Your Alt Text

11 वी / 12 वी सायन्‍स क्‍लासेससाठी शहरात जावून लाखोंचा खर्च ? सर्व पालकांनी आवश्‍य वाचा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (संपादकीय) :-
भविष्यात मुलाला इंजीनियरिंग करायची आहे त्या दृष्टीने अकरावी-बारावी सायन्स चे क्लासेस लावण्यासाठी मराठवाड्यातील एका शहरात जाऊन आलो. 3 दिवस फिरलो, शहरात गल्लोगल्ली झालेले कोचिंग क्लासेस आणि अनेकांनी मांडलेला बाजार पाहता सर्वसामान्य माणूस गोंधळून जाईल अशी परिस्थिती आहे. कोचिंग क्लासेस ची फी सुद्धा एवढी आहे की गरीब व सर्वसामान्य माणूस असे कोचिंग क्लासेस लावू शकत नाही. तीन विषयासाठी अकरावी बारावी साठी एक लाख रुपये जवळपास फीस लागत आहे. एका वर्षाचे म्हटले तरी 50 हजार रुपये फक्‍त क्‍लासेसचे लागत आहेत.

शिवाय राहणे, खाणे पिणे हा खर्च सुद्धा जवळपास तेवढाच लागणार, म्हणजे सामान्‍य शहरात क्लासेस आणि राहणे + जेवण असे एकूण 1 लाख रुपये किंवा त्‍यापेक्षा जास्‍त खर्च वर्षाला गृहीत धरता येईल. म्हणजे गावाच्या बाहेर शहरात मुलाला पाठवणे सर्वसामान्य माणसाला अवघड होऊन बसले आहे. हा खर्च तर सामान्‍य आहे आणि यापेक्षा जास्त खर्च छत्रपती संभाजी नगर, लातूर, नांदेड किंवा इतर महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमधला खर्च तर खूपच जास्त आहे. फक्त पैसे खर्च केले म्हणजे चिंता मिटली असे होत नाही, कारण जेथे क्लास लावला आहे तो क्लास चांगला आहे की नाही हे सुद्धा तात्काळ लक्षात येत नाही.

अजून एक प्रश्न महत्त्वाचा आहे की ज्याला इंजिनिअरिंग करायची आहे त्या विद्यार्थ्याला बहुतांश Classes कडून सरसकट JEE साठी सांगितले जाते, आणि असेही सांगितले जाते की JEE आणि MHT-CET अभ्यासक्रम जवळपास सारखाच आहे किंवा JEE केल्यानंतर MHT-CET ची परीक्षा देता येते, परंतु हा विचार केला जात नाही की तो विद्यार्थी JEE परीक्षेचे ओझे उचलू शकतो का ? कारण JEE ही इंजिनिअरिंगची परीक्षा देशपातळीवरील आहे (म्‍हणजे Compitition देशपातळीवर होणार ) आणि MHT-CET ही परीक्षा राज्यपातळीवरची आहे म्हणजे JEE पेक्षा MHT-CET परीक्षा बऱ्याच अंशी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या अवाक्यात असते. परंतु बहुतांश जण MHT-CET चे स्वतंत्र क्लासेस न घेता त्या विद्यार्थ्यावर JEE चे ओझे लादत असल्‍याचे दिसते, परिणामी शेवटी JEE मध्ये सुद्धा जास्त मार्क मिळत नाही आणि MHT-CET मध्ये सुद्धा जास्त मार्क मिळत नाही. म्हणजे दोन्ही बाजूचे नुकसान होते. हे फक्त मी सांगत नाही तर अनेक प्राध्यापकांनी सुद्धा हे मान्य केले आहे. याचा अर्थ JEE करणे चुकीचे आहे असा होत नाही. JEE करणे खूप चांगले आहे, या परीक्षेत चांगले मार्क मिळाल्‍यास देशपातळीवरील संस्‍थांमध्‍ये प्रवेश मिळतो आणि अनेक संधी उपलब्‍ध होतात हे खरे आहे. परंतू ज्‍या विद्यार्थ्‍याचा बेस पाहिजे तेवढा मजबूत नसेल तर त्‍या विद्यार्थ्‍यांवर त्‍याच्‍या क्षमतेपेक्षा जास्‍त ओझे लादणे हे सुध्‍दा योग्‍य नाही असेही अनेकांचे मत आहे.

