मिळाले तरी अनेक इच्‍छुकांच्‍या “मन में लड्डू” फुटत आहेत.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!