JEE Main, JEE Advance देवून IIT व तत्‍सम संस्‍थांमध्‍ये प्रवेश मिळतो हे खरे आहे, जे विद्यार्थी दिवसरात्र, तासनतास अभ्‍यास करून परीक्षा देतात त्‍यांना चांगले मार्क मिळतात. परंतू जर विद्यार्थी सामान्‍य असेल आणि त्‍याला JEE आणि MHT-CET अशा दोन्‍ही परीक्षांचा अभ्‍यास करणे शक्‍य नसेल तर अशा विद्यार्थ्‍यावर अतिरिक्‍त ओझे टाकणे योग्‍य नसल्‍याचे मतही अनेकांनी व्‍यक्‍त केले आहे, कारण अतिरिक्‍त अभ्‍यासामुळे किंवा वेगवेगळ्या प्रकारचा अभ्‍यासक्रम असल्‍यामुळे कदाचित विद्यार्थी मध्‍येच शिक्षण सोडून देण्‍याची किंवा तणावात येण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

तीन दिवस एकूण परिस्थिती पाहता असा प्रश्न पडला की, आपल्या सारखा सुशिक्षित माणूस जर एवढी माहिती घेऊन, चर्चा करून अस्वस्थ होत असेल किंवा त्याचे समाधान होत नसेल तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था होत असेल. गावात परतल्यानंतर वारंवार एक प्रश्न मनाला पडत आहे की जर शहरांमध्ये एवढे क्लासेस सुरू होऊ शकतात तर आपल्या 20 ते 25 हजार लोकसंख्येच्या व 25 ते 30 गावांचा केंद्रबिंदू असलेल्‍या कुंभार पिंपळगाव शहरात Physics, chemistry, Maths आणि Biology चे क्‍लासेस सुरू होवू शकत नाही का ? सदरील प्रमुख चार विषयाचे तज्ञ शिक्षक यांच्यासह कोचिंग क्लासेस माफक फी मध्ये सुरू होऊ शकत नाही का ? सर्कल मध्‍ये शेकडो Science चे विद्यार्थी आहेत. आपण सर्वांनी प्रयत्न केल्यास येथे चांगल्या दर्जाचे कोचिंग क्लासेस येऊ शकत नाही का ? येथे दोन कॉलेज आहेत दोन्ही कॉलेजमध्ये 11 वी / 12 वी सायन्स चे अनेक विद्यार्थी आहेत, शिवाय आपल्या परिसरातील असंख्य विद्यार्थी शहरात जाऊन कोचिंग क्लास लावतात, शिवाय राहण्या खाण्याचा त्यांचा खर्चही बराच होतो, जर कुंभार पिंपळगाव शहरातच चांगल्या दर्जाचे कोचिंग क्लासेस सुरू झाल्यास खूप मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि आपल्या परिसरातील असंख्य शेतकरी व नागरिकांचे कोट्यावधी रुपये वाचू शकतात.

25 ते 30 गावांचे केंद्रबिंदू असलेल्या कुंभार पिंपळगाव शहरात एक चांगल्या दर्जाचे कोचिंग क्लासेस असावे असे मनोमन वाटत आहे. Physics, chemistry, Maths, Biology असे चार विषयाचे तज्ञ शिक्षक या क्लासेसमध्ये असल्यास NEET, JEE, MHT-CET अशा तिन्ही प्रकारचे विद्यार्थी म्हणजेच मेडिकल, इंजीनियरिंग व इतर जवळपास सर्व क्षेत्रातील विद्यार्थी यामध्ये कव्हर होऊ शकतात. ऑनलाइन क्लासेस चा पर्याय जरी असला तरी ऑफलाईन क्लासेसचे महत्त्व नाकारता येणार नाही.

कुंभार पिंपळगाव मध्ये Physics, chemistry, Maths, Biology अशा चार तज्ञ शिक्षक अथवा प्राध्यापकांसह कोचिंग क्लासेस सुरू झाल्यास परिसरातील विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. विषय माझ्या मुलाचा नाही, त्याचे अॅडमिशन जवळपास निश्चित झाले आहे. पण सध्याची अटीतटीची परिस्थिती पाहता आणि ज्यांना या क्षेत्राबद्दल अधिक माहिती नाही त्यांची अडचण लक्षात घेता संबंधित पालकांची काय अवस्‍था होत असेल हा प्रश्नच मनाला अस्वस्थ करत होता, त्यामुळे थोडं व्यक्त व्हावं असं वाटलं म्हणून हा शब्द प्रपंच करत आहे.

आपल्या सगळ्यांना मिळून हा विचार करावा लागेल की आपल्या कुंभार पिंपळगाव मध्ये आपल्या सर्कलमधील विद्यार्थ्यांसाठी मग ते गरीब असो किंवा श्रीमंत असो सर्वांच्या पाल्यांसाठी, मुला-मुलींसाठी येथे चांगल्या दर्जाचे कोचिंग क्लासेस सुरू करता येईल का ? किंवा कोणाला इथे बोलावता येईल का ? या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. कारण दिवसेंदिवस बाहेर एवढा खर्च वाढत आहे की तो सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर चालला आहे, शिवाय अकरावी बारावीच्या मुलींच्या सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न आहेच. त्यामुळे माझं काय बंद पडलंय ह्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल आणि विचार करावा लागेल की आपल्या इथं चांगल्या दर्जाचं कोचिंग क्लासेस माफक फी मध्‍ये कसे आणता येईल ? माझं मत संवेदनशील प्रत्येक पालकाला नक्कीच पटेल परंतु झोपेचं सोंग घेणाऱ्या लोकांना लक्षात येईल किंवा नाही याबद्दल नक्कीच साशंकता आहे. एकतर आधीच आपल्या पिंपळगावची अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्‍याचे दिसत आहे आणि शिक्षण क्षेत्रात आपण जर लक्ष दिले नाही तर परिस्थिती अत्यंत भयावह होणार आहे यात मला शंका वाटत नाही…

एवढं सांगण्‍यामागे माझा वैयक्तिक काही स्‍वार्थ नाही. मात्र शैक्षणिक क्षेत्राचा जो काही खेळखंडोबा झालाय ते पाहून मनाला अस्‍वस्‍थ वाटत असल्‍याने हा शब्‍दप्रपंच मांडत आहे. दुसरं म्‍हणजे आजच्‍या स्‍पर्धेच्‍या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या युगात चांगल्‍या दर्जाचे शिक्षण प्राप्‍त केल्‍याशिवाय संबंधित विद्यार्थ्‍याचे आणि पर्यायाने त्‍या कुटुंबाचे कल्‍याण होणार नाही यात शंका नाही.

कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी आणि घनसावंगी अशा किमान तीन ठिकाणी जर चांगल्या दर्जाचे कोचिंग क्लासेस सुरू झाल्यास घनसावंगी तालुक्यातील शिक्षणाचा मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि कोट्यावधी रूपये वाचू शकतात असे म्हणायला हरकत नाही. अर्थातच सर्वांनी प्रयत्न केल्यास हे नक्कीच शक्य आहे… त्यामुळे सर्वांनी आपल्‍या सर्कलच्‍या दृष्‍टीने गांभीर्यपूर्वक अवश्य विचार करावा एवढीच माफक अपेक्षा… धन्यवाद….

  • आपलाच,
    परवेज पठाण,
    संपादक, एल्‍गार न्‍यूज
    9890515043

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